डोंबिवली : २६ मे २०१६ रोजी प्रोबेस कंपनी स्फोट प्रकरणातील आणि २३ मे २०२४ रोजी अमुदान कंपनी स्फोट प्रकरणातील डोंबिवली येथील बाधित नुकसानग्रस्त लोकांची संयुक्त बैठक शनिवार दि.१ जून २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता सोनारपाडा येथील दुर्वांकुर हॉल येथे संपन्न झाली.
या बैठकीत स्फोटातील बाधित नुकसानग्रस्त पीडितांना सरकार तर्फे लवकरात लवकर सर्व्हे करून झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा तसेच एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या इतरत्र स्थलांतरित कराव्या अशी जोरदार मागणी करण्यात आली. २६ मे २०१६ साली झालेल्या प्रोबेस कंपनीच्या बॉयलर स्फोटातील बधितांना आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला अद्याप पूर्ण अनुदान मोबदला मिळाला नाही तो त्वरित मिळावा असे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले. तर कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) संघटना यांनी २०१६ साली प्रोबेस कंपनीच्या स्फोटानंतर ही अशी भूमिका घेतली होती की इकडील कंपन्यांचे इतरत्र स्थलांतर करणार नाही यावर इकडील रासायनिक (केमिकल) कंपन्या स्थलांतरित करून त्याच जागेवर इलेक्ट्रॉनिक व इंजिनिअरिंग कंपन्या उभाराव्यात असे गुलाब वझे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या बैठकीला व्यासपीठावर गंगाराम शेलार, गुलाब वझे, गजानन मंगरूळकर, राजीव तायशेटे, महेश पाटील, भगवान पाटील, विजय भाने, गणेश म्हात्रे, ऍड. शिवराम गायकर, बंडू पाटील, दत्ता वझे, विजय पाटील, शरद पाटील, जालिंदर पाटील बाळाराम ठाकूर, भास्कर पाटील, रतन पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा