डोंबिवली : काम आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल कसा साधावा ही सुद्धा एक कला आहे. 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी 'काम जीवन आणि संतुलन' यांचा ताळमेळ कसा बसवावा यासाठी मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये ५०० सदस्यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे ३० एप्रिल २०२५ रोजी आयोजन केले. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होते व त्याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो व त्यामुळे राहणीमानाचा समतोल बिघडतो तर यासाठी काय करायला पाहिजे याच्या अत्यंत महत्वाच्या टिप्पणी संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी सरस्वती पूजन करून परिसंवादाला सुरुवात झाली. जसे काम हीच पूजा आहे तसेच घर एक मंदिर आहे व त्या घरातील सदस्य हे एकीचे बळ आहे, डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अशी सुरुवात करून मुख्य विषयाकडे वळले. प्रत्येकाकडे अंगभूत कला कौशल्य असते, आणि प्रत्येक जण ते कला कौशल्य पणाला लावून झोकून देऊन कार्यरत असतो अशा वेळी स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यासाठी ध्यानधारणा, योगा, व्यायाम करून स्वतःला आणि मनाला तंदुरुस्त ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाचे कौशल्य हे वेगळे आहे याबद्दल सांगताना डॉ. राजकुमार कोल्हे यांनी डॉक्टर आणि इंजिनिअर यांचे चपखल उदाहरण दिले. दोघेही आपापल्या कौशल्यामधे पारंगत आहेत परंतु डॉक्टर हा चालू स्थितीतले उपकरण दुरुस्त करून जीवनदान देतो, तर इंजिनिअर किंवा मेकॅनिक हा बंद स्थितीतले उपकरण दुरुस्त करून चालू करतो हाच मोठा फरक आहे की मानवाला जीवनदान देण्याचे कार्य हे डॉक्टर चे आहे तर बंद पडलेले उपकरण चालू करण्याचे काम हे इंजिनिअर चे आहे आणि एकच कला दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धिमत्तेने हाताळणे ही सुद्धा कला आणि विश्वास आहे असे वक्ते डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.
अगणित कार्य करून नाव पैसे कमावले तरी स्वास्थ्य ढळू देऊ नका, कार्य आणि जीवनाचा समतोल राखण्यासाठी दिवसातले काही तास कामासाठी आणि स्वतःसाठी ठरवून द्या. मुंबईसारख्या कामाच्या धावपळीच्या जगात मनुष्य कुठेतरी हरवला आहे की त्याचे वैयक्तिक जीवन एखाद्या मशीन प्रमाणे झाले आहे. मोठमोठे समाजसेवक, देशसेवक, यांनी स्वतःला सेवेसाठी झोकून दिले परंतु त्याचवेळी वैयक्तिक आयुष्याचा ही समतोल साधला जावा यासाठी माजी राष्ट्रपती व माजी शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे उत्तम उदाहरण दिले.
नोकरीमध्ये समाधान असेल तरच व्यक्ती जीवनात समाधानी राहू शकतो तर जीवनात समाधानी असेल तरच नोकरीमध्ये प्रगती करू शकतो अशी सांगड घालता आली पाहिजे.यासाठी जागरूक राहणे, योजनबद्द असणे, आणि सतत प्रयास करत राहणे या तिन्ही गोष्टीना अतुलनीय महत्व आहे. त्यासाठी संगीत ऐकणे, नृत्य करणे यामुळे मन आणि शरीर हलके होऊन ताजेतवाने होते व पुढील कार्य करण्यासाठी उत्साह आणि उल्हास निर्माण होतो. त्यामुळे परिसंवादाच्या मध्यंतरात 'जे एम एफ' च्या सदस्यांचे नृत्याचे धडे घेऊन सर्वांना हलके फुलके केले.
या परिसंवाद मध्ये अनेक प्रेरणादायी चित्रफिती दाखवण्यात आल्या, प्रत्येक समस्यावर उपाय हा असतोच त्यासाठी घाबरून न जाता हसत खेळत उपाय काढायचा असतो असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून लोखंडी आकडा एकमेकात अडकला असता कसा काढता येईल याची चित्रफित दाखवून समस्येवर उपायदेखील सहज सोप्या पद्धतीने मिळू शकतो असे उदाहरण सांगितले. कामाच्या वेळा आणि जीवन जगण्याच्या कला या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्व देऊन सुवर्णमध्य साधा, व आपले जीवन सुखकर बनवा असा मौल्यवान सल्ला डॉ राजकुमार कोल्हे यांनी उपस्थितांना दिला. पाण्याचे महत्व, अन्नाचे महत्व हे कितीतरी पटीने मोठे आहे असेही सांगितले. अनेकांनी प्रश्न विचारून समाधान कारक उत्तरे घेतली.
आनंदी आणि समाधानी आयुष्य जगताना कर्तव्य आणि जबाबदारी देखील आनंदाने पार पाडा असे सांगितले. आजच्या परिसंवादामध्ये अनेकाना डॉ. राजकुमार कोल्हे यांच्याकडून प्रेरणादायी विचार मिळाले व ताण विरहित काही तास मिळाले. जीवनाचा आनंद हा आंब्या प्रमाणे घ्या, आंबा हा कच्ची कैरी असताना आंबट असतो पण तोच पिकला की रसाळ गोड असतो.. आयुष्य देखील असेच आंबट गोड आहे असे सांगून सर्वांना आंबा फळ प्रदान केले. 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं..
काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं..'
जीवनाविषयीच्या सुन्दर अशा दोन ओळी गाऊन डॉ. राजकुमार कोल्हे यांनी परिसंवादाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा