BREAKING NEWS
latest

जिल्ह्यात १,५६,९३९ विद्यार्थ्यांना १,६८,९५४ मोफत पुस्तकांचे वाटप; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वितरणाचे शिक्षण विभागाचे नियोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : समग्र शिक्षा अभियानातंर्गत ठाणे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ५६ हजार ९३९ विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार ९५४ मोफत एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात होत असून, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना  पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ९३९ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके बालभारती पनवेल गोडाऊन मधून तालुका स्तरावरील गटशिक्षण अधिकार्यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे व शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तकांचे नियोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत ९५ हजार ८२९ विद्यार्थ्यांसाठी १ लाख ९७१ पुस्तके तर सहावी ते आठवी पर्यंतच्या ६१ हजार २१० विद्यार्थ्यांसाठी ६७ हजार ९८३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने माहिती दिली आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नगरपालिका खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते, त्यानुसार  विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ मिळेल. ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद, नगरपालिका शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांनी बाजारातून पुस्तके खरेदी करू नये. पाठ्यपुस्तके सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे असे शिक्षण विभागाकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले.

      इयत्ता     /     विद्यार्थी     /   पुस्तके 
१ ली ते ५ वी / ९५ हजार ८२९ / १ लाख ९७१
६ वी ते ८ वी / ६१ हजार २१० / ६७ हजार ९८३ 
१ ली ते ८ वी / १ लाख ५६ हजार ९३९ /१ लाख ६८ हजार ९५४

रेश्मा आरोटे (जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे)
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत