BREAKING NEWS
latest

कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे - विभागीय आयुक्त पी.वेलरासू

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शीपणे होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी यावेळी सांगितले. 

भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. या मतदारसंघात २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै २०२४ रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे,  जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, रायगड-अलिबागचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे, नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, उपायुक्त तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, कोकण विभागाचे उपआयुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (रोहयो) रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सत्यम गांधी आदी यावेळी उपस्थित होते.  

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मतमोजणीचे हे पहिले प्रशिक्षण होते. यावेळी श्री. गायकवाड यांनी मतमोजणीसाठी करावयाची तयारी, मतपत्रिका कशा मोजाव्यात, त्यांची वैध-अवैधता कशी तपासावी, वैध मतांचा कोटा कशा प्रकारे तपासावे, किती फेऱ्या होणार आदी माहिती दिली. तसेच श्री. रानडे यांनीही मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणकोणती काळजी घ्यावी, डेटा कसा भरावा आदींची माहिती दिली. 

पी.वेलरासू यांनीही मार्गदर्शन करताना म्हणाले की, यंदा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली 
आहे. तसेच यंदा मतदानाची वेळ वाढविण्यात आल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. या निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीची प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया वेगळी असणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान होणार असल्याने मोजणी प्रक्रियेची व्यवस्थित तयारी करावी व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व बिनचूक होण्यासाठी प्रयत्न करावे. 

कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तहसीलदार आसावरी संसारे यांनी सूत्रसंचालन केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत