BREAKING NEWS
latest

डोंबिवलीला ‘ब्लाईन्ड-फ्री सिटी’ करण्याचा संकल्प करत ‘नेत्र रक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक’ ला सुमारे १५०० नागरिकांचा सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.१६ : 'अनिल आय हॉस्पिटल', 'महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी' (MOS), 'इंडियन मेडिकल अससोसिएशन' (IMA) डोंबिवली आणि 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेत्र रक्षा - ए वॉक फॉर डायबेटीस आय अवेअरनेस' या भव्य रॅलीला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे १५०० नागरिकांनी या वॉक मध्ये आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार माननीय श्री. रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष (भाजपा) यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना आवाहन केले की, “नियमित डोळ्यांची तपासणी  करून डोंबिवलीला अंधमुक्त 'ब्लाईन्ड-फ्री' शहर बनवण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा.” तसेच त्यांनी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी' (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे या जनजागृती उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे डोंबिवली आरोग्यदृष्ट्या सक्षम होत असल्याचे सांगितले.
'अनिल आय हॉस्पिटल' च्या संचालिका व महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) चे अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी सांगितले की, “प्रत्येक डायबेटीक रुग्णाने दर वर्षी किमान एकदा तरी डायबेटीक रेटिनोपॅथीची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. उशिरा निदान झाल्यास दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो.” तसेच त्यांनी नागरिकांना डोळ्यांच्या आजाराबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) तर्फे राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘बाल नेत्र रक्षा अभियान’ जाहीर करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विस्तृत नेत्र तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
या रॅलीमध्ये डोंबिवलीतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, डोंबिवली क्लस्टर कॉलेज ३४, रोटरी व रोटरॅक्ट क्लब्स, ज्येष्ठ डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर, तसेच 'इंडियन मेडिकल अससोसिएशन (IMA), सामाजिक संस्था आणि शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात आय एम ए प्रेसिडेंट (IMA) डोंबिवली चे डॉक्टर विजय चिंचोले, श्री. किशोर मानकामे, डॉ. सुशीला विजयकुमार, श्री. प्रभू कापसे, श्री. भाई पानवडीकर  यांचीही उपस्थिती लाभली.
नागरिकांच्या या मोठ्या प्रतिसादामुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, हा उपक्रम डोंबिवलीला अंधमुक्त शहर (ब्लाईन्ड-फ्री सिटी) करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले. आगामी काळातही अशा जनजागृतीद्वारे नागरिकांचे डोळे आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे 'अनिल आय हॉस्पिटल' च्या संचालिका व महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांच्या तर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत