BREAKING NEWS
latest

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचला पहिला भारतीय अंतराळवीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
फ्लोरिडा - भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर आज, म्हणजे २६ जून रोजी दुपारी ४:०० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. पूर्वी त्यांचा आगमन वेळ ४:३० वाजता होता. म्हणजेच हे अंतराळवीर वेळेच्या ३० मिनिटे आधी अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. त्याआधी, मिशन क्रूने अंतराळयानातून लाईव्ह संभाषण केले. यामध्ये शुभांशूने म्हटले होते "अंतराळातून नमस्कार! माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत येथे येऊन मी खूप उत्साहित आहे". ते म्हणाले, “जेव्हा आम्हाला व्हॅक्यूममध्ये सोडण्यात आले, तेव्हा मला फारसे बरे वाटत नव्हते. मी खूप झोपलो. मी इथे लहान मुलासारखा शिकत आहे.. अंतराळात कसे चालायचे आणि कसे खायचे".  ऍक्सियम मिशन ४ अंतर्गत, सर्व अंतराळवीर २५ जून रोजी दुपारी १२ वाजता आयएसएसकडे रवाना झाले. तांत्रिक बिघाड आणि हवामानाच्या समस्यांमुळे हे मिशन ६ वेळा पुढे ढकलण्यात आले.

अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इसरो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. ४१ वर्षांपूर्वी, राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.

शुभांशूचा हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेत उपयुक्त ठरेल. ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे आहे. हे २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. भारतात अंतराळवीरांना गगनयात्री म्हणतात. त्याचप्रमाणे, रशियामध्ये त्यांना कॉसमोनॉट्स म्हणतात आणि चीनमध्ये त्यांना तायकोनॉट्स म्हणतात.

एमजीए फाउंडेशन आयोजित इनडोअर क्रिकेट स्पर्धा २९ जून ला मुंबईत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : एमजीए फाउंडेशनतर्फे 'मुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन' आणि 'महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन' यांच्या मान्यतेने भव्य इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील 'सन्‍टेक टर्फ' येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत दोन टर्फवर खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून त्यांचे ४-४ चे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक संघ गटातील इतर तीन संघांविरुद्ध राऊंड-रॉबिन फॉरमॅटने सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि नंतर उपांत्य विजेते संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येऊन विजेतेपदासाठी लढतील.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड, कोटक बँक, होम स्क्वेअर प्रॉपर्टीज एलएलपी, वेल्थ अँड बियॉन्ड, चाणक्य एंटरप्रायझेस, महावीर मल्टिस्पेशालिटी क्लिनिक यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांनी प्रायोजकत्व आणि सहकार्य दिले आहे असे एमजीए फाउंडेशनचे अधिकृत प्रतिनिधी मनीष अग्रवाल व स्नेहा पाटील यांनी या स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रु २१,०००/- व चषक तर उपविजेत्या संघाला रु ११,०००/-  व चषक एमजीए फाउंडेशनतर्फे देऊन गौरवण्यात येणार आहे. उर्वरित सर्व सहभागी संघांना रु. ५,०००/- चे व्हाऊचर देऊन गौरवण्यात येणार आहे. 
या स्पर्धेत टीडीएस किंगस, टॅक्स टायटंस, आयटीआर वॉरीअर्स, रिटर्न मेकर्स, ऑडीट आर्मी, मनी मास्टर्स, जीएसटी ग्लॅडीएटर्स, इगल लेजर्स हे संघ सहभागी होत आहेत.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची राज्य खो-खो पंच परीक्षा २९ जूनला..

प्रतिनिधी - अवधुत सावंत

मुंबई - महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने या वर्षी राज्य खो-खो पंच परीक्षा दि २९ जून  रोजी सकाळी १०:०० वाजता  आयोजित केली आहे. महाराष्ट्रात एकाच वेळी विविध जिल्ह्यांमध्ये  परीक्षा होणार आहे. संपूर्ण राज्यात जवळ जवळ १५ केंद्रावर हि परीक्षा होणार असून ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे त्या जिल्ह्यात पंच वर्ग होत आहेत.  हि राज्य पंच परीक्षा मुंबई, पुणे, बीड, सिंधुदुर्ग, नांदेड, धुळे, ठाणे, नंदुरबार, पालघर, सोलापूर, जालना, सांगली, लातूर व अहिल्यानगर येथे पार पडणार आहे असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी स्पष्ट केले आहे.   

मुंबई जिल्ह्यात हि परीक्षा बीपीएड कॉलेज, वडाळा येथे दि २९ जून  रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता होणार असून अधिक माहितीसाठी मुंबई खो-खो संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा (98306 91616) यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. तसेच इतर संबंधित जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या सचिवांशी संपर्क साधण्याचे आव्हान कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी केले आहे.

मद्यधुंद अवस्थेत तेलंगणात महिलेने रेल्वे ट्रॅकवर चालवली कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
तेलंगणा - तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात, मद्यधुंद अवस्थेत एका ३४ वर्षीय महिलेने तिची गाडी रेल्वे रुळावर आणली. यामुळे तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. १०-१५ गाड्या थांबवाव्या लागल्या किंवा वळवाव्या लागल्या. शंकरपल्लीजवळ घडलेल्या या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये महिला रेल्वे ट्रॅकवर किआ सोनेट कार चालवत असल्याचे दिसून येते. महिलेने रेल्वे ट्रॅकवरून सुमारे ८ किमी गाडी चालवली, ज्यामुळे अनेक रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोक, रेल्वे कर्मचारी आणि पोलिस महिलेला गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जमावाने तिला गाडीतून बाहेर काढल्यानंतर तिचे हात बांधले आहेत. महिलेने असे का केले आणि तिची मानसिक स्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रेल्वेचे अनेक कर्मचारी आणि पोलिस गाडीच्या मागे धावले. मोठ्या कष्टाने त्यांना गाडी थांबवण्यात यश आले. महिलेला गाडीतून बाहेर काढण्यासाठी सुमारे २० जणांची मदत घ्यावी लागली. ती अजिबात सहकार्य करत नव्हती. रेल्वे पोलिस अधीक्षक चंदना दीप्ती म्हणाल्या की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ही महिला अलिकडेपर्यंत एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती. ती उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. ती खूप आक्रमकपणे वागत होती. असे दिसून आले की ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती.

सिबीएसई बोर्डाचा दहावीच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार आहे. या संदर्भातील निर्णय आज (२५ जून) सीबीएसई घेतला आहे. त्यामुळे २०२६ पासून दहावीचे विद्यार्थी वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देऊ शकणार आहेत.

दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणारा हा बदल २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. या नव्या निर्णयानुसार २०२६ पासून विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षेला बसता येणार आहे. या निर्णयामागचा उद्देश हा विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी संधी मिळावी, हा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

मिशन Axiom-4 साठी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात रवाना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

फ्लोरीडा - भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वी झेप घेतली. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:०१ वाजता स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटद्वारे त्यांचे प्रक्षेपण करण्यात आले. २८ तास ५० मिनिटांच्या प्रवासानंतर ते ISS वर पोहोचले. ही मोहीम भारतासाठी ऐतिहासिक ठरली कारण राकेश शर्मा यांच्या १९८४ च्या प्रवासानंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे भारतीय आणि ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या सोबत अमेरिकेच्या पेगी व्हिटसन (मिशन कमांडर), पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे देखील सहभागी होते.

या १४ दिवसांच्या मोहिमेत शुक्ला विविध वैज्ञानिक प्रयोग करत आहेत. यात सूक्ष्म गुरुत्वात शैवाळींची वाढ, मानवी मूत्रातील नायट्रोजनचा पुनर्वापर, बीज अंकुरण, स्नायूंच्या पेशींचा अभ्यास, आणि अंतराळातील संगणक प्रणालींचा वापर यांचा समावेश आहे. हे प्रयोग भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. मोहिमेच्या सुरुवातीला शुक्ला यांनी देशवासीयांना उद्देशून एक भावनिक संदेश दिला, “७.५ किमी/सेकंद वेगाने पृथ्वीभोवती फिरताना, खांद्यावरचा तिरंगा मला १४० कोटी भारतीयांची आठवण करून देतो. ही यात्रा माझी नाही, आपल्या सर्वांची आहे. जय हिंद!”

शुक्ला यांनी अंतराळात काही खास गोष्टीही सोबत नेल्या - गाजर हलवा, आमरस, मूग डाळ हलवा आणि ‘जॉय’ नावाचा एक छोटा पांढरा हंस खेळणं, जे सूक्ष्म गुरुत्व दर्शवण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या या यशामुळे लखनऊमधील त्यांचे कुटुंब अत्यंत आनंदित आहे. त्यांच्या आईने अभिमानाने सांगितले की, “माझा मुलगा देशाचं गौरव आहे.” Axiom-4 ही मोहीम केवळ एक वैज्ञानिक प्रयत्न नाही, तर भारताच्या आत्मनिर्भर अंतराळ स्वप्नांची सुरुवात आहे. ही मोहीम ISRO, NASA आणि Axiom Space यांच्यातील सहकार्याचे प्रतीक असून, भारताच्या गगनयान कार्यक्रमासाठीही एक दिशादर्शक ठरणार आहे.

सावत्र भावानेच काढला भावाचाच काटा; कल्याण मधील नालिंबी खून प्रकरणाचा झाला उलगडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण तालुक्यातील नालिंबी गावच्या जंगलात आढळलेल्या शिरविच्छिन्न अवस्थेतील मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, सावत्र भावानेच संपत्तीच्या वादातून भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

२९ मे २०२५ रोजी सकाळी नालिंबी ते अंबरनाथ रस्त्यालगत असलेल्या निर्जन जंगलात एका अनोळखी पुरुषाचा शीर विरहित मृतदेह आढळला होता. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलीस पाटील संगीता शिंदे यांच्या तक्रारीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या अमानुष खुनाच्या तपासासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. घटना स्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेज, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीचे तांत्रिक प्रयत्न, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाला एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटना स्थळाजवळ संशयास्पदरीत्या आढळलेली कार. तपासणीअंती ही कार सलमान महंमद गौरी अन्सारी (वय: २५ वर्षे, रा. मांडा, टिटवाळा) याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सलमानला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने थरकाप उडवणारी कबुली दिली. मृत इसम त्याचाच सावत्र भाऊ फैसल अन्सारी (वय: २९ वर्षे) असून, संपत्तीच्या वादातूनच त्याचा खून केला, आणि पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे केले. या खुनाच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.