कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'सार्वत्रिक निवडणूक सन २०२५' मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सहाय्यक संचालक नगर रचना, महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १२२ इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या ३१ असून तीन जागांचे ०२ प्रभाग व चार जागांचे २९ प्रभाग आहेत.
१२२ जागापैकी १२ जागा अनुसूचित जाती, ०३ जागा अनुसूचित जमाती, ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ७५ जागा सर्वसाधारण असून त्यापैकी ६१ जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी ०६ जागा अनुसूचित जाती (महिला), ०२ जागा अनुसूचित जमाती (महिला), १६ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि ३७ सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.
"आरक्षण सोडत बाबत १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर होणार नागरिकांच्या हरकती.."
सदर आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप (ड्राफ्ट) प्रसिद्ध केले जाणार आहे.
नागरिकांना १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर होणार हरकती व सूचना निवडणूक कार्यालय, मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा