डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात मोठंमोठी संकुले उभी राहत आहेत. विस्तीर्ण अशा संकुलात शाळा, क्रीडांगण, मनोरंजन याबरोबरच हॉस्पिटल व मंदिरे अशा सामाजिक व्यवस्था विकासक देत आहेत. परिणामी अशा संकुलात लोकसंख्या वाढत आहे. असे असले तरी त्यामानाने परिवहन सेवा समस्या त्रासदायक ठरत आहे. खाजगी परिवहन सेवा महागडी होत आहे. याचविषयी संबंधित लोकांनी कल्याणडोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा मिळावी अशी मागणी केली होती. मात्र गेले दोन-तीन वर्षांपासून येथील लोक अशा सेवेसाठी वाट पाहत होते. अखेर कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी या विषयाची आश्वासनपूर्ती केल्याने अखेर रुणवाल-माय सिटी वसाहतीसाठी पालिकेची परिवहन सेवा अखेरसुरू झाली.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील रुणवाल गार्डन, माय सीटी येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवा अंतर्गत बस सेवा सुरू करा अशी मागणी रुणवाल गार्डन वसाहतीतील नागरिकांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याकडे केली होती. याविषयी आमदार मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा विषय लावून धरला. त्याचबरोबर पालिका आयुक्तांना याविषयी पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळेच हा विषय मार्गी लागून या विभागात पालिका परिवहन उपक्रमाची बस सेवा शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी पासून रुणवाल गार्डन व माय सीटी ते डोंबिवली अशी बस सेवा सुरू करण्यात आली.
कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, दत्ता वझे, दिनेश शिवलकर, विकी हिंगे, बांधकाम कामगारांसाठी झटणारे लक्ष्मण मिसाळ, अवनी शर्मा, परिवहन उपक्रमाचे मार्ग तपासणीस शालिक टावरे, राजेंद्र पातकर आदींनी श्रीफळ वाढवून बस सेवेवा शुभारंभ केला. सध्या डोंबिवलीतील या विभागात जाण्यासाठी एका माणसाला रिक्षातून प्रवास करतांना एक वेळेला कमीतकमी ४० रुपये भाडे मोजावे लागत असूनही रिक्षा मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे ही समस्या जेष्ठ नागरिक, महिलावर्गाला अतिशय त्रासदायक ठरत आहे. यामुळेच पालिका परिवहन उपक्रमाची बस सेवा सुरू करावी अशी मागणी सतत तेथील लोक करीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा