BREAKING NEWS
latest

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्टार्टअप डोंबिवली प्रदर्शनाला डोंबिवलीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
डोंबिवली : सुशिक्षित व सुसंस्कृत डोंबिवली शहरातील टिळकनगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत दोन दिवस सुमारे ६० नव उद्योजकांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात घरगुती खाद्यपदार्थ तसेच घरगुती वापरात लागणाऱ्या वस्तू होत्या. हे अनोखं प्रदर्शन डोंबिवलीकरांसाठी प्रोत्साहन देणारे होते अशी चर्चा सर्वत्र होत होती.

शनिवार, रविवार दि. ८ आणि ९ जून रोजी पूर्वेकडील सर्वेश मंगल कार्यालय येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. डोंबिवलीतील तसेच इतर शहरातील सुमारे ६० नव उद्योजकांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात विविध प्रकारची प्रिमिक्स, घरगुती पीठे, मसाले, महिलांकरिता विविध प्रकारचे अलंकार, सौंदर्यप्रसाधने आणि कपडे तसेच गृह सुशोभीकरणाच्या वस्तू, कपड्यांची खेळणी आदी वस्तू मांडण्यात आल्या होत्या. 

विशेष म्हणजे पुणे येथील हार्मोनियम बनविणाऱ्या एका संस्थेने देखील यामध्ये सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात नवनवीन संकल्पनातून सुरू केलेले व्यवसाय करणाऱ्या अनेक तरुण व्यवसायिकांचा सहभाग तरुणांना प्रोत्साहित करण्यासारखा होता. खाद्य पदार्थ प्रदर्शनात चकली-चिवडा अशा प्रकारचे फराळाचे पदार्थ तर पक्वांनांचेही अनेक स्टॉल्स होते. याबरोबर पाणीपुरी, पावभाजी आणि इतर अनेक स्टॉल होते.

या प्रदर्शनाबाबत मंडळाचे अध्यक्ष सचिन आंबेकर म्हणाले की, डोंबिवलीकरांनी प्रदर्शनाला भेट दिल्याने नव उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले. मंडळाचे सहकार्यवाह केदार पाध्ये यांनी सर्व स्टॉलधारकांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. या प्रदर्शनाला राज्याचे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन नवउद्योजकांना शुभेच्छा दिल्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत