BREAKING NEWS
latest

कारखाने आणि व्यावसायिक कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पेट्रोल पंपावरून इंधन खरेदीस बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : केंद्र सरकारने इंधनाच्या वितरणाबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. आता मोठ्या ग्राहकांना केवळ मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या ठिकाणांहूनच इंधन खरेदी करावे लागेल. कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना किरकोळ विक्री केंद्रातून इंधन मिळणार नाही. त्याचबरोबर सामान्य ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त २०० लीटर डिझेलच खरेदी करू शकतील. हे डिझेल पुन्हा विकण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

देशाच्या काही भागांमध्ये किरकोळ पंपांवर अचानक वाढलेली असामान्य विक्री लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. ही बंदी सुरुवातीला ९० दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांसाठी इंधनाची कमतरता भासणार नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाने ‘मोटर स्पिरिट ऍण्ड हाय स्पीड डिझेल (टेम्पररी रेग्युलेशन ऑफ सप्लाय थ्रू रिटेल आउटलेट्स) ऑर्डर, २०२६’ जारी केला आहे. यानुसार, आता कोणतीही फॅक्टरी, व्यावसायिक संस्था किंवा मोठ्या संस्था सामान्य गाड्यांसाठी असलेल्या पेट्रोल पंपावरून डिझेल-पेट्रोल खरेदी करू शकणार नाहीत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या ग्राहक पंपावरून किंवा निश्चित केलेल्या बल्क सप्लाय चॅनेलद्वारेच इंधन घ्यावे लागेल.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशाच्या काही भागांमध्ये किरकोळ पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची विक्री अचानक खूप वाढली होती. तपासात असे समोर आले की किरकोळ आणि घाऊक किमतींमध्ये मोठा फरक असल्यामुळे कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांनी घाऊक इंधन मागवणे बंद केले आणि ते थेट सामान्य पेट्रोल पंपांवरून गाड्या पाठवून इंधन खरेदी करू लागले. यामुळे सामान्य जनतेसाठी इंधनाच्या तुटवड्याचा धोका निर्माण होत होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत