BREAKING NEWS
latest

मुख्यमंत्री यांना थेट निवेदन देत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) चे आयुक्त अभिनव गोयल यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत सुजाण नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात लेखी निवेदन सादर केले आहे. शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम, बकाल रस्ते, आरोग्य सेवेची दयनीय अवस्था आणि प्रशासनातील कथित ढिसाळ कारभार यावर संताप व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, केडीएमसीमध्ये निवडणुका होण्यापूर्वी प्रशासक म्हणून कार्यरत असताना आयुक्तांच्या काळात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. उलट नागरी सुविधांचे “तीन तेरा” वाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे.

आरोग्य सेवांबाबतही गंभीर आरोप करण्यात आले असून, पालिकेच्या रुग्णालयांत सर्दी-खोकल्यापलीकडे उपचार मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच पालिका शाळांचा दर्जा घसरल्याने गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील खोदून ठेवलेले रस्ते, गटारांची दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. काही कर्मचारी गैरहजर राहूनही पगार घेत असल्याचे, तर राजकीय पाठबळ असलेले कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे आयुक्तांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, केडीएमसीमध्ये शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी कडक प्रतिमेचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लक्ष्मण हजारे, दिलीप मगर या नागरिकांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत