BREAKING NEWS
latest

'जन गण मन' इंग्लिश (कॉन्व्हेन्ट) शाळेमध्ये रंगला वार्षिक स्नेहसंमेलनचा दिमाखदार सोहळा व मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : महाराष्ट्राची उप राजधानी नागपूर येथील दावसा येथील 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन कॉन्व्हेन्ट शाळा येथे दरवर्षी प्रमाणेच मुलांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी देखील वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. सकाळी अकरा ते तीन च्या सत्रात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अंतर्भूत असलेल्या कलेची चुणूक दाखवून सर्व उपस्थित पालकांचे तसेच  पाहुण्यांचे मन जिंकले. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक सर्वेसर्वा माननीय  डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे , खजिनदार जान्हवी कोल्हे,  नागपूर शाळेतील निवृत्त मुख्याध्यपक श्री.परशुराम जी भांगे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पा भांगे, दावसा गावचे प्रतिष्ठित डॉकटर व डॉ.राजकुमार कोल्हे यांचे पिताश्री डॉ. मारोत राव कोल्हे, व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, मुख्याध्यापक श्री. भजन सर, तसेच मुंबई मधील शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अमोद वैद्य, श्री.अल्पेष खोब्रागडे सर्व शिक्षक व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे नैसर्गिक पान फुलांनी तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन केले. संवादिनी साथ मुंबईच्या संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी यांनी केली.
सर्व लहान मुलांचे नृत्य बघुन डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांचे खूप कौतुक केले. मुंबई ही मायानगरी आहे, अनेक जण स्वप्न उराशी बाळगून त्या मायानगरीत प्रवेश करतात, परंतु त्या स्वप्नाची नाळ ही आपल्या मातीशी जुळलेली असते, त्यासाठी इथे तुम्ही अपार कष्ट करा, अभ्यास करा, आणि आपल्या शाळेचे, गावाचे नाव उज्वल करून मुंबई सारख्या महानगरी, मायानगरीत पुन्हा पंख पसरून यशाच्या आनंदाची चव चाखा असे संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगितले. बालवयात आपल्या स्वप्नांना आकार नसतो, क्षणाक्षणाला आपली स्वप्ने बदललेली असतात, त्याच स्वप्नांना आकार देण्याचे काम हे आपले शिक्षक करत असतात, आज सर्वांनी खूप छान नृत्य, गायन, नाटकाचे सादरीकरण केले. यामधील प्रत्येकजण कोणत्याही कला विश्वात आपले नाव उज्वल करू शकतो, तर आज आम्ही सुद्धा हे वार्षिक स्नेह संमेलन बघत असताना आमच्या बालवयात जाऊन रमलो आणि आनंद घेतला असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी व्यक्त केले. खजिनदार व दिग्दर्शिका जान्हवी कोल्हे यांनी भविष्या मध्ये दावसा या गावी एखादा सिनेमा दिग्दर्शित करून सर्व मुलांना त्या सिनेमात काम करण्याची संधी देऊ करणार अशी ग्वाही सर्व मुलांना दिली तेव्हा सर्व मुलांनी आनंदाने जल्लोष केला. सर्व मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस वाटप करून शाबासकी दिली. सूत्रसंचालन मयुरी जराहे व विद्यार्थ्यांनी केले तर सर्व शिक्षकांनी उत्तम आयोजन केले.
सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य या भावनेतून डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी यावर्षी देखील जन गण मन कॉन्व्हेन्ट शाळेच्या प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप आयोजित केले होते. नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेह या सारख्या अनेक शारीरिक आजारांचे तज्ञ डॉक्टरांचे पथक या शिबिरात सहभागी झाले होते. जवळपास दोन हजार दावसा रहिवाशांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. महात्मे यांनी नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी ५६ रुग्णांना दिनांक २ जानेवारी २०२५ ची तारीख दिली. परमपूज्य नायर गुरुजी, चेतना परिवार नागपूर, १० तज्ञ डाक्टर व २० च्या वर  मदतनीसांनी देखील हातभार लावून सामाजिक जबाबदारी पार पाडली. सर्व दावसा व २५ गांवच्या ग्रामीण रहिवाशांची उत्तम भोजनाची व्यवस्था करून त्यांना ब्लँकेट, थाली, दुपट्टा वाटप करण्यात आले.

कोपर गावातून सांता क्लॉज चोरीला गेल्याची घटना उघड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३१ : डोंबिवली पश्चिमेकडील कोपर गावात नवं वर्षाच्या स्वागतासाठी लहान मुलांनी सांता क्लॉज चा पुतळा बनवला होता. ३१ डिसेंम्बर ला रात्री १२ वाजता नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी सांता क्लॉज सह वाईट प्रवृत्तीचं तसेच सवयीचं दहन करून याचाच अर्थ की वर्ष अखेरीला सांता क्लॉज आपल्यासोबत सगळं वाईट घेऊन जातो व नवीन येणाऱ्या वर्षासाठी चांगला मार्ग मोकळा करतो अशी मुलांची गोड समजूत असते. 

तर मुलांनी बनवलेला सांता क्लॉज चा पुतळा दिनांक ३० रोजी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे कोपरच्या शिवसेना शाखा क्रमांक ६५ चे माजी नगरसेवक संजय पावशे आणि ज्येष्ठ नागरिक तथा सामाजसेवक सुभाष गायकवाड यांनी सांगितले. यामागील पुतळा चोरट्यांचा काय उद्देश असल्याचे अध्याप स्पष्ट झाले नाही. डोंबिवली सारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत शहरात वाढती गुन्हेगारी तसेच होणाऱ्या चोऱ्या व घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालावा असे माजी नगरसेवक संजय पावशे यांनी म्हटले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावयायिक विमानाचे लँडींग यशस्वी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबई : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज इंडिगो एअरलाइन्स चं ए३२० विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे. अग्निशमन दलाकडून विमान लँड झाल्यानंतर विमानाला पाणी फवारून सलामीही देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामंही पूर्ण झालेली आहेत.

महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी २९५ आणि सुखोई ३० या विमानांचे येथे लँडींग झाले होते, या विमानांचे लँडींग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च २०२५ रोजी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवी मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठं विमानतळ आहे. जवळपास ५,९४५ एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. मुंबईपासून ४० किमी अंतरावर पनवेलजवळ हे विमानतळ बांधण्यात आले आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरच केंद्र सरकारकडूनही त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उपप्रादेशिक परिवहन कल्याण तर्फे जनजागृती मोहीम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : गेल्या चार-पाच दिवसापासून नवीन वर्षाचा स्वागतासाठी पोलीस विभाग ऍक्शन मोडवर येत सतर्कता बाळगत असून नशेखोर यांच्यावर कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांचा मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली हद्दीत रेस्टॉरंट आणि बार वर दारू पिऊन गाडी चालवू नये व तो  कायदेशीर गुन्हा असल्याची पोस्टर लावून जनजागृती केली. या जनजागृती मध्ये कल्याण उपप्रादेशिक परिवहन मोटर वाहन चे निरीक्षक रोहित पवार, विजय नरवडे, निलेश अहिरे, प्रियंका सागांवकर आणि वाहन चालक यशवंतराव, चौरे, जगताप यांनी संध्याकाळी ठिकठिकाणी नाकाबंदी दरम्यान 'ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह' ची कारवाई केली.
आज ३१ डिसेंबर नवीन वर्ष साजरा करताना लोकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये, तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळावे असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे तसेच वाहनचालकांना त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.