डोंबिवली : एकेकाळचे कट्टर शिंदे समर्थक आणि आताचे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, तसेच काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत डोंबिवली जिमखाना येथे भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. हे पक्ष प्रवेश उद्धवसेना आणि काँग्रेसला धक्का देणारे असले, तरी उद्धवसेनेत येण्यापूर्वी शिंदेसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या दीपेश म्हात्रेना आपल्या गळाला लावून एकप्रकारे भाजपने केडीएमसी निवडणुकीआधी शिंदेसेनेलाही शह दिल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
डोंबिवलीतील जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. सुलभा गायकवाड, आ. नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब, राहुल दामले, मंदार हळबे, शशिकांत कांबळे, पूर्वमंडल अध्यक्ष मितेश पेणकर, पश्चिम मंडलाचे माजी अध्यक्ष समीर चिटणीस यांसह भाजपमधील अन्य मान्यवर तसेच महिला कार्यकर्त्या मनीषा राणे, वर्षा परमार, पूनम पाटील व असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपात पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये उद्धवसेनेचे माजी नगरसेवक व सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे बंधू जयेश म्हात्रे, मातोश्री रत्नप्रभा म्हात्रे, काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे, संतोष तरे, अनंता गायकवाड, रामभाऊ ओव्हळ, देवानंद गायकवाड, प्रधान पाटील, माजी नगरसेविका वैशाली केणे, अनिता कर्पे, पूजा म्हात्रे, उद्योगपती संजय गायकवाड यांनी प्रवेश केला.
केडीएमसी पालिकेला भाजपच महापौर देणार : रवींद्र चव्हाण
भाजपावर विश्वास दाखवून ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपच महापौर देईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाच्या दिशेने नेणारे पारदर्शक सरकार कोणी देऊ शकत असेल तर ते भाजप आहे. केडीएमसीतील आणखी काही नगरसेवक येत्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहितीदेखील चव्हाण यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा