नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दावसा गावातील 'जन गण मन' कॉन्व्हेंट शाळेच्या प्रांगणात, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार एम. कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे यांची सुपुत्री जाह्नवी हिच्या विवाहानिमित्त, दिनांक ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचा उत्सवमय सोहळा पार पडला. या दरम्यान शाळेचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा, 'जे. एम. एफ. ग्रामज्योत पुरस्कार' वितरण, आरोग्य शिबिर, आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.
पहिल्या दिवशी, ढोल–ताशांच्या गजरात, ग्रामीण भागातील सर्वांना लग्नासाठी मानाच्या अक्षता व भेटवस्तू देऊन आमंत्रित करण्यात आले. स्वतः डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सहकाऱ्यांसह घरोघरी जाऊन सर्वांना विवाह आणि आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संस्थेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त, पाहुण्यांचा रजत स्मरणिका आणि लक्ष्मी-गणपती मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण जनतेसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा ठरला.
१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक श्री. भूपेंद्र भजन, व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, श्री. युवराज कोल्हे, श्री. विजय भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि स्वागत गीताने झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य आणि अभिनयातून अप्रतिम सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी डॉ. कोल्हे म्हणाले, “लग्न आधी कोंडाण्याचे आणि मग रायबाचे, हाच शिवछत्रपतींचा संस्कार आहे,” असे म्हणत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
पाच वर्षांतून एकदा दिल्या जाणारा मानाचा ‘जे.एम.एफ. ग्रामज्योत पुरस्कार’ यावेळी श्री. पवन बोंद्रे (सरपंच), श्री. योगेश नासरे, श्री. सागर दुधाने, आणि श्री. हितेशदादा बनसोड या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या या विभूतिंचा सन्मान करताना डॉ. कोल्हे म्हणाले, “स्वार्थापेक्षा परमार्थाचे कार्य करणाऱ्यांचा समाज नेहमी ऋणी असतो.”
आरोग्य शिबिर हे दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मश्री डॉ. महात्मे हॉस्पिटल व परमपूज्य श्री. नायर गुरुजी यांच्या चेतना परिवार, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. हजारो ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. २ डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी जाह्नवी आणि रोहित यांच्या साखरपुड्याचा, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम दिमाखात साजरा झाला. संपूर्ण दावसा गावासोबत रशिया आणि बेंगळुरू येथील पाहुण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
रशियाहून आलेल्या मिस रशिया आणि मिस ग्लोबल मिसेस वेल्लेरी, श्री. व सौ. इरिना आंद्रे डॅनिलोव, तसेच इम्पीरियल कॉलेज, बेंगळुरूचे चेअरमन डॉ. हरिकृष्ण मारम हे विशेष पाहुणे उपस्थित होते. परदेशी पाहुण्यांनी भारतीय परंपरेप्रमाणे साडी आणि पारंपरिक पोशाख घालून कार्यक्रमात सहभाग घेतला आणि नृत्याविष्कार सादर करून सर्वांचे मन जिंकली. याच दिवशी तुळशी विवाह देखील पार पडला. मुंबईहून आलेल्या कलाकारांमध्ये चिन्मयी साळवी (वागळे की दुनिया फेम), आयुष्य संजीव, पियुष पांडे, बलजीत पांडे, आदित्य काळे, सिद्धार्थ अखाडे, आणि सिधांत खाडे आदींचा सहभाग विशेष ठरला.
३ नोव्हेंबर रोजी सर्वांच्या प्रतीक्षेचा क्षण उजाडला. मुंबई स्थित जाह्नवी कोल्हे आणि रोहित राजगुरू यांचा विवाह सोहळा भव्य थाटात संपन्न झाला. सर्वांचे लक्ष वेधणारा क्षण म्हणजे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वतः लिहिलेला मंगलाष्टक, ज्याला रोहित राजगुरू यांनी संगीतबद्ध केले. या मंगलाष्टकाच्या सुरात संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
वराची मिरवणूक बैलजोड गाडीतून काढण्यात आली, आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पाच सुवासिनींसह औक्षण आणि पदप्रक्षालन करून स्वागत केले. सुमारे ३,००० हून अधिक लोक आणि ५० गावांचे प्रतिनिधी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. वधू-वराने एकमेकांना हार घालून पवित्र बंधनात अडकले. आई-वडील म्हणून डॉ. कोल्हे दांपत्यांनी भावनिक क्षणी आपल्या लाडक्या लेकीचा कन्यादानाचा संस्कार पूर्ण केला. भारतीय परंपरेनुसार परदेशी पाहुण्यांनी भारतीय पोशाख परिधान करून आपल्या संस्कृतीबद्दल आदर व्यक्त केला. तीन दिवसांच्या या सोहळ्यात संपूर्ण दावसा गाव रोषणाईने उजळून निघाले.
वधूचे आजी-आजोबा डॉ. मारोतराव कोल्हे व सौ. शकुंतला कोल्हे, तसेच श्री. परशुरामजी भांगे व सौ. पुष्पा भांगे यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. महेश कळंबे, श्री. विठ्ठल कोल्हे, श्री. अल्पेश खोब्रागडे, श्री. सोमेश भांगे, श्री. देवीदास सावरकर, श्री. आकाश नेहारे, सतीश कुशराम, श्री. बाबू सावरकर, श्री. नरेश पिसाट, आणि श्री. अवधूत देसाई, अनिल गुहेर, सोनू यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. श्री योगेश भाऊ भोसे यांनी जे बी. फार्म वर पाहुण्याचं मनसोक्त स्वागत केले, तसेच श्री सती अनुसया माता भक्त निवास पारडसिंगा येथे शेकडो पाहुण्यांचे निवास सोय झाली. या सर्वांचे स्वागत आहे.
शेवटी, वधूच्या पाठवणीचा क्षण सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. आई डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “सोनपावलांनी आमच्या आयुष्यात आलेली आमची जाह्नवी म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे. आता हीच लक्ष्मी सासरी जाऊन ते घर मंगलमय करणार यात शंकाच नाही.” वडील डॉ. राजकुमार कोल्हे यांनीही निशब्दपणे लेकीला आलिंगन देऊन भावूक निरोप दिला. नवरदेव श्री. रोहित राजगुरू यांनी हातात हात घेऊन आयुष्यभर विश्वास आणि प्रेम टिकवण्याचे वचन दिले.
"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी जा, लाडके सुखाने..."
या गीताच्या सुरात कोल्हे परिवाराने आपल्या लेकीला सासरी पाठवले. दुसऱ्या दिवशी हळद उतरविण्याचा कार्यक्रम आणि विविध खेळांचा आनंदोत्सव साजरा झाला, ज्यात सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा