BREAKING NEWS
latest

'Kya News' च्या नव्या योजनेत सहभागी होऊन जिंका कॅश प्राईझ !

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : आता फक्त माहिती मिळवणेच नाही, तर 'Kya News' ऍपवर न्यूज़ वाचून तुम्ही जिंकू शकता ₹5000 पर्यंतचे कॅश प्राईझ ! 'Kya News' ने एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्यात प्रत्येक वाचकाला प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला पैसे कमविण्याची संधी मिळेल.

कसे मिळवू शकता कॅश प्राईझ ?

✔ गूगल प्ले स्टोअरवर जाऊन 'Kya News'  ऍप डाउनलोड करा. किंवा खालील लिंकवर क्लिक करा:
<https://play.google.com/store/apps/details?id=com.upekkhatechnovations.kya>
✔ आपले नाव आणि मोबाइल नंबर नोंदवा, ज्यामुळे आम्ही तुम्हाला संपर्क साधू शकू.
✔ तुमच्या आवडीच्या बातम्या वाचा आणि तुमची एंगेजमेंट वाढवा.
✔ प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला कॅश प्राईझ जिंका.

Kya News म्हणजे काय ?

'Kya News ' एक हायपरलोकल न्यूज ऍप आहे, जिथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ८००+ पत्रकार दररोज ताज्या बातम्या प्रकाशित करतात. आता या प्लॅटफॉर्मवर लोकांसाठी एक आकर्षक योजना सुरू केली आहे, ज्यामुळे लोक न केवळ बातम्यांशी जोडलेले राहतील, तर त्यांना आर्थिक लाभ देखील मिळेल.

गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा प्रमुख भाग असलेली 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार असून त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ऍप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.

पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होऊन गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. याप्रसंगी मंत्री डॉ. पंकज भोयर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : पुण्यात सध्या तेजीने व्हायरल होत असलेल्या रुग्णांचा आजार 'गुईलेन बॅरे सिंड्रोम'च्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी. हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न मांस खाल्ल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे. पुण्यात ३१ तारखेला क्रिकेट सामना आहे. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला केली.

पुणे शहरांतील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हा आजार दुर्मिळ आहे पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकार शक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. याबाबत पुण्यात आढावा घेतला आहे. उपचार आणि तपासणी बाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, दोन्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

पुण्यात सध्या १११ रुग्ण आहेत, ८० रुग्ण पाच किमीच्या परिघातील आहेत. ३५,००० घरे आणि ९४,००० नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी घेण्यासाठी 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' यांची मदत घेतली जाते आहे. एक मृत्यू झाला तो अद्याप 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' (जीबीएस)  मुळेच झाला याची अजून पुष्टी नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकाराची समस्या नियंत्रणात आली आहे. यात आता नव्याने रुग्णवाढ होत नाही. याबाबत आयसीएमआर कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

'आरटीई' प्रवेशासाठी २ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : 'आरटीई' अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ३१ हजार ७०४ अर्ज आले आहेत.

१४ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तरी बालकांच्या पालकांनी २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जाते. 'आरटीई' अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून <https://student.maharashtra.gov.in/adm_portal> या वेबसाईटवर दि.२ फेब्रुवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (हेल्प सेंटर्स), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (युजर मॅन्युअल), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे.

'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिरच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा 'निरोप समारंभ' कार्यक्रम साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  शाळेत जाण्याची सुरुवात हा मुलांच्या आयुष्यातला पहिला टप्पा असतो. त्यानंतर शालेय जीवनातला शेवटचा टप्पा म्हणजे माध्यमिक शिक्षण इयत्ता दहावी. दिनांक २८ जानेवारी रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिरच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा   कार्यक्रम संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये पार पडला. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व अन्य पदाधिकारी यांनी सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन केले व स्वागत समारंभ होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना मुलांमध्ये उत्साह द्विगुणित झाला होता. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावना यांची झालर दिसत होती. दहावीचे पर्व संपणार हा आनंद तर शाळा, मित्र सोडून जाणार या भावनेने मन हेलावत होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मित्रांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संपूर्ण मधुबन वातानुकुलीत दालन हे फुलांनी, फुग्यांनी सजवले गेले होते. आपल्या सर्व मित्र मैत्रिणींचे स्वागत करण्यासाठी इयत्ता नववी मधील विद्यार्थी सज्ज झाले होते. फुलांच्या वर्षावात इयत्ता दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे जोशात आगमन झाले. नृत्य, वादन, भाषण, कौतुक सोहळा या सर्व गोष्टींची जणू मेजवानीच होती. सर्व मुलांनी आपापल्या कला सादर केल्या, शाळेविषयी, शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा..' आज तुम्हा सर्वांना बघुन आम्हाला आमच्या दहावी मधले दिवस आठवले, विद्यार्थी दशेतले क्षण हे नेहमीच सोनेरी क्षण असतात, शाळा, अभ्यास, मित्र या पलीकडे कोणतेच चिंतेचे विश्व नसते, असे   संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले. आयुष्य हे एखाद्या चेंडूच्या टप्प्यासारखे असते, टप्पे घेत घेत पुढे जायचे असते, त्यामधे खड्डे येणार, अडथळे येणारच परंतु माघार न घेता पुढे चालायचे असते, आशीर्वाद हे कायमच पाठीशी असतात परंतु इच्छाशक्ती ही स्वतःची असते, त्यामुळे तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावरच तुम्ही जग जिंकू शकता, आणि आशीर्वाद हा तुमच्या मधल्या इच्छाशक्तीला मिळालेला प्रेरणा स्त्रोत असतो, म्हणून कायमच आमचे तसेच आई वडिलांचे  आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत, तुम्ही तुमचे स्वप्न साकार करा, असे वक्तव्य डॉ. राजकुमार कोल्हे यांनी केले.

शाळेत शिकत असताना कधी एकदा शाळेतून बाहेर पडतो असे अनेकदा वाटत असते, शाळेच्या नियमातून, बंधनातून मुक्त होण्यासाठी बाहेरचे जग खुणवत असते, अशी गोष्ट वाटणे हे स्वाभाविकच आहे कारण हे अल्लड वय आहे, परंतु ज्या क्षणी तुम्ही शाळेतून बाहेर पडाल त्या क्षणी तुम्ही मागे वळून पाहिलं तर फक्त तुम्हाला तुमच्या आठवणीच दिसतील, सकाळी सात वाजता शाळा भरल्याचा घंटेचा आवाज, प्रांगणात उभे राहून प्रार्थना म्हणत होतो त्याचा आवाज तुमच्या कानात घुमणार , शिक्षकांनी केलेली शिक्षा देखील तुम्हाला प्रेमच वाटणार अशा अनेक गोष्टी मनात ठेऊन तुम्ही तुमच्या आयुष्याची वाटचाल करणार, तुम्हाला लहानाचे मोठे होताना बघितले आहे, असे भावपूर्ण उद्गार संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले तर स्वतः शाळेच्या संस्थापिका असून देखील आईच्या भावनेने त्यांनी मुलांना प्रेम दिले, हेलावलेल्या मनाने सर्वांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या.
       
सोनेरी क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी सर्व मुलांनी संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि सर्व आपल्या आवडत्या शिक्षकांबरोबर फोटो काढले. सर्व मुलांना भेटवस्तू देऊन अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

गुन्हे शाखा घटक-२ भिवंडी पोलीसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना शिताफीने केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी : गुन्हे शाखा घटक-२ चे पोलीस पथक हे परिमंडळ ०२ भिवंडी मध्ये गस्त घालीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शशिकांत यादव यांना बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार हे चोरी केलेल्या तांबा मालाची विक्री करण्यासाठी 'क्विक बाईट हॉटेल'च्या समोर कल्याण कडुन भिंवडी कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला एका टेम्पोसह उभे आहेत. सदर गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी १) लतीफ अरिफ खान (वय: ३१ वर्षे), राहणार. मुळगांव कंम्बोगी ता. बबलेसुर, जिल्हा-विजयपुर, राज्य-कर्नाटक २) संगप्पा नंदप्पा सिरमकोल (वय: ४४ वर्षे), राहणार. चोरापुर, पेंड हदकीगल्ली, जिल्हा-विजयपुर, राज्य-कर्नाटक यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी त्यांचे साथीदार पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी अमन खान व इतर यांचे मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपिंना विश्वासात घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी नारपोली पोलीस ठाणे ह‌द्दीत ०३ व पडघा पोलीस ठाणे ह‌द्दीत ०२ ठिकाणी घरफोडी व चोरीचे गुन्हे केले असून सदर ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर आरोपी कडुन एकुण २१,४५,०००/- रूपये कींमतीचे तांब्याचे पाईप हस्तगत करण्यात करण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीचे अधिकारी करीत आहेत.

सदरची कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे ठाणे शहर, शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शोध-१, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि. श्रीराज माळी, धनराज केदार, पोउपनिरी. रविंद्र पाटील, सपोउनिरी. सुधाकर चौधरी, पोहवा. शशिकांत यादव, वामन भोईर, सचिन जाधव, सुनिल सांळुखे, प्रकाश पाटील, साबिर शेख, पोशि. उमेश ठाकूर, अमोल इंगळे, विजय कुंभार, नितीन बैसाणे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

बाल न्याय ते पर्यावरण संवर्धन: संदीप भैया पाटोळेंचा जबरदस्त प्रवास!

धुळे जिल्ह्यातील किल्ले लळींग संवर्धन समितीमार्फत किल्ले लळींगचा विकास आणि वृक्षारोपण मोहिमा राबवणारे माजी नगरसेवक संदीप भैया पाटोळे यांनी सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेला नुकतीच भेट दिली. संस्थेच्या अध्यक्ष मीना भोसले यांनी त्यांचे स्वागत करत बाल विवाह मुक्त भारत अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या डायरी व कॅलेंडर भेट दिले.

संदीप भैया पाटोळे यांनी जिल्ह्याच्या शिशुगृहाचे अध्यक्ष म्हणून झिरो ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पालकत्व स्वीकारत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच, किल्ले लळींग संवर्धन समितीच्या माध्यमातून लळींग किल्ल्याचे प्रवेशद्वार तयार केले आणि किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.

संस्थेच्या कामाची पाहणी करताना त्यांनी पर्यावरणासाठी राबवण्यात येत असलेल्या वनराई प्रकल्पाचे कौतुक केले आणि त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, 19 फेब्रुवारी रोजी वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रम सप्तशृंगी महिला संस्था व किल्ले लळींग समिती एकत्रित राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

महिला सशक्तीकरणासाठी योगदान देणाऱ्या महिलांना "राजमाता जिजाऊ पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव करणाऱ्या पाटोळे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांसाठी प्रोत्साहन देण्याचे वचन दिले.

सप्तशृंगी महिला संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांनी संदीप भैया पाटोळे यांना दिलेल्या पाठबळाबद्दल आभार मानले.