नवी दिल्ली : देशात निवडणूक वातावरण चांगलेच तापले असताना राजधानी दिल्ली सोमवारी सायंकाळी भीषण स्फोटाने हादरली. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १. बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्ब स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. जखमींना तातडीने एल.एन.जेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोट स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता झाला. स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली, आसपास उभ्या असलेल्या काही वाहनांना देखील आग लागल्याने काही क्षणांतच भगदड माजली. परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
*राजधानी दिल्लीत "हाय अलर्ट.."*
घटनास्थळी तातडीने दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक तज्ज्ञ, तसेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एन एस जी) यांचे पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे. परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून प्राथमिक तपासात स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही. घटनास्थळावरून काही संशयास्पद अवशेष आणि सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आले आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “स्फोट अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. दोषींना वाचू दिले जाणार नाही,” असे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले. या भीषण घटनेमुळे दिल्ली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा