कल्याण : दिग्दर्शक संतोष डावखर यांनी आपल्या दिग्दर्शनातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला आधुनिक रुप देत ती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'गोंधळ' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून 'डावखर फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन कथा आणि कलात्मक आणि दर्जेदार सादरीकरणासाठी ओळख निर्माण करणारा 'गोंधळ' हा सिनेमा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा सूक्ष्म वेध घेणारा हा चित्रपट भारतीय सरकारतर्फे आयोजित केलेल्या गोव्यातील ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शन' मध्ये निवडला गेला आहे. चित्रपटाच्या घोषणे पासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
या चित्रपटाबाबत लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतल्या अत्यंत पारंपरिक, धार्मिक आणि कलात्मक घटक असलेल्या 'गोंधळ' या परंपरेवर आधारित सिनेमाची कहाणी आहे. या परंपरेचा सन्मान राखत, चित्रपटगृहाबाहेर पारंपरिक गोंधळी मंडळींनी खास विधीपूर्वक अभिषेक करून चित्रपटाचा शुभारंभ केला. गोंधळातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवांच्या नावाचा जयघोष करत या मंडळींनी 'गोंधळ' चित्रपटाचा आनंद घेतला.
'गोंधळ' या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली लोककला, श्रद्धा, आणि संस्कृती यांचा समृद्ध आविष्कार आहे. 'गोंधळ' या चित्रपटाची कथा पारंपरिक गोंधळ विधीच्या पार्श्वभूमीवर उलगडते. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी होणारा गोंधळ हा धार्मिक विधी असला, तरी चित्रपटातून मानवी भावना, श्रद्धा आणि समाजातील बदलत्या विचारसरणींचा वेध घेतला आहे.
हा चित्रपट पाहतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात आल्या. आजवर मराठी सिनेमात अभावानेच दिसणारी गोष्ट म्हणजे कलात्मकतेसोबतच तांत्रिक बाबींमध्येही जणू नवा मापदंड निर्माण केला आहे. कॅमेऱ्याचे अप्रतिम दृष्यबंध, उत्कृष्ट छायाचित्रण, परिपूर्ण संपादन आणि जागतिक दर्जाच्या ध्वनीमिश्रणामुळे 'गोंधळ' हा चित्रपट पाहाताना एक दृश्य-सांस्कृतिक मेजवानी ठरला आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, "प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम अवर्णनीय आहे. आम्ही 'गोंधळ' हा चित्रपट पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने केला आणि आज प्रेक्षकांच्या प्रतिसादातून ते प्रेम परत मिळत आहे, यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रेक्षकांना 'गोंधळ' आवडत आहे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे." गोंधळ' म्हणजे आपल्या मातीतली आणि संस्कृतीतली कहाणी आहे. आत्मा, लोककलेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम यात प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, परंपरा आणि विधींना आम्ही एका नव्या दृश्यात्मक रूपात मांडण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटामागे एक समर्पित आणि कल्पक टीम कार्यरत आहे. प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक सूर हा आपल्या संस्कृतीचा स्पंदन अनुभवायला लावेल. 'गोंधळ' प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही, तर एक भावनिक आणि भव्य अनुभव देईल, जो मनात बराच काळ रुंजी घालेल, याची मला खात्री आहे."
नुकतेच प्रदर्शित झालेले 'कांतारा' आणि 'दशावतार' यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच 'गोंधळ'ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात 'कांतारा' मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात 'दशावतार' ला मोठे स्थान आहे. मात्र 'गोंधळ' ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे. 'कांतारा' आणि 'दशावतार' च्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. 'गोंधळ' ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे.
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, माधवी जुवेकर, सुरेश विश्वकर्मा असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत, संतोष डावखर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, दीक्षा डावखर सहनिर्माती आहेत.
बऱ्याच कालावधीनंतर एक छान आणि चांगला, हटके विषय घेऊन हा चित्रपट आपल्या भेटीस आलेला आहे .'गोंधळ' च्या इंडियन पॅनोरमामध्ये झालेल्या निवडीमुळे मराठी सिनेमाला नवी ओळख मिळाली आहे. चाहत्यांची उत्सुकता पाहता अंधश्रद्धेचा सूक्ष्म वेध घेणारा हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत नवीन मापदंड प्रस्तापित करू शकेल यात काही शंका नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.त्यातून आपल्या कुळाचाराबद्दल आणि परंपरेबद्दल नक्कीच आदर निर्माण होऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा