डोंबिवली : उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना स्वत:च्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपावरुन उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील ‘विघ्नहर्ता ट्रस्ट’च्या सचिव आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल केला. रुतिक उर्फ अटल अनिल शुक्ला (राहणार. म्हारळ, उल्हासनगर), गोपाळ सत्यवान पाटील (राहणार. म्हारळ), सुमीत सत्यवान सैनी (राहणार. योगीधाम, कल्याण), शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक जनार्दन ठाकरे (राहणार. कल्याण) आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे अशी पाच आरोपींची नावे आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बबनराव पत्रे यांनी हा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले, की उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाला ठार मारण्याचा प्रयत्न तीन ते चार जणांनी केला होता. या प्रकरणातील आरोपी गुन्हा करून फरार झाले होते. उल्हासनगर पोलीस शोध घेत होते. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी माळशेज घाटातील ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाळे शेतघरात लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक पत्रे, उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक करंजाळे येथे पोहचले.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शेतघरात आश्रय दिल्याचा ठपका
रात्रीच्या वेळेत ओतूर पोलीसांच्या साथीने उल्हासनगर पोलीसांनी शेतघरावर छापा टाकला. तेथे १५ जण होते. सहा इसम पोलीसांना पाहून पळून गेले. शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना पोलीसांनी या शेतघरात आरोपींची नावे वाचून दाखवून ते येथे राहतात का म्हणून विचारणा केली. प्रतीकने अटल शुक्ला याच्या सूचनेवरून सोहन पवार, धीरज रोहेरा, यश पवार येथे राहत आहेत असे सांगितले. हेच गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन उल्हासनगर येथे आणून अटक केली.
अटल शुक्ला याने शेतघराचा व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना येथे राहणारे तीन लोक हे उल्हासनगर मधील गंभीर गुन्हयातील आरोपी आहेत. त्यांची राहणे, भोजनाची व्यवस्था कर, अशी सूचना केली होती. त्यामुळे तिघांना या शेतघरात आश्रय मिळाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अटल शुक्लाला गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ) याने शेतघराचा संदर्भ दिला होता. तीन जण गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत हे माहिती असुनही त्यांची माहिती पोलिसांपासून लपवली आणि गन्हेगारांना शेतघरात आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा