डोंबिवली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विकासाभिमुख राजकारण व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि अचूक निवडणूक नियोजन यांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात प्रथमच नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक निकालात अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मुखातून देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीचा नेहेमी होणार आदरार्थी उल्लेख हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी सार्थ ठरवला. यंदाच्या निवडणुकीत प्रचारगीतातून गाजलेले "तुमची आमची भाजपा सर्वांची" हे बोल महाराष्ट्रातील जनतेने खरे करून दाखवले, हे या निकालावरून सिद्ध झाल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रविंद्र चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर अतिशय शिस्तबद्धपणे आणि संयम व आक्रमकपणाच्या अनोख्या शैलीतून महाराष्ट्र पिंजून काढला. यादरम्यान अनेक दिग्गज नेते त्यांनी भाजपात आणले. कोकणात वर्चस्व असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचा खरंतर या निवडणुकांच्या निमित्ताने कस लागला, त्यात रविंद्र चव्हाण पैकीच्या पैकी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात अनेक ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी भाजपाची लढत होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या चातुर्यामुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्यामुळे अनेक ठिकाणी लढत जिंकली.
मात्र त्याचवेळी राज्यात सत्तास्थानाला किंवा महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचं गणित देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांनी एकत्रितपणे अचूक सोडवले. याबरोबरच उद्धव सेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीला भाजपने त्यांची जागाही दाखवली असे दिसते. श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेले रविंद्र चव्हाण यांचे प्रेम व तिरस्कार असे दुहेरी संबंध गेल्या काही दिवसांतील भाजपा पक्ष प्रवेशामुळे अधिक गहिरे होतील का?, अशी शक्यता निकालांमुळे झाली आहे. जानेवारीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या बाबतीतही देवेंद्र-रविंद्र यांची किमया चालेल अशीच शक्यता अधिक असल्याने मात्र महायुतीतील सहकारी पक्ष आता कशी व्यूहरचना करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा