BREAKING NEWS
latest

भारत निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य असल्याचे स्पष्ट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास १२ प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फ छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठयांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील १२६४ जणांकडून अग्निशस्त्रे जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांकडून दक्षता घेण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीतील १२६४ जणांची अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एकीकडे निवडणूक प्रचारापासून प्रक्रिया संपेपर्यंत अर्थात निकाल घोषित होईपर्यंत कुठेही हिंसाचाराचे गालबोट लागून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांनी अग्निशस्त्र जप्तीची कारवाई केली आहे. तर दुसरीकडे पोलीस रेकॉर्डवरील १०३३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ - ३ च्या हद्दीत कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली असे चार विधानसभा मतदारसंघ येतात. सार्वत्रिक विधानसभा निवडणूका २०२४ ची आदर्श आचारसंहिता मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असा निवडणूकीचा कार्यक्रम आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलीस परिमंडळ - ३ हद्दीतील ८ पोलीस ठाण्यांनी  अग्नीशस्त्रे जप्तीसह पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईस सुरूवात केली आहे.

कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीत १ हजार ३८५ जणांकडे परवानाधारक अग्निशस्त्र आहे. या सगळ्यांनी पोलीस परवानगी घेऊन अग्निशस्त्रे बाळगली आहेत. १५ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलीसांनी १ हजार ३८५ पैकी १२६४ जणांकडील अग्निशस्त्रे निवडणूक काळापुरती जप्त केली आहे. अग्निशस्त्र जप्तीच्या कारवाईत राजकीय मंडळीची संख्या जास्त आहे.

कल्याण पोलिस परिमंडळ - ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणात बाजारपेठ, महात्मा फुले चौक, खडकपाडा आणि कोळसेवाडी, तसेच डोंबिवलीतील रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर आणि मानपाडा अशा आठही पोलीस ठाण्यांनी अग्निशस्त्र जप्तीसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान १ हजार १६५ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी ५९३ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे ११९ जणांच्या विरोधात अजामीनपात्र स्वरूपाची कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ हजार ३३ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी ८७१ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विविध स्वरूपाच्या कारवाईत सीआरपीसी, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अद्याप १६२ जणांवर कारवाई करणे बाकी असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. या नोटीसा प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपापल्या हद्दीतील राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बजावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण स्वतः किंवा आपले हस्तकाकरवी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या असे कोणतेही कृत्य करू नये की, ज्यामुळे कोणताही दखलपात्र गुन्हा होईल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल. आपणास सुचित करूनही जर आपण स्वतः किंवा आपल्या हस्तकाकरवी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कोणतेही कृत्य केल्यास त्याची जबाबदारी संपूर्णपणे आपल्यावर राहील. आपल्या विरूध्द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे दिलेल्या नोटीसचा भंग केल्यास भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाचे बेकायदा इमारती उभारणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : बांधकाम परवानगीशिवाय बांधकाम करून लोकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करा, असे आवाहन करत उच्च न्यायालयाने एका विकासकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. विकासकाने एका व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता हडप करून त्यावर बेकायदा इमारत उभारली होती. परवानग्या मिळाल्याचे खोटे सांगून लोकांना फ्लॅट विकले. अशा प्रकरणांत पोलीसांनी विकासकाला ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. कारण फसवणूक करणाऱ्या विकासकांबरोबर सरकारी अधिकारीही सहभागी असतात, असे न्यायाधीश राजेश लड्डा यांच्या एकलपीठाने म्हटले.

अनधिकृत बांधकाम प्रकल्प वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या नियमांना बगल देण्यात येते. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. बनावट परवानग्या मिळवणे, प्रकल्पाच्या स्थितीची चुकीची माहिती देणे, यासह अनेक बाबींचा समावेश आहे. या कृतींचा परिणाम जमीन, सदनिका खरेदीदारांवर होतो. कायदेशीर, आर्थिक धोका निर्माण होतो, असे उच्च न्यायालयाने म्हटले. या बेकायदा कामांचा विक्री करार नोंदणी करून, पालिकेकडे प्रीमियम भरून नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. याचा नागरिकांवर परिणाम होतो. त्यामुळे चुकीचे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजीच्या आदेशात म्हटले आहे. 

तपासात अडथळे येतील, रेकॉर्डवरून अर्जदाराचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून येते, असे म्हणत न्यायालयाने अनेक वर्षांपासून बेकायदा इमारतींना परवानगी देण्याच्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इमारतीचे बांधकाम 'अनधिकृत' का राहिले? याची चौकशी करण्यासाठी आणि फसवणुकीचा प्रकार उघड करण्यासाठी विकासकांच्या कोठडीची आवश्यकता आहे. हा तपास सुरूवातीच्या टप्प्यावर आहे आणि अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपासात अडथळे निर्माण होतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण ?

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याची डोंबिवली येथे ३४ गुंठे वडिलोपार्जित जागा आहे. मात्र, मेसर्स 'श्री स्वस्तिक होम'चे मयूर भगत याने ही जागा हडप केली. तसेच खोट्या परवानग्या घेऊन त्याठिकाणी इमारतही उभारली. त्यानंतर या इमारतीमधील सदनिका विकण्यात आल्या होत्या.

आघाडीच्या गाडी मध्ये बिघाडी तरीही चालकाच्या सीटसाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेससह विरोधकांवर टीका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत, ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रुप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी खरमरीत टीका महाविकास आघाडीवर पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान मोदी यांनी नाशिक आणि धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीरसभेत काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष्य केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ”महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचे अडीच वर्षांचे शासन बघितले आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटले. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचे काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध आणि एकजूट होण्याची गरज आहे".

“महायुती सरकारच्या केंद्रस्थानी महिला आहेत. कारण महिलांचा विकास झाला, तरचं समाजाचा विकास होतो. त्यामुळे आम्ही महिलांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही लाडकी बहीण सारख्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहीण योनजेची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरात सुरु आहे. मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघाडी नेते ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांचे काही लोक न्यायालयातही जाऊन आले. त्यांना महिलांचा होत असलेला विकास पचणी पडत नाही”, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.

“काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वंचितांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण दिलं. त्यानंतर इंदिरा गांधींनीही एससी, एसटींना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी प्रयत्न केले. एससी, एसटी, ओबीसी हा समाज मजबूत आणि साक्षर झाला तर काँग्रेसच्या राजकारणाचं दुकान बंद होईल ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते त्यांच्या आरक्षणाला विरोध करतात”, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.

महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यावर्ती निवडणूक कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीची संधी दिली असून २४ तास उपलब्ध असणाऱ्या आणि सुख दुःखात धावून येणाऱ्या राजेश मोरे यांच्यासारख्या सामान्य  कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी  केले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 
 शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले.  यावेळी पुरोहितांनी केलेल्या मंत्रोच्चारामुळे इथले वातावरण अधिकच मंगलमय झाले होते. 
राजा का बेटा राजा नही बनेगा - खासदर डॉ.श्रीकांत शिंदे

आपल्या पक्षामध्ये राजेश मोरे यांना संधी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण आहे. तर राजा का बेटा राजा नही बनेगा, यानुसार सगळीकडे कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन विकास करण्याचे काम करतोय, महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले असून यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या जागा १०० टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला. 

२४ तास उपलब्ध असणारा आमदार पाहिजे

तर राजेश मोरे यांना भेटायला कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज भासत नाही. आमदार म्हणून निवडून आल्यावरही त्यांची अशीच कार्यपद्धती राहणार असून आपल्याला २४ तास उपलब्ध असणारा आणि आपल्या सुख दुःखात धावून येणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असल्याचे मत खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त करत राजेश मोरे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेण्याची गरज व्यक्त केली. 
कल्याण ग्रामीणचा गड परत मिळवायचा आहे - राजेश मोरे

यावेळी उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुती अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांनी सांगितले की आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. हा कल्याण ग्रामीणचा गड दोन वेळा आपल्या हातून गेला असला तरी तो परत मिळवायचा आहे. मेहनत करा, लोकसभेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी जशी रात्रंदिवस मेहनत घेतली, तशाचप्रकारे आपल्याला मेहनत करावी लागेल असे आवाहन राजेश मोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. 

महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, रवी मट्या पाटील, जितेन पाटील, भाजप कल्याण ग्रामीणचे महेश पाटील, माजी उप-महापौर मोरेश्वर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. ब्रह्मा माळी, महिला आघाडीच्या प्रमुख लताताई पाटील, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, अर्जुन पाटील, रमाकांत पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, कल्याण ग्रामीणचे नंदू परब, शैलेश पाटील, यांच्यासह शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी रिपाइंचे सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऐन निवडणुकीत महागाईचा भडका उडत लसूण ५०० रुपये पार तर कांदा ८० रुपये किलो होत भाज्यांचे भावही कडाडले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्यात निवडणुकीसोबत भाज्यांचे भावही तापू लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ बाजारात लसूण ५०० रुपये दराने विकला जात आहे तर कांदा ८० रुपये किलो झाला आहे. हिवाळ्यात येणारा वाटाणाही २५० रुपये पार झाला आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या या भाववाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे तर महिलांचे बजेट कोलमडले आहे.

मागच्या आठवड्यात बाजार समितीत कांदा १८ ते ४८ रुपये किलो दराने विकला जात होता. हाच कांदा आता ३५ ते ६२ वर पोहचला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो झाला आहे. दोन आठवडे कांदा दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर वाशी सेक्टर-१७ या उच्चभ्रू वसाहतीमधील मार्केटमध्ये हेच दर १०० रुपये प्रतिकिलो एवढे आहेत. परतीच्या पावसाचा फटका कांदा उत्पादनावर झालेला दिसत आहे. यामुळे कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे.

किरकोळ बाजारामध्ये लसूण ५०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. नवीन वर्षात नवीन पीक बाजारात येईपर्यंत लसूणची भाववाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे.

वाटाणा, हिरव्या भाज्यांचे भावही वाढले

हिवाळ्यात येणाऱ्या वाटण्याचेही भाव महागले आहेत. बाजार समितीमध्ये वाटाणा १६० ते २०० रूपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात वाटण्याचा दर २५० रूपये प्रतिकिलो पर्यंत पोहचले आहेत. बाजारात हिरव्या वाटाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची जुडी ३० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर लसूणचे दरही कडकडले आहेत. बुधवारी बाजार समितीमध्ये लसूण २२० ते ३२० रुपये किलो दराने विकला जात होता. शेवग्याच्या शेंगाचे दर किरकोळ बाजारात १३० रूपयांवर पोहचले असून वालाच्या शेंगा १२० रुपयांना विकल्या जात आहेत.

गुन्हे शाखा युनिट-३ कल्याणच्या पोलीसांनी डोंबिवलीत तडीपार गुंडासह चॉपर ने दहशत माजवणाऱ्या दोघांना केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील उपद्रवी गुंड-गुन्हेगारांचा बंदोबस्त करत आहेत. या अनुषंगाने पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे.

कल्याण क्राईम ब्रँचच्या युनिट-३ ने डोंबिवलीत घातपात घडविण्याचा डाव हाणून पाडला आहे. दहशत माजवण्यासाठी धारदार चॉपरचा खुलेआम वापर करणाऱ्या दोघा गुंडांचा गुन्हे शाखेच्या कर्तबगार पोलीसांनी कणा मोडून काढला आहे. विशाल मुकेश उर्फ संदीप जेठा (वय: २१ वर्षे) आणि कुणाल इतवारी बोध (वय: २३ वर्षे) दोघे राहणार त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी, शेलार नाका, डोंबिवली (पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. तसेच रामनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हद्दपार केलेला गुंड अतुल उर्फ कुंदन बाळू अडसूळ (वय: ३० वर्षे), राहणार इंदिरानगर झोपडपट्टी डोंबिवली (पूर्व) हा त्याच्या घरी पत्नी व मुलीला लपून-छपून भेटायला आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले आणि सतीश सोनवणे यांना त्यांच्या खासगी गुप्तहेरांकडून धक्कादायक माहिती मिळाली की एसबी शेलार नाक्याजवळ दोन तरूण यामाहा आर१५ दुचाकीवर आले आहेत. त्यातील मागे बसलेल्याच्या हातात भला मोठा धारदार चॉपर असून हे दोघे परिसरात दहशत निर्माण करत फिरत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना देण्यात आली. शिंदे हे स्वतः तात्काळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्यासह पोशि. सतीश सोनवणे, प्रशांत वानखडे, विलास कडू, अनुप कामत, सचिन वानखडे, विजेंद्र नवसारे, वसंत चौरे, ज्योत्सा कुंभारे, मीनाक्षी खेडकर या त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पथकाने क्षणाचाही विलंब न लावता दोघांची धरपकड केली. त्यांच्याकडून २५ इंच लांबीचा चॉपर हस्तगत करण्यात आला.

या दोन्ही गुंडांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ९५०/२०२४ शस्त्र अधिनियम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही गुंड आरोपी रामनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल रॉबर आणि सराईत चोर म्हणून गुन्हेगार आहेत. यांच्याकडून एकूण २ लाख ५३० रुपये  किंमतीची यामाहा कंपनीची आर१५ दुचाकी व दोन्ही बाजूने धार असलेला लोखंडी चॉपर, असा मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्यांना रामनगर पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. या गुंडांचा उपद्रव संपुष्टात आल्यामुळे परिसरातील त्रस्त रहिवासी, व्यापारी आणि दुकानदारांनी पोलीसांचे कौतुक केले.

तसेच बुधवारी सायंकाळच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील पोलीस उपायुक्तांनी १८ महिन्यांकरिता हद्दपार अर्थात तडीपार केलेला नामचीन गुंड अतुल उर्फ कुंदन बाळू अडसूळ (वय: ३० वर्षे), रा. इंदिरानगर झोपडपट्टी डोंबिवली (पूर्व) हा त्याच्या घरी पत्नी व मुलीला लपून- छपून भेटायला आल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्यासह सतीश सोनवणे, प्रशांत वानखडे, विलास कडू, अनुप कामत, सचिन वानखेडे, विजेंद्र नवसारे, वसंत चौरे यांनी घराभोवती वेढा घालून या गुंडाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ०९५५/२०२४ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा  नोंदवून त्याला पुढील कारवाईसाठी डोंबिवली पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण च्या पोलीसांनी कर्तव्यदक्ष राहून केलेल्या कारवाईचे वरिष्ठांकडून व सर्व स्तरातील नागरिकांकडून स्वागत व कौतुक होत आहे.