BREAKING NEWS
latest

गोकुळ दुधाचे संकलन २ लाख लिटरने वाढले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
कोल्हापूर, दि. ४ : उन्हाच्या प्रखर झळांनी अवघा महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. राज्यातील शेती आणि पाळीव प्राण्यांना पाणी टंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे. मात्र अशा दाहक वातावरणात दिलासा देणारी बातमी म्हणजे, विक्रमी कामगिरी करत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडे होणाऱ्या दूध संकलनात दोन लाख ३७ हजार ८८१ लिटरने वाढ झाली आहे. याबाबत अभिप्राय देताना गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे म्हणाले की, “दूध उत्पादकांसाठी ‘गोकुळ’ विविध योजना राबवत आहे. म्हैस दूध वाढीसाठी अनुदान आणि गायीच्या दुधाला चांगला दर दिला जात आहे. यातच सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांकडून दूध उत्पादन वाढीसाठी सातत्याने होणाऱ्या प्रयत्नांमुळे दूध संकलनात वाढ झाली आहे.

उन्हाळ्यात दूध संकलनात मोठी घट होताना दिसत असते. परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडे दोन लाख ३७ हजार ८८१ लिटर दूध संकलन वाढले आहे. म्हशीच्या दुधात ६७ हजार ३७९ हजार लिटर, तर गायीच्या दुधात एक लाख ७० हजार ५०२ लिटरने वाढ झाली आहे. सध्या ‘गोकुळ’चे एकूण दूध संकलन १५ लाख २९ हजार ३०२ होत आहे. ‘गोकुळ’ने गेल्या दोन-तीन वर्षांत गाय व म्हैस खरेदीला प्रोत्साहन दिले. त्यातून सुमारे चार हजार म्हशी खरेदी केल्या आहेत. याचाच परिणाम दूध उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात वाढलेली उष्णता, चाऱ्याअभावी प्रत्येक उन्हाळ्यात दूध संकलनात सरासरी घट होत असते. प्रतिवर्षी एप्रिल, मे, जून दरम्यान म्हैस व गाय या दोन्ही प्रकारच्या दुधामध्ये घट होत असते. याउलट प्रतिवर्षी असणाऱ्या तापमानापेक्षा यंदा कोल्हापूरचा पारा ४१ ते ४२ डिग्री पर्यंत वाढला आहे. अशा तापमानात दूध संकलनात घट होईल, असा अंदाज होता. मात्र, उलट संकलात वाढ झाली आहे.

‘गोकुळ’ कडून गेल्या दोन-अडीच वर्षांत म्हैस खरेदीसात्र ४० हजार रुपयांचे अनुदान दिले आहे बाहेरच्या राज्यांतील किंवा जातीच्या म्हशी खरेदी करणाऱ्यांसाठी ही योजना  आजही सुरू आहे. याशिवाय जनावरांसाठी दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांवर भर, दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळ प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी २ मे २०२३ रोजी संकलित झालेल्या १२ लाख ९२ हजार ४२१ लिटर दुधामध्ये यावर्षी तब्बल २ लाख ३७ हजार ८८१ लिटरची वाढ दिसून येत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत