कल्याण दि.१०: महापालिका मुख्यालयातील इन्टीग्रेटेड कंट्रोल ॲन्ड कमांड सेंटर (आयसीसीसी) मध्ये आज कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी अधिकारी वर्गाची खास बैठक घेऊन तेथील कार्यपध्दतीची पाहणी केली आणि आपत्कालीन परिस्थितीत सर्व अधिकाऱ्यांनी त्वरेने आणि समन्वयाने काम करावे अशा सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी वर्गास दिल्या.
महापालिका क्षेत्रात होणारी संभाव्य अतिवृष्टी, सखल भागात साचणारे पावसाचे पाणी या अनुषंगाने उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयसीसीसी मध्ये मुख्य नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून पावसाळयातील आपत्कालीन परिस्थितीत आयसीसीसी हेच महत्वाचे मुख्य नियंत्रण केंद्र राहील. यामध्ये महापालिका अधिकारी वर्गाच्या नियंत्रणाखाली एक पथक गठीत करण्यात आले असून या केंद्रामध्ये सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी नेमणूका केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी या केंद्रामधून प्राप्त होणारे संदेश संबंधित यंत्रणेकडे जलदगतीने पोहोचविण्याचे काम करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त-१ प्रल्हाद रोडे, अतिरिक्त आयुक्त-२ तथा नोडल अधिकारी आपत्ती व्यवस्थापन धैर्यशील जाधव, शहर अभियंता अनिता परदेशी तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा