BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये साकारला गेला 'प्रतिकृती काला घोडा' महोत्सव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२० - कला आणि संस्कृतीचा संगम असणारे शहर म्हणजे मुंबई. सर्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकारांना वाव मिळवून देणारा 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन दर वर्षी मुंबई येथे होत असते. त्याचीच प्रतिकृती डोंबिवली शहरांमधील 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये दिनांक २० जानेवारी रोजी ब्रह्मा रंगतालय प्रांगणात 'काला घोडा महोत्सव' मोठ्या दिमाखदार रीतीने पार पडला.
 एक आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणारी 'जे एम एफ' संस्था म्हणजे उभरत्या कलाकारांना कलेचे दालन उघडून देणारे प्रवेशद्वारच होय. दिनांक १९ जानेवारी रोजी 'जे एम एफ' रोजगार मेळाव्याचे (जॉब मेळा) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ३३ कंपन्या व ३५० च्या वर उमेदवार उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या संकल्पनेतून 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सरस्वती, नटराज व गणेश पूजन करून व पाहुण्यांचे स्वागत करून संस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या व कलाकार श्रीमती बॉस्की मॅडम यांनी आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतुक केले.
'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मधील अनेक विध्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीने अनेक प्रकारचे प्रकल्प   हस्तकलेने बनवून आणले होते तर हस्तकलेने रेखाटलेले चित्रफलक (कॅनव्हास पेंटिंग) हे काला घोडा महोत्सवाचे खास आकर्षण होते .  त्याच बरोबर हस्तकलेने तयार केलेला काला घोडा देखील संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा करण्यात आला होता.संपूर्ण महोत्सव हा चल चित्राने साजरा होत होता. 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळेमधील इयत्ता सहावीत शिकत असलेला विद्यार्थी  कु. अर्णव डोंगरे सुबक रित्या गणपती बाप्पाचे चित्र रेखाटत होता तर मूर्तिकार मग्न होऊन मूर्ती घडवण्याचे कार्य करत होते, हातावर मेहंदी काढणे, चित्र काढून त्यामध्ये रंग भरण्यात सगळे कलाकार मग्न झाले होते. प्रमुख पाहुण्या श्रीमती बॉस्की मॅडम यांनी देखील संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे चित्र रेखाटले .
कलात्मक शिक्षिका दीपा तांबे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, अभिषेक देसाई, नरेश पिसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व मुलांनी काला घोडा महोत्सवासाठी अथक परिश्रम घेऊन नाविन्य पूर्वक प्रकल्प बनवले. संपूर्ण ब्रह्मा रंगतालय प्रांगण हे विविध कलात्मक साहित्याने भरून गेले होते. ब्रह्मा रंगतालयाच्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी आणि उभरते कलाकार गायक शिक्षक नितेश मेस्त्री यांनी नाट्यसंगीत सादर करून इयत्ता चौथी मधील व जाई या विद्यार्थिनीने नाट्य संगीतावर आपल्या कथक नृत्यातून गणेश वंदना सादर केली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिग्दर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्य नाटक सादर केले. तसेच पदवी महाविद्यालय चे प्रोफेसर श्री.योगेश शिरसाट यांनी वासुदेवाचे रूप धारण करून "वासुदेव आला".. हे नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता तिसरी चौथी मधील विद्यार्थ्यांनी गायन करून आपली कला सादर केली तर इयत्ता सातवी मधील कार्तिक या विद्यार्थ्याने उत्कृष्ट तबला वाजवून सर्व उपस्थितांना आनंद दिला. सौ.कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षिकानी काव्य वाचन सादर केले.
'जन गण मन' शाळा व्यतिरिक्त डोंबिवली मधील अनेक बाहेरच्या शाळांनी या महोत्सवाला हजेरी लावून आनंद घेतला. कला ही माणसाला जिवंत ठेवते तर कलाकार हा आपल्या कलेतून इतरांना जिवंत ठेवतो असे सांगत असतानाच, अंगी कला असणारा माणूसच केवळ जगण्याची कला साध्य करू शकतो, असे सांगत संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे पुढे म्हणाले की, कलाकार हा नेहमी पैशापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा भुकेलेला असतो, कोणत्याही कलाकाराला मनापासून दाद मिळाली की ती दाद त्याच्या मध्ये असलेल्या अंतर्गत भावने पर्यंत  पोहचते, आणि त्याची कला तप्त सोन्या प्रमाणे निखारते. खरोखरच अभिमान वाटतो की आज हे कलादालन केवळ एकाच कलेने भरलेले नाही तर यामध्ये असंख्य कलांचा संगम आहे. हस्तकला, चित्रकला, तैलचित्र, रांगोळ्या, मेहंदी सारख्या या कलांचा संगम म्हणजे कलाकारांना दिलेली मानवंदनाचं होय असेही उदगार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले व कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल सहभागी कलाकारांना पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
'काला घोडा'  हे जरी महोत्सवाचे नाव असले तरी आमच्या शाळेतील मुलांची घौडदौड ही एखाद्या चेतक घोड्याप्रमाणेच आहे, आणि म्हणूनच नवनवीन प्रकल्प सादर करताना उत्साह आणि आनंद हा द्विगुणित होत असतो असे उद्गार संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले. सर्व उपस्थितांनी रेलचेल असणाऱ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. खजिनदार जान्हवी कोल्हे, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काला घोडा प्रदर्शनाला भेट देऊन मनोमन आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौं. श्रेया कुलकर्णी व प्रो.एकनाथ चौधरी यांनी केले तर वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत