BREAKING NEWS
latest

'यूपीआय' च्या नवीन नियमानुसार आता प्रत्येक ₹१,००० च्या ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाणार ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली - युपीआय च्या नवीन नियमानुसार डिजिटल इंडियाच्या युगात यूपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. चहाच्या टपऱ्यांपासून मोठ्या शोरूमपर्यंत आपण सर्वत्र स्कॅन करून पेमेंट करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक ₹१,००० च्या यूपीआय ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाईल अशा बातम्या व्हायरल होत आहेत. तुमचा खिसा खरोखरच लुटला जाणार आहे का, की ही फक्त अफवा आहे ? चला, सत्य जाणून घेऊया.

₹१,००० च्या ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाईल का ? साधे आणि स्पष्ट उत्तर..नाही !.. सामान्य ग्राहकांसाठी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात होणारे पीटूपी (व्यक्ती ते व्यक्ती) ट्रान्सफर अजूनही पूर्णपणे मोफत आहेत. एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने स्पष्ट केले आहे की तुम्ही तुमच्या बँक खात्यातून मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या खात्यात पैसे पाठवले, मग ती रक्कम ₹१,००० असो किंवा ₹१०,०००, तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. Google Pay, PhonePe किंवा Paytm द्वारे केलेले सामान्य यूपीआय पेमेंट पूर्णपणे मोफत आहे. मग हे शुल्क कुठून आले ? 'एनपीसीआय' ने 'पीपीआय' (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स) म्हणजेच वॉलेट व्यवहारांसाठी इंटरचेंज फी लागू केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला.

सोप्या भाषेत: वॉलेट व्यवहार: जर तुम्ही Paytm Wallet, Amazon Pay Wallet किंवा PhonePe Wallet वापरून व्यापाऱ्याला ₹२,००० पेक्षा जास्त पेमेंट केले, तर व्यापाऱ्याला शुल्क लागू होऊ शकते. ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत. हा शुल्क व्यापारी आणि बँकेमधील बाब आहे.

यूपीआय बद्दल माहित असाव्यात अशा ३ गोष्टी

दैनिक मर्यादा : बहुतेक बँका दररोज ₹१ लाखपर्यंत यूपीआय व्यवहारांना परवानगी देतात. काही बँका फसवणूक टाळण्यासाठी लहान व्यवहारांसाठी ₹२,००० ची मर्यादा ठेवतात.

यूपीआय लाईट : जर तुम्ही वारंवार ₹५०० पेक्षा कमी रकमेची छोटी पेमेंट करत असाल, तर यूपीआय लाईट वापरा. पेमेंट पिन न टाकता व्यवहार होतो आणि बँक स्टेटमेंटमध्ये गर्दी होत नाही.

घोटाळे टाळा : पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कधीही यूपीआय पिन टाकण्याची गरज नसते. कोणी पैसे पाठवण्याच्या नावाखाली पिन मागत असेल, तर ती फसवणूक आहे.

प्रत्येक ₹१,००० वर शुल्क आकारल्याबद्दल सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या फक्त क्लिकबेट किंवा अफवा आहेत. 'भारत सरकार' आणि एनपीसीआय डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सध्या सामान्य वापरकर्त्यांसाठी यूपीआय शुल्क आकारण्याची कोणतीही योजना नाही. निर्धास्तपणे यूपीआय वापरत रहा.

नायजेरियन नागरिकासह दोन तस्करांकडून एमडी-कोकेनसह एकूण २ कोटी १५ लाख ८० हजारांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करत ड्रग्ज रॅकेटचा केला भांडाफोड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात नायजेरियन तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचं पोलीसांच्या कारवाईत उघड झालं आहे. डोंबिवली जवळील उंबार्ली गणेशनगर परिसरात पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एक नायजेरियन नागरिकासह अंबरनाथमधील दोन तस्करांना रंगेहाथ पकडलं. या तिघांकडून मेफोड्रोन आणि कोकेन या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ कोटी १५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती कल्याण विभाग परिमंडल-३ चे उपयुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

मागील वर्षभरात १४६ तस्करांना अटक

मागील वर्षभरात कल्याण-डोंबिवली शहरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १४६ तस्करांना अटक करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत एकूण १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान तस्करांकडून ६ कोटी ३६ लाख १४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये २४४ किलो ८१८ ग्रॅम गांजा, १११ ग्रॅम चरस, १८०० कोडीनयुक्त बाटल्या, निंदिया गोळ्या, निट्राझेपम गोळ्या तसेच ४ किलो १४७ ग्रॅम एमडी पावडरचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर अंमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, देवरे आणि खरसाण यांचे पथक शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) डोंबिवली-शिळफाटा रस्त्यालगत उंबार्ली गाव हद्दीतील गणेशनगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी तीन इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यापैकी एक जण नायजेरियन नागरिक असल्याने पोलीसांचा संशय अधिक बळावला.
१७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अविनाश व्यंकटेशन सदरला (वय: ३४ वर्षे) हा अंबरनाथ पश्चिम येथील पनवेलकर आयकॉन सोसायटीत राहतो. गजेंद्रन संजीव नायडू (वय: ३४ वर्षे) हा अंबरनाथमधील नवरे पार्क, चिंचपाडा येथील दोस्ती कॉलनीमध्ये राहतो. त्यांच्यासोबत एक नायजेरियन नागरिक असून तो पलावा सिटी या हायप्रोफाईल सोसायटीत मागील २ ते ३ वर्षांपासून राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

या तिघांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन (एम.डी.) साठा, १५ लाख रुपये किमतीचे कोकेन, २१ हजार रुपये रोख रक्कम तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली.

दरम्यान, पोलीस त्यांच्या दिशेनं येत असल्याचं पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी तत्काळ झडप घालून त्यांना पकडले. अंगझडती आणि दुचाकीच्या डिकीची तपासणी केली असता एम.डी. पावडर व कोकेनचा साठा आढळून आला. त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढे त्यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कारवाईमुळे तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले

दरम्यान, मागील वर्षभरात कल्याण पोलीस परिमंडल-३ अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १४६ तस्करांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी दोन प्रकरणांमध्ये तस्करांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षात कल्याण पोलीस परिमंडळानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन आंतरराज्य टोळ्यांना अटक केली होती. या कारवाईदरम्यान गांजा, चरस, कोडीनयुक्त सिरपच्या बाटल्या, निंदिया गोळ्या तसेच निट्राझेपम गोळ्या असा साठा जप्त करण्यात आला. या कठोर कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सेंटर ऑफ 'एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग' साठी कोलंबिया विद्यापीठ - आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत 
   
नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्यात आयआयटी मुंबई आणि आणि कोलंबिया विद्यापीठ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ‘कोलंबिया-आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयु) करण्यात आला.

हे केंद्र संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) हब म्हणून कार्य करेल. वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली विकसित करण्यावर त्याचा भर असेल, ज्यामुळे भारतातील नवोन्मेष परिसंस्था आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्य अधिक मजबूत होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदारही प्रक्रियेत आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आतापर्यंत चार वेगवेगळी एआय केंद्रे सुरू केली आहेत. ‘कोलंबिया-आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ हे संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) केंद्र असून, वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित 'एआय' प्रणाली विकसित करण्याचा त्याचा उद्देश आहे. या केंद्रात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदार सध्या प्रक्रियेत आहेत.

पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी आज नवीन पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये होते. सुमारे २.२६  लाख चौरस फूट (सुमारे ५ एकर) क्षेत्रात बांधले आहे. हे 'एल अँड टी कंपनी'ने ₹११८९ कोटी रुपयांमध्ये बांधले आहे. सेवा तीर्थ कॉम्प्लेक्समध्ये तीन इमारती आहेत: सेवा तीर्थ-१, सेवा तीर्थ-२ आणि सेवा तीर्थ-३. सेवा तीर्थ-१ मध्ये पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक इमारती ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होत्या. गुलामगिरीच्या भारताच्या भूमीवर ब्रिटिश महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी या इमारती एक माध्यम म्हणून काम करत होत्या. आपल्याला गुलामगिरीच्या या मानसिकतेतून मुक्त होणे आवश्यक आहे.

पंतप्रधान म्हणाले, “दिल्लीच्या इमारती आणि ऐतिहासिक स्थळे गुलामगिरीच्या खुणांनी भरलेली आहेत. स्वतंत्र भारतात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक नव्हते. २०१४ मध्ये, देशाने निर्णय घेतला की गुलामगिरीची मानसिकता आता सहन केली जाणार नाही. या निर्णयांमागे आमची सेवाभावी भावना आहे.”

सेवा तीर्थ संकुलात तीन इमारती आहेत: सेवा तीर्थ-१, सेवा तीर्थ-२ आणि सेवा तीर्थ-३. सेवा तीर्थ-१ मध्ये पंतप्रधान कार्यालय, सेवा तीर्थ-२ मध्ये कॅबिनेट सचिवालय आणि सेवा तीर्थ-३ मध्ये एनएससीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कार्यालय आहे. ही कार्यालये पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी होती.

सप्टेंबर २०२५ मध्ये कॅबिनेट सचिवालय सेवा तीर्थ-२ मध्ये हलविण्यात आले. आज, पीएमओ सह, एनएससीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालय देखील तेथे हलविण्यात आले.

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा तडकाफडकी बंद, पालक चिंतेत.

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : जोगेश्वरी पश्चिम परिसरात 'सिटी इंटरनॅशनल स्कूल' अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मुलांच्या भविष्याच्या काळजीने भीतीच्या वातावरण पसरले आहे. तर, मनसे पक्षाने याची दखल घेत शाळेत धाव घेतली आहे.

मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाईंकडून शाळा बंद होऊ देणार नाही, असा म्हणत शाळा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. ओशिवरा परिसरातील ही शाळा, 'सिटी इंटरनॅशनल स्कूल' नावाने मागील २५ वर्षापासून सुरू आहे, येथील शाळेत ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळा भाडे तत्त्वावर असल्यामुळे जागा मालकाकडून महिन्याचे भाडे ३५ लाख रुपयांच्या जागेवर आता ५० लाख रुपये भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या भाडेवाढीला विरोध करत शाळा प्रशासनाने चक्क शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हा ३७ वर्षांनंतरचा दुर्मिळ योग आणि जागतिक उलथापालथीचे संकेत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (सोलर एक्लिप्स) दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, दुपारी ०३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजता संपेल. ह्या ग्रहणाचा कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रावर अधिक प्रभाव दिसेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे.

या ग्रहणाचे वेगळेपण म्हणजे सुमारे ३७ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होत आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी कुंभ राशीत राहु, बुध, शुक्र आणि चंद्रही राहतील. असा योग यापूर्वी ७ मार्च १९८९ रोजी झाला होता. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे जिथे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, त्यामुळे सूर्याच्या सभोवताल एक “रिंग ऑफ फायर” किंवा तेजस्वी वलय दिसते. ग्रहण दक्षिणी आफ्रिका, अंटार्कटिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात जिम्बाब्वे, जाम्बिया, तंजानिया, नामीबिया, मॉरिशस, बोत्सवाना, मोजाम्बिक, अर्जेंटिना आणि चिली या भागांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. सहसा ह्या ग्रहणानंतरचा प्रभाव हा जादा कालावधी करीता राहतो. ह्या ग्रहणाच्या पत्रिकेचा विचार केला असता संपूर्ण जगात/देशात मोठी अस्वस्थता पसरेल. संपूर्ण जगात मोठे बदल घडतील. नैसर्गिक आप्पतीत वाढ. मोठे भूकंप, वादळे, तुफान, वायू प्रदूषण, युद्धयजन्य परिस्थिती निर्माण होईल, किंवा युद्ध सुरू होईल. बॉर्डरवर कुरापती वाढतील. भयंकर घटना तसेच अत्याचार घडतील. दरड कोसळतील. उंचावरून पडण्याच्या घटना. शेजारील राष्ट्रे तसेच मित्र राष्ट्रे यांच्यासोबत संबंध बिघडतील.

हवाई अपघात, शांततेचा पुरस्कार करणाऱ्या देशावर संकटे, संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर ताण, उत्पन्नात घट. सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल, वृद्ध राजकीय नेत्यांना प्रतिकूल. राजकीय लोकांवर कारवाया, राजघराण्यातील तसेच मोठ्या पदावरील, अधिकारपदावर बसलेल्याना लोकांना प्रतिकूल, मंत्र्यांना प्रतिकूल. राजीनामे, पदावरून पायउतार व्हावे लागेल. मोठ्या लोकांवर तसेच काही धर्माशी संबंधित लोकांवर मोठे आरोप होतील. मोठी बंड, चकमकी, काही ठिकाणी सत्ता परिवर्तन. महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये येणाऱ्या काळात काही मोठ्या घडामोडी घडतील. प्रजा व प्रशासनाचे मतभेद हिंसक विरोधात बदलणार.

संपाचे प्रमाण वाढेल, शिक्षकांचे संप होण्याची शक्यता अधिक, सरकार, विरोधी पक्ष यांच्यातील मतभेद-विरोध वाढतच जाणार. बेकारीचे प्रमाण वाढणार. खून, दरोडे, माऱ्यामाऱ्या, मोठे हिंसाचार यात वाढ. मृत्युसंख्येत वाढ, म्युनिसिपालीटी प्रतिकूल, अग्निकांडाच्या घटनांमध्ये वाढ. रोग्याच्या साथी पसरतील, तापाची साथ पसरेल. सरकारचे दुर्लक्ष आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन भयंकर आपत्ती बनून लोकसंपत्तीला हानी पोहोचणार.

संसदेत अनपेक्षित परिस्थितीमुळे कामकाज अडचणीत येणार, अनुशासनहीनता किंवा अप्रिय वर्तनामुळे सदस्यांना राग येणार, ज्यामुळे सामान्य काम करणेही कठीण होणार. मंत्र्यांच्या बेसावधपणे केलेल्या किंवा वादग्रस्त वक्तव्यांमुळे संसदेत तणाव आणि विरोध वाढणार. संसद सदस्यांच्या अपघाताची शक्यता.

लेखक, साहित्यिक, पत्रकार, लहान मुले, सुप्रीम कोर्टातील वकील, न्यायाधीशांना प्रतिकूल, मृत्यूची शक्यता, बुद्धिवादी लोक, स्त्रिया, ग्रंथकार,  ग्रंथप्रकाशक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक, बँकर यांना प्रतिकूल. स्पर्धा, संमेलने, कार्यक्रम यात खंड. सभा, संमेलने यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील.

पायांची दुखणी बळावतील, वाढतील, या संबंधी त्रास वाढेल. हवामान बिघडेल, प्रदूषणात वाढ. नट, कलाकार, गायक, चित्रकार स्त्रिया, खास करून स्त्री कलाकारांना प्रतिकूल अपघात होण्याची शक्यता. श्रीमंत लोक मृत्यू पावतील. नर्तिका, गायिका, प्रसिद्ध महिला, फॅशन डिझायनर, रेडिओ, दूरदर्शन कलाकार यांना प्रतिकूल. हा काळ सामाजिक दृष्टिने पण चांगला नाही. देशामध्ये घटस्फोटांची संख्या वाढते. स्त्रियांवर अत्याचार झाल्यामुळे खळबळ उत्पन्न होणार. भगदड माजून मृत्यू, समुद्रात मोठी वादळे, समुद्रातील अपघातात वाढ, जहाज, बोटी बुडतील, जलसमाधी, जलमृत्यू तसेच धार्मिक चळवळीत वाढ. धार्मिक संस्था, ट्रस्ट किंवा यासंबंधी अनैतिक वर्तन, चुकीचे किंवा बेकायदेशीर कृत्य (भ्रष्टाचार, फसवणूक, अन्याय करणे, नियमांचे उल्लंघन) अश्या प्रकारची प्रकरणे समोर येतील
परदेशातील व्यापारात अडचणी, काही गूढ मृत्यू होतील.

उद्योगधंदे, रोजगार यांना प्रतिकूल, एखादा न आवडणारा कर वाढण्याची शक्यता. काही आंतरराष्ट्रीय करार बंद होतील, संकटात येतील. बँक आणि शेअर बाजाराला प्रतिकूल. शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार. बाजरात मोठी अस्थिरता दिसेल, गुंतवणूकदारांचे अंदाज चुकतील चलनाचे अवमूल्यन, रुपयाची घसरण वाढणार. या ग्रहणामुळे तेलाचे भाव वाढतील. मूग, मसूर, कापूस, गूळ, गहू, साखर, सुती वस्त्रे, तूप यांच्यात ३-४ महिने तेजी.

लेखक
जितेश सावंत 
के. पी. विशारद, नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ, शेअरबाजार, सायबरकायदा, तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदातज्ज्ञ आहेत.
ईमेल: <jiteshsawant33@gmail.com>

बँकांच्या वसुली एजंट्सना आर बी आय चा लगाम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : आरबीआय ने कर्जवसुली प्रक्रियेत होणाऱ्या दादागिरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीबाबत नियमांचा मसुदा काल जाहीर करण्यात आला असून, हे नवे नियम १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत. यानुसार कर्जदारांना बँकेचे कर्ज थकल्यानंतर येणारे धमकीचे फोन आणि वसुली  एजंट्सचा त्रास कमी होणार आहे.

आरबीआय ने बँक आणि रिकव्हरी एजंट्सना वसुलीसाठी कोणत्याही प्रकारच्या कठोर किंवा अपमानास्पद पद्धत वापरण्याला मनाई केली आहे. यामध्ये, धमकीची किंवा अपमानास्पद भाषा वापरणे, मोबाईल किंवा सोशल मीडियावर अयोग्य संदेश पाठवणे, कर्जदाराच्या नातेवाईक, मित्र, सहकारी यांना त्रास देणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान किंवा गोपनीयतेचा भंग करणे, थकबाकी किंवा कायदेशीर कारवाईबाबत दिशाभूल करणारी माहिती देणे अशा प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

नियमांनुसार, रिकव्हरी एजंटने ग्राहकांशी सभ्य आणि सन्मानपूर्वक संवाद साधणे बंधनकारक असेल. ग्राहकांसोबत झालेल्या सर्व दूरध्वनी संभाषणांचे रेकॉर्डिंग ठेवणे आवश्यक राहील. तसेच, सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेतच कर्जदाराशी संपर्क साधता येईल. वसुली एजंट फक्त कर्जदार किंवा हमीदाराशीच संवाद साधू शकतील. शोककाळ, लग्नसमारंभ किंवा सण-उत्सव अशा प्रसंगी संपर्क टाळणे बंधनकारक असेल. कर्जदाराने विशिष्ट वेळेत संपर्क न करण्याची विनंती केल्यास ती मान्य करावी लागेल.

नव्या मसुद्यानुसार, कर्जदाराची तक्रार प्रलंबित असताना बँकांना वसुलीची कारवाई करता येणार नाही. प्रथम तक्रार निकाली काढणे बंधनकारक असेल. तसेच, रिकव्हरी एजंटने कर्जदाराशी संपर्क साधण्यापूर्वी स्वतःचे नाव, संपर्क तपशील आणि तो कोणत्या बँकेच्या वतीने काम करत आहे, याची माहिती द्यावी लागेल.