मुंबई : चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाऊ संगीतकार ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात बहीण अभिनेत्री विजया पंडित, संगीतकार भाऊ जतीन-ललित असा परिवार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका आणि अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या सुलक्षणा यांचा जन्म १२ जुलै १९५४ मध्ये हरियाणातील फतेहपूरमध्ये झाला. गायनाचा वारसा त्यांचे वडील प्रतापनारायण पंडित यांच्याकडूनच लाभला होता. दिवंगत गायक पं. जसराज हे त्यांचे काका होते. सुलक्षणा पंडित यांनी आपल्या वडिलांकडेच गायनाचे धडे गिरवले. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना चित्रपटात गायनाची संधी मिळाली. अर्थात, तो चित्रपट 'तकदीर' होता. या चित्रपटात त्यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरसची साथ दिली होती. या चित्रपटानंतर त्यांनी १९७१ मध्ये 'दूर का राही' या चित्रपटात गायक किशोरकुमार यांनी 'बेकरार दिल तू गाये जा' या गीतासाठी गायनाची संधी दिली. दिग्दर्शक रघुनाथ झालानी यांनी १९७५ मध्ये त्यांना 'उलझन' चित्रपटाची नायिका म्हणून घेतले. नायिका म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा