भिवंडी : लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत केले आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरण कृती समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावाबाबत पदाधिकाऱ्यांना शाश्वत केले, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. तसेच या विमानतळाला आदरणीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या भूमिपुत्रांच्या तीव्र भावनांची माहिती दिली. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात काही अडचणी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढावा. तसेच आदरणीय दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत शाश्वत करावे, अशी आग्रही मागणी कपिल पाटील यांनी केली.
लोकसभेत २०१६ मध्ये सर्वप्रथम कपिल पाटील यांच्याकडून दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर झाला. तो नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर तो गृह मंत्रालयात मंजुरीसाठी गेला. गृह मंत्रालयाच्या मान्यतेनंतर संबंधित प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला, अशी माहिती कपिल पाटील यांनी या बैठकीत दिली. तसेच संबंधित प्रस्तावात अडचणी आहेत का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार असल्याचे शाश्वत केले.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर व इतर लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा समावेश होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा