BREAKING NEWS
latest

"स्वच्छता ही सेवा" या अभियानाच्या अनुषंगाने येत्या १५ दिवसांत नेहमीच्या नियोजनात नसलेले रस्ते तसेच चौक देखील स्वच्छ करावेत ! - महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : "स्वच्छता हीच सेवा" या अभियानाच्या अनुषंगाने येत्या १५ दिवसांत नेहमीच्या नियोजनात नसलेले रस्ते तसेच चौक देखील स्वच्छ करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज दिले. शासनाच्या निर्देशानुसार "स्वच्‍छ भारत अभियान २.०” अंतर्गत दि.१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत "स्वच्छता ही सेवा" अभियान २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात पुढील सूचना देण्यासाठी महापालिका आयुक्त दालनात आयोजिलेल्या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे निर्देश दिले.

या अभियानामध्ये सर्वांच्या सहभागाने स्वच्छता उपक्रम राबविणे, जिव्हीपी पॉईंट्स निश्चित करुन त्यांचे स्वच्छ व सुंदर स्थळात रुपांतर करणेबाबत कार्यवाही करणे, सफाई मित्रांसाठी शासकीय योजनांचा लाभ देणे, या बाबींवर भर देण्यात येणार आहे.

या अभियानाचा प्रारंभ दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी कल्याण (पश्चिम) येथील दुर्गाडी गणेश घाट येथे तसेच सर्व प्रभाग स्तरांवर श्रमदान करुन, स्वच्छतेची शपथ घेवून होणार आहे. या अभियानामध्ये अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत "एक पेड माँ के नाम" ही संकल्पना राबविली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजी मार्केट देखील या अभियानात संबंधितांकडून स्वच्छ करुन घेतली जाणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी, 'कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप', विसर्जन स्थळे स्वच्छ करणे, याच बरोबर नागरीकांशी स्वच्छता संवाद करणे, यामध्ये पदाधिकारी, एनजीओ यांचा देखील सहभाग घेतला जाणार आहे. स्वच्छतागृहांची निगा व स्वच्छता करणे, पंचतारांकित गारबेज फ्री सोसायटी स्पर्धेचे पुरस्कार वितरण, स्वच्छ प्रभाग, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक इत्यादींना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे.

महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात स्वच्छतेविषयक जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांची कामातील आत्मीयता वाढावी, या दृष्टीकोनातून त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक साक्षरतेबाबत (फायनान्शियल लिटीरसी) व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या कल्याण (पश्चिम) येथील प्र.के.अत्रे रंगमंदिर व डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात इकोफ्रेंडली फिल्म फेस्टीवलचे आयोजन करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत स्वच्छता रॅलीचे आयोजन, महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वच्छता रॅली, काव्य लेखन, चित्रकला इ. अनेकविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या सिटी पार्क येथे "शुन्य कचरा" ही संकल्पना घेऊन, 'कल्चरर फेस्ट आणि फूड फेस्ट' चे आयोजन करुन उपस्थितांना 'गुड क्लिनिंग हॅबीट्स' बाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.
सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उप आयुक्त अतुल पाटील, प्रसाद बोरकर, अवधुत तावडे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

नागरीकांनी देखील आपला कचरा रस्त्यावर वा इतरत्र न टाकता कचऱ्याचे विलगीकरण करुन महापालिकेच्या घंटा गाडीत देवून, या स्वच्छता अभियानात आपले देखील योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत