डोंबिवली (कोपर) : दर वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील 'जे एम एफ' मंडपम मध्ये नव कन्या पूजन करण्यात आले. "या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेंनं संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः" पार्वती मातेची नऊ रूपे ओळखल्या जाणाऱ्या नवदुर्गा तसेच सरस्वती, लक्ष्मी, पद्मावती, या शिशु विहार मधील छोट्या बालिका नव दुर्गेच्या रूपात नटून थटून आल्या होत्या. त्याच बरोबर व्यंकटेश, भृगूऋषी, गणपती बाप्पाच्या रूपात छोटी बालके आली होती. जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये स्वर्गच अवतरला होता असे जाणवत होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शाळेच्या प्रवेश दारापासून सर्व देवी देवतांचे पाय प्रक्षाळून व त्यांचे औक्षण करून सर्वांना सन्मानाने वाजत गाजत मंडपम मध्ये आणून त्यांच्या स्थानावर विराजमान केले. नऊ देवी देवतांची शास्त्रशुद्ध पूजा करून आरती केली व सर्व देवींची साडी खण नारळाने ओटी भरली. शिशु रूपातील नव दुर्गेच्या तेजानी जणू सारा जे एम एफ मंडपम तेजोमय झाला होता. सर्व पालकांनी देखील कन्या पूजन केले. देवीच्या नवरात्र बरोबरच ही नवरात्र गिरी बालाजी म्हणजेच व्यंकटेशाची देखील आहे म्हणूनच शेष शय्येवर साक्षात बालाजी व त्यांच्या द्विपत्नी लक्ष्मी आणि पद्मावती देखील आपल्या रूपात विराजमान झाल्या होत्या. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी भृगूऋषी आणि लक्ष्मी रागाने का निघून गेली याची कथा सांगितली. शिशु विहारच्या उप मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांनी बालकांना उत्तम सहकार्य करून शिशु रूपातील देवतांनी नाटिका रंगवली.
"मातृ देवो भव, पितृ देवो भव गुरू देवो भव, आचार्य देवो भव"
ब्रह्मांडामध्ये देवांपेक्षाही सर्व श्रेष्ठ कोण असेल तर "माता पिता" म्हणूनच गणपती बाप्पाने देखील आपल्या आईवडिलांचे पूजन करून त्यांनाच तीन प्रदक्षिणा घातल्या, हेच संस्कार आपल्या पाल्यामध्ये असणे गरजेचे आहे म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांच्या भोवती परिक्रमा केली.
अनेक वेळा भगवतीने नऊ पेक्षा अधिक रूपात प्रकट होऊन वाईट शक्तींचा संहार केला आहे, आज ही निरागस दिसणारी शिशु देवींची रुपे म्हणजे आपल्या मधील षडरिपुंवर मात करून ब्रह्मचारिणी देवी संसारात राहून सुद्धा विरक्त जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगुन नऊ रूपमधील देवींची माहिती सांगितली तसेच वैकुंठपती व्यंकटेशाला देखील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी भगवतीला पाचारण करावे लागले असेही सांगितले. त्यानंतर सर्वांना नवरात्री व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
विजयादशमी म्हणजेच दसरा, रामाने रावणाचा वध करून विजयी पताका फडकवत ठेवली म्हणून आजही आपण नऊ शक्तींची पूजा करून विजया दशमीला वाईट गोष्टी नष्ट करून एकमेकांना आपट्याची पाने 'सोने' म्हणून pदेवाणघेवाण करत आलिंगन देतो, संस्कृती आणि संस्कार हे आपल्या चांगल्या विचारांवर टिकले आहेत म्हणूनच ही संस्कृती आपल्या पुढच्या पिढीनेही टिकवून ठेवावी हीच शिकवण शाळेच्या माध्यमातून देत आहोत असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले व सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी देखील देवी झालेल्या सर्व बालिकांचे कौतुक केले, तर इतर वेळी एका ठिकाणीही शांत न बसणारे हे विद्यार्थी खरोखरच संयमाने बसले आहेत तर साक्षात देवीच स्वर्गातून खाली उतरून बसल्या आहेत असा भास होत असल्याचा त्या म्हणाल्या. शिशु विहारच्या सर्व शिक्षिकांनी, पालकांनी देखील मनापासून मुलींना वेशभूषा करून सहकार्य केले. या नंतर सर्व पालक, शिक्षकांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम करून गरबा दांडिया चा खेळ रंगला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा