BREAKING NEWS
latest

"आनंदाचा शिध्या"ची काळ्या बाजारात विक्री, २७० खाद्य तेलाच्या थैल्या पकडल्या, रेशन दुकान सील..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथ : एका रेशन दुकानदाराला पामतेला समवेत अन्य शिधा जिन्नसांचा अपहार करताना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना अंबरनाथ मधील महालक्ष्मी नगर येथे घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात शिधा वाटप दुकानदार आणि त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पूर्व येथील महालक्ष्मी नगरात मैत्रिण औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या शिधावाटप दुकानात पामतेल आणि अन्न धान्याचा काळा बाजार होत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला होता. त्यांनी या दुकानावर पाळत ठेवत सोमवारी दुकानदार सुभाष भारती आणि त्याचा साथीदार कुंदन कुमार गुप्ता यांना शिधाधारकांना वितरित करण्यासाठी आणलेल्या पामतेल आणि इतर शिध्याचा काळा बाजार करत असताना पकडले. ही घटना समजताच अंबरनाथ रेशनिंग विभागाचे अधिकारी शशिकांत बाळकृष्ण पोटसुते यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिधावाटप दुकानाची झाडाझडती घेतली असताना त्यांना पामतेल आणि अन्य शिधा जिन्न्स कमी प्रमाणात आढळून आले. त्यांनी रेशन दुकानदारा विरुद्ध अनधिकृतपणे जीवनावश्यक वस्तूंचा अपहार केल्याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

रेशन दुकानात कमी आढललेला माल २,८७५ किलो तांदूळ, गहू ५,४२० किलो, प्रधानमंत्री पिशवी ५५७ नग, अंत्योदय साखर १० किलो, साडी २ नग, आनंदाचा शिधा (रवा, साखर, चनाडाळ, तेल प्रति एक किलो) आनंदाचा शिधा (तेल), २७० नग, असा साधारण ४ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या माल दुकानातून गायब केला.

राज्य शासनाकडून रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जात असतो. मात्र अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील ४६ /फ - ००१ या रेशन दुकानात सरकारकडून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या शिध्याचं साहित्य आलं होतं. यापैकी सोयाबीन खाद्य तेलाच्या २७० लिटर तेलाच्या पिशव्या पहाटेच्या सुमारास एका खाजगी टेम्पोतून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उतेकर यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी टेम्पो चालकाला अडवून विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिल्यामुळे गोसावी यांनी शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना बोलाविले. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाणे करीत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत