BREAKING NEWS
latest

चोरी व गहाळ झालेले मोबाईल परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते मुळ मालकांना केले वितरित..

प्रतिनिधी - अवधुत सावंत

कल्याण - परिमंडल-३ कल्याण  अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागातील खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, महात्मा फुले पोलीस ठाणे व कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांच्या वापरातील मोबाईल चोरी तसेंच गहाळ झाले होते. सदर चोरी व गहाळ झालेबाबतच्या तक्रारीनुसार मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत वरिष्ठांच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-३, कल्याण अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मागदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, महात्मा फुले पोलीस ठाणे व कोळसेवाडी पोलीस ठाणे मध्ये तांत्रिक ज्ञान असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नियुक्त करण्यात आली होती. सदर पथकांनी सीईआयआर या पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषन करून खालीलप्रमाणे किंमतीचे चोरी व गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
खडकपाडा, महात्मा फुले, बाजारपेठ, कोळसेवाडी पोलीस ठाणे येथील मोबाईल फोन चोरी व गहाळ झालेले असे ७२ मोबाईल फोन ज्याची एकुण ११,१८,७८०/- रू. किंमतीचे संबधीत तक्रारदार यांना ओळख पटवुन दिनांक ०२/०७/२०२५ रोजी पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-३ चे अतुल झेंडे, व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाचे कल्याणजी घेटे यांच्या हस्ते मुळ मालकांना हस्तांतरित करण्यात आले.

'जे एम एफ' संचालित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये विद्यार्थी परिषद, मतदान, लोकशाही च्या धड्यांचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

 डोंबिवली - भारतातील अठरा वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. अठरा वर्षा खालील प्रत्येकाला या हक्काची अप्रूपता असते. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेअंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये दिनांक २८ आणि ३० जून रोजी विद्यार्थी परिषद मतदान पार पडले. आणि इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंत च्या सर्वच मुलांना मतदानाचा हक्क मिळाला.
सर्वच विद्यार्थ्यांना काही ना काही समस्या असतात, त्या समस्या समजून घेणारा एखादा प्रतिनिधी असावा असे वाटत असते, त्याच विचारातून विद्यार्थी समुदायातून काही विद्यार्थी निवडणुकीसाठी उभे राहतात. असेच एक पर्व म्हणजे विद्यार्थी परिषद निवडणूक आयोग. प्रत्येक वर्गातून काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आणि इतर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन प्रचार केला. एका वर्ग खोलीमध्ये गोपनीयता पाळून मतदान केंद्र उभे केले व सर्वांनी आपल्याला विश्वसनीय वाटणाऱ्या विद्यार्थी उमेदवाराला मतपेटी मध्ये आपल्या मताची चिठ्ठी टाकली. त्यावेळी पोलीसांच्या रुपात आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी ओळख पत्र बघूनच आत सोडले. वेगवेगळी वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थिनींनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे स्वागत केले.
एकाच रांगेत व शांततेत चाललेले मतदान बघुन संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे भारावून गेले,  एकीचे बळ हे निश्चितच महत्वाचे आहे, परंतु ज्या विश्वासाने तुम्ही तुमच्याच मित्रमैत्रिणीला निवडून देणार आहात त्यांनी देखील कर्तव्यामधील प्रामाणिकपणा आणि संयम राखला पाहिजे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी म्हटले. तर केवळ मतदानाचा हक्क बजावयाला मिळतो आहे म्हणून त्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची ही काळजी घ्या, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले आणि सर्व उमेदवारांना आणि मतधारकांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षकांनी देखील शालेय आणि सामाजिक जबाबदारीतून मतदान केले. दोन दिवसांनी मत मोजणी झाल्यावर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा ''पद ग्रहण समारंभ" मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. निवडून आलेल्या प्रत्येकाला संस्थापक व सचिव यांच्या हस्ते पदाधिकारी बिल्ले देण्यात आले. पद ग्रहण केल्यावर तुमची जबाबदारी आणि भूमिका काय असेल याचेही धडे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी दिले.
 मुख्याध्यापिका ज्योती व्यंकटरामण  आणि तेजावती कोटीयन यांनी शपथ ग्रहण प्रतिज्ञा वदवून घेतली. प्राप्त झालेल्या पदाचा योग्य वापर आणि विद्यार्थी नागरिकांनी ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला तडा न जाता तुम्ही केलेले कार्य अतुलनीय असणार आहे हे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी नमूद केले. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  कलात्मक शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांनी व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रुती चौधरी व स्नेहा कलप या विद्यार्थिनीने केले व मीरा देवघरे ने सर्वांचे आभार मानले. सोबत डॉक्टर व चार्टर्ड अकाऊंटंट दिवस पण डॉ. हेरंब व डॉ. विलास लड्डे यांचा उपस्थितीत साजरा करण्यात आला.

ठाण्यात होणार पहिल्या 'स्पेस एज्युकेशन लॅब’ ची निर्मिती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - ठाण्यातील 'अंबर इंटरनॅशनल स्कूल’ आणि 'भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात इसरोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पेस अकॅडमी यांच्यात शनिवारी, २८ जून रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये मुंबई महानगर क्षेत्रातील (एम.एम.आर) पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ठाण्यातील `अंबर इंटरनॅशनल स्कूल’ येथे लक्ष्मण कदम यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली.

ठाण्यातील तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची कवाडे खुली करून देण्याच्या हेतूने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या 'अंबर इंटरनॅशनल स्कूल' येथे स्पेस एज्युकेशन लॅबनिर्मित करण्यात येणार आहे. इसरोच्या स्पेसट्यूटर प्रोग्राम अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या लॅब निर्मितीबाबत शनिवारी 'अंबर इंटरनॅशनल स्कूल' आणि 'व्योमिका स्पेस अकॅडमी' यांच्या सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्राचे अभ्यासक डॉ. प्रतीक मुणगेकर, व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव, शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रदीप ढवळ, अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, कल्पेश जाधव (प्रोग्रॅम आणि ऍडमीन हेड), दिलीप त्रिपाठी यांच्यासह दूरदृश्यप्रणाली द्वारे इसरोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी एन सुरेशकुमार तसेच खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण, अंबर इंटरनॅशनल स्कूलमधील मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम यांनी देखील आपली भूमिका मांडली. ही स्पेस लॅब विद्यार्थ्यांसाठी सहभागशील करण्याच्या दृष्टीने भर देणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. आमचा उद्देश भावी अंतराळवीर, ऍस्ट्रोफिजीसिस्ट, स्पेस सायंटिस्ट आणि एअरोस्पेस इंजिनिअर्स घडवण्याचाआहे, असे संचालक लक्ष्मण कदम यांनी यावेळी नमूद केले.

व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव यांनी या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची मूलभूत ओळख होईल आणि विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे अंतराळ संशोधक क्षेत्राचे अभ्यासक प्रा.डॉ. प्रतीक मुणगेकर यावेळी म्हणाले की, शिक्षण हे सामाजिक गतिशीलतेचे साधन असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या दृष्टीने सशक्त बनवणे आणि त्यांच्यासाठी व्यावसायिकसंधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अंतराळ संशोधन क्षेत्रासंदर्भात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रतिभा आणि गुणवत्ता असूनही या क्षेत्रात राज्याचे प्रतिनिधित्व कमी दिसून येते.

विद्यार्थ्यांना शालेय वयातच अंतराळ संशोधन क्षेत्राची ओळख करून देणाऱ्या विशेष पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास याक्षेत्रात मराठी टक्का वाढेल, असा विश्वास डॉ.मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र हे औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य असून देशाच्या अंतराळ क्षेत्रात मोठे योगदान देण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. शाळांमध्ये स्पेस सायन्स आणि इनोव्हेशन लॅब्स स्थापल्यास ग्रामीण व शहरी अशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडता येईल असे डॉ.मुणगेकर यांनी याप्रसंगी सांगितले.

शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी या स्पेस लॅबच्या माध्यमातून शिक्षण रंजक आणि प्रेरणादायी करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. प्राध्यापक डॉ. ढवळ म्हणाले की, महाराष्ट्राला डॉ.जयंत नारळीकर, डॉ.अनिल काकोडकर, डॉ.रघुनाथ माशेलकर अशी थोर विज्ञान संशोधकांची उज्वल परंपरा आहे. त्यांची प्रेरणा असे उपक्रम राबवताना आमच्या समोर आहे. त्यातूनच मुंबई महानगरक्षेत्रातील पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ही अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या मानका नुसार ही प्रयोगशाळा उभी करण्यात येईल आणि मान्यवर शास्त्रज्ञ व संशोधकांचे मार्गदर्शन या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास प्रा.डॉ. ढवळ यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

यावेळी इसरो चे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.टी एन सुरेश कुमार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून या सामंजस्य कराराबद्दल संबंधितांचे अभिनंदन करून प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, अशा प्रयोगशाळांमुळे भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील भविष्य उज्वल होणार आहे. या प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि विज्ञानाची आवड निर्माण होईल, असा विश्वास डॉ. टी. एन.सुरेशकुमार यांनी व्यक्त केला.

वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या एक दलाल महिला आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिनांक २७/०६/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती चेतना चौधरी यांना माहिती मिळाली की, “हॉटेल शुभम कम्फर्ट रेस्टॉरंट, शिळ डायघर रोड, कल्याण फाटा, ठाणे या ठिकाणी एक महिला दलाल काही पिडीत व असहाय्य महिलांना फुस लावुन वेश्यागमनासाठी बोलवणार आहे.” सदर मिळालेल्या माहिती वरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून एक दलाल महिलेस ताब्यात घेवुन तिच्या रखवालीत असलेल्या ०४ पिडीत महिलांची सुटका केली आहे.

सदर प्रकाराबाबत महिला आरोपीविरूध्द डायघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर । ६९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १४३(१), १४३ (३), सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक. श्रीमती चेतना चौधरी, मपोउपनि. स्नेहल शिंदे, सपोउपनि. वालगुडे, पोहवा. किशोर पाटील, सुवारे, मपोअंम. खरात, थोरात, पोअंम. व्ही. बी. यादव चापोशि. पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.