BREAKING NEWS
latest

'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' च्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ज्या सत्कार्यासाठी दैवी नियोजनाने जन्मास येणे म्हणजे वाढदिवस. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांचा वाढदिवस दिनांक २३ सप्टेंबर रोजी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग यांनी मिळून 'जे एम एफ' च्या प्रांगणात मोठ्या धामधुमीत साजरा केला. कायमच चेहऱ्यावर स्मित हास्य असलेला सोज्वळ आणि आनंदी चेहरा, डोळ्यामध्ये दिसणारा प्रेमाचा ओलावा, जिभेवर कायमच साखर ठेऊन बोलला जाणारा गोड मृदू आवाज, सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच अन्नपूर्णा म्हणून ख्याती असणाऱ्या आणि रोजच सर्व छोट्या मुलांना प्रेमाने कवेत घेणाऱ्या सर्वांच्या आवडत्या डॉ. प्रेरणा मॅडम म्हणजे लहान मुलांची आईच जणू. असे हे त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच भारावून टाकणारे आहे.
२३ सप्टेंबर हा दिवस म्हणजे डॉ. प्रेरणा कोल्हे यांचा वाढदिवस. परंतु हा दिवस केवळ वाढदिवस म्हणून साजरा न करता 'अन्नपूर्णा दिवस' म्हणून ही साजरा केला जातो. कोणत्याही पदार्थाची अविट गोडी ही अलगदपणे प्रेरणा मॅडम यांच्या हातातून तयार होते. अन्नपूर्णा दिवस म्हणून शिशु विहार ते दहावीच्या सर्व मुलांनी आपापल्या वर्गात भेळ बनवली व स्वतःच्या हातांनी डॉ. प्रेरणा कोल्हे यांना प्रेमाने खाऊ घातली. वर्गात प्रवेश करताच सर्व मुलांनी स्वतःच्या हाताने बनवून आणलेले वाढदिवसाचे शुभेच्छा ग्रिटींग्ज त्यांच्या लाडक्या प्रेरणा मॅडम यांना दिले. इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि सुंदर रित्या मॅडम यांच्या केबिन ची सजावट केली होती. वाढदिवसाचे संस्कृत गाणे गाऊन सर्व विद्यार्थ्यानी डॉ. प्रेरणा कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या. अचानकच आश्चर्य रित्या केलेले स्वागत बघुन डॉ. प्रेरणा कोल्हे भारावून गेल्या व तीन ते चार हजार मुलांना, कर्मचाऱ्यांना आईस्क्रीम ची मेजवानी दिली. तर परतीची भेट वस्तू म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना 'जे एम एफ' नाव कोरलेली बॅग दिली.
सर्व शालेय व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील ५६ भोग पदार्थ बनवून आणून सुबक रित्या जेवणाचे टेबल सजवले होते. सर्व शिक्षकांनी मिळून भेटवस्तू देऊन, नृत्य करून प्रेरणा मॅडम यांचा वाढदिवस साजरा केला. सर्वांनी मॅडम बद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर प्राध्यापिका सौ. दिपाली कुलकर्णी यांनी कौतुकाची शीघ्र कविता करून ती वाचून दाखवली. अनेक पावसाळे बघितलेल्या, ज्यांच्या वरदहस्त कायमच डोक्यावर आहे अशा ८९ वर्षीय आदर्श शिक्षिका  श्रीमती तुळसाबाई लाकडे, संस्थेच्या खजिनदार कन्या जान्हवी कोल्हे यांनी व पाच सुवासिनींनी डॉ. प्रेरणा कोल्हे यांना औक्षन केले.

याच दिवशी सर्व इयत्तेचे वर्ग शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, संस्थापक आणि सचिव यांच्या बरोबर वर्ग फोटो काढला जातो. संपूर्ण दिवसाचा वाढदिवसाचा सोहळा बघुन डॉ. प्रेरणा कोल्हे थक्क झाल्या, तुम्ही केलेल्या प्रेमाच्या आपुलकीच्या, वर्षावामुळे माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत, मी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही, कारण असे केले तर ती औपचारिकता ठरेल आणि आपण मनाने, सहृदयाने  एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत तर असेच प्रेम आपुलकी कायम आपल्यात राहू द्या एवढेच मी म्हणेन, असे सांगून सर्वांप्रती भावना व्यक्त केल्या.
       
माझी आई ही माझी एकटीची आई नसून ती सर्वांची आई आहे, मला कायमच माझ्या आईचा अभिमान वाटत आलेला आहे, आयुष्यातले चढ उतार असताना देखील ठाम पणे लढा देत सामोरी जाणारी आई मी पाहिली आहे आणि अशा माझ्या 'हिरकणी' ला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देऊन खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
 एक वेळ आयुष्याची शिदोरी कमी पडेल परंतु आयुष्यभर साथ देणारी भार्या कायमच माझ्या बरोबरच आहे याचा मला अभिमान आणि आनंद वाटतो. 'सुहास्य तुझे मनासी मोही.. जशी 'नि' मोही सुरासुरात.. अशा पंक्ती गाऊन संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी भार्या, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत