BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता व माझे अस्तित्व' चर्चासत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  अगणित पदव्या प्राप्त केलेले 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे हे नेहमीच वेगवेगळ्या नवीन विषयाची हाताळणी करून त्या विषयांमधील सखोलता विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यरत असतात. मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचा विषय होता ' कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच (Artificial Intelligence) जे सध्याच्या काळात कुतुहलाचा आणि नवीन काही शिकण्याचा विषय झाला आहे. याच विषयावर आणि या सारख्या अनेक विषयांवर खूप काही शंका कुशंका विद्यार्थ्यांच्या मनात रेंगाळत असतात त्यासाठीच चर्चासत्राचे आयोजन केले गेले. दहा दिवसांसाठी 'जे एम एफ' चा गणपती बाप्पा मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये विराजमान झाला आहे. बाप्पाची आरती करून चर्चासत्राची सुरुवात झाली.
गणपती हा बुद्धीचा दाता आहे, म्हणूनच मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेने अनेक नवनवीन गोष्टी निर्माण करतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तर आजच्या युगात स्वतः मध्ये प्रगल्भता आणून विकास करावा हे सांगताना अनेक तज्ञांची नावे घेऊन उदाहरण दिले. एखादे चित्र मनात साकारून कल्पनेतून ते सजीव करणे म्हणेजच स्वप्न पडणे होय. याच स्वप्नांना अस्तित्वात आणून, रेखाटलेल्या चित्रांना सजीव करण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence या तंत्रज्ञान माध्यमातून साकारले जाते. सध्याच्या काळात रोजच्या जीवनातील घडामोडी मध्ये Artificial Intelligence हा महत्वाचा घटक ठरला आहे. तंत्रज्ञानाने माणूस किती पुढे जातो त्यासाठी AI हे चपखल उदाहरण आहे. नवनवीन, प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे चेहरे बनवून त्यामधून सहजपणे व्हिडीओ बनवता येतात. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने  संगणक बनवला, त्यामध्ये अनेक विषयांचे प्रोग्राम आखून देऊन सर्वांना सहज सोयीचे माध्यम उपलब्ध करून दिले. तर अनेक अभ्यासक्रम देखील माहिती करून दिले. थोडक्यात काय तर पूर्वी आपण अभ्यास करताना मार्गदर्शिका अर्थात गाईड वापरत असू तेच आता AI च्या माध्यमातून सुलभपणे गाईड उपलब्ध झाले आहे जिथे तुम्ही प्रत्यक्षरित्या वाचून तुमच्या शंकेच निरसन होते.
सारासार विचार करता जी गोष्ट जास्त फायदेशीर होऊन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहते तिचीच दुसरी बाजू ही तोट्याची देखील असू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, जग जवळ आले, अनेक गोष्टी साकारायला मिळाल्या, परंतु त्याचा परिणाम असा झाला की माणूस विचार करून आपल्या बुद्धीने जे कार्य करत होता ती बुद्धिमत्ता खुंटत चालली आहे, सहजरित्या मिळालेल्या गोष्टीचा आनंद हा असतोच परंतु त्या गोष्टीवर  विचार करून ती कल्पना शक्तीने अंमलात आणून साकारलेल्या गोष्टीचा आनंद हा आभाळा एवढा आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. परंतु काळाबरोबरच आपणही चालले पाहिजे म्हणूनच AI हे माध्यम तुम्हा तुम्हां आम्हाला नवीन दिशा देणारे आहे म्हणूनच काळानुसार रोजच्या घडामोडी मध्ये सतर्क राहा असेही सांगितले.
प्रसार माध्यमाचे मुख्य आयोजक श्री.रोहित राजगुरु व त्यांच्या चमू ने कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे अनेक चित्र दाखवून त्यांचे चलचित्र कसे तयार करता येते हे देखील विद्यार्थ्यांना दाखवले. जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय व वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी व सर्व शिक्षक या चर्चासत्रात उपस्थित होते. अनेकांनी प्रश्न विचारून उत्तरे देखील घेतली. वंदे मातरम् म्हणून चर्चासत्राची सांगता झाली.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाबाबत गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आज यश मिळाले आहे. सरकारने याबाबतचा जीआर काढल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडत आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे आणि ते आंतरवाली सराटी च्या दिशेने निघाले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेला जीआर

१. महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

२. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजाने राज्य केलेले आहे. पैठण (प्रतिष्ठाण) ही त्यांची राजधानी होती. यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक म्हणून आज सुद्धा त्याच दिमाखाने उभा आहे. अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दि.१७ सप्टेंबर, १९४८ साली भारतात विलीन झाला. या काळात या संतभूमितून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी-वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तिर्थक्षेत्रे निर्माण झाली. जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पाने नटलेले अजिंठा व वेरूळ येथील लेणी आहेत.

३. मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमितून संतश्रेष्ठ नामदेव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, जगमित्र नागा, एकनाथ, सेना न्हावी व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमिमध्ये सहिष्णूता, भागवत धर्माचा प्रसार, भूतदया, समानतेचा संदेश दिला आहे. तसेच श्री गुरू गोविंद सिंघजी यांची समाधी नांदेड येथे असून त्याठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. या कारणाने मराठवाड्यात आजसुद्धा सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे. मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी, पूर्णा व मांजरा या नद्या वाहतात. या नद्याने यांतील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे. गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तिरावर वसलेला आहे.

४. असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दि. ०१ नोव्हेंबर, १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दि.०१ मे, १९६० पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे. तत्कालिन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते. या संपन्न अशा मराठवाड्यात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली आहेत. त्यासाठी या भागातील कुणबी, कुणबी मराठा तसेच मराठा- कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दि.०७ सप्टेंबर, २०२३ रोजी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत. उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी/दौरे करून बैठका घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी याकारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे ७ हजार पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरिता प्राप्त करून घेतली आहेत. तसेच, देशाची जनगणना आणि त्याअनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याकरिता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली आहेत. याचदरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे जी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणात क्षेत्रिय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने आतापर्यंत विविध शिफारशीसह सादर केलेल्या अहवालांमधील सर्व शिफारशी शासनाने स्विकारल्या आहेत व याआधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे. यापुढेही सदर समितीने दिलेल्या अहवालांवर योग्य कार्यवाही केली जाणार आहे.

५. तथापि, मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी-मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीस हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निदेशित करण्यात आले असून, त्याकरिता उक्त समितीस दि.३१ डिसेंबर, २०२५ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची (औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड व उस्मानाबाद) माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहू कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे. तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता. या कागदपत्रांमध्ये / गॅझेटिअरमध्ये (सन १९२१ व सन १९३१) कुणबी/कापू अशा नोंदी आहेत. यापुर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० च्या कलम १८ च्या पोट कलम १ मध्ये आणि नियम, २०१२ च्या नियम ४ मधील उप-नियम (२) मधील खंड (च) मध्ये (च) नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२४, दि.१८ जुलै, २०२४ अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, मराठा समाजास कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे. आता, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन वाचा क्र.१ व क्र.३ अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करुन सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

समिती सदस्यः

१. ग्राम महसूल अधिकारी
२. ग्रामपंचायत अधिकारी
३. सहायक कृषी अधिकारी

मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि.१३.१०.१९६७ पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे.

या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील / कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील/कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील.

श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर अथर्वशीर्ष पठण विक्रमाची 'ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंड' मध्ये झाली नोंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पिंपरी, दि २ : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश उत्सव काळात दरवर्षी ऋषिपंचमी दिवशी हजारो महिला भगिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतात. यावर्षी ३५ हजार २१५ महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हा एक जागतिक विक्रम आहे. याची नोंद 'ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड' मध्ये करण्यात आली आहे. या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र 'ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड' या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांना नुकतेच प्रदान केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनेही डॉ. दीपक हरके यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी डॉ. हरके यांनी गणेश भक्त, भाविकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, दि. २ : राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असून आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर आणि मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्यावर टीका झाली तरी मी जराही विचलित झालो नाही, कारण समजाला न्याय द्यायचा हेच ध्येय होतं. तो न्याय देताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, अन्यायाची भावना निर्माण होणार नाही असा कायदेशीर निर्णय करावा लागेल. मराठा असो, ओबीसी असो वा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणं हे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात.

“मराठा समाजाच्या हिताचा तोडगा मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला. त्यामुळे मनोज जरांगे यांचं उपोषण आता संपवण्यात आलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती. मात्र मनोज जरांगे यांची सरसकटची मागणी होती. पण त्यात कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाहता सरसकट करणं शक्य नव्हतं. ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून दिली. आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण समूहाला नसून, व्यक्तीला मिळत असतं आणि त्याने तो दावा करायचा असतो. त्यांनीदेखील काल ती भूमिका समजून घेतली, स्विकारली आणि कायद्यात सरसरकट बसत नसेल तर करु नका सांगितलं. त्यातून तोडगा निघाला आणि उपसमितीने चर्चा करुन मसुदा तयार केला आणि आता जीआर काढला गेला आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

“मला उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि सर्वांचे अभिनंदन करायचं आहे. त्यांनी सातत्याने अभ्यास, बैठका, चर्चा करुन मार्ग काढला आहे. मार्ग निघाल्यामुळे मराठवड्यात राहणारे मराठा समाजाचे लोक ज्यांचा कधीकाळी त्यांच्या रक्ताच्या नात्यातील कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना नियमाने प्रमाणपत्र देता येतं. हैदराबाद गॅझेटमुळे या नोंदी शोधणं सोपं होईल. फॅमिली ट्री स्थापित करुन आरक्षण देता येणार आहे. म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सर्वांना ते आरक्षण मिळेल,” असंही त्यांनी सांगितलं.

“ओबीसी समाजात जी भीती होती, सरसकट सगळे आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेदेखील आरक्षण घेतील, तसंच इतर समाजाचेही घुसण्याचा प्रयत्न करतील. तर अशाप्रकारे होणार नाही. ज्यांचा खरा दावा आहे, पण कागदपत्रांच्या अभावी मिळत नव्हता अशा समाजाच्या लोकांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी हा अतिशय चांगला निर्णय आहे. मराठवाड्यात रेकॉर्ड्स नसल्याने त्यांच्यासाठी मोठा प्रश्न होता. त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा काढू शकलो आहोत जो कोर्टातही टिकेल आणि लोकांना फायदा होईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.

भारताने तयार केली पहिली स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चीप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : भारताची पहिला स्वदेशी 'विक्रम मायक्रोप्रोसेसर चीप' केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमिकॉन इंडिया २०२५ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केली. दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया २०२५ चे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थिती होत्या.

‘विक्रम’ मध्ये ३२-बिट मायक्रोप्रोसेसर आणि चार मंजूर प्रकल्पांचे चाचणी चिप्सचा समावेश होता. विक्रम चिपची रचना इसरो च्या सेमिकंडक्टर लॅबमध्ये झाली आहे. ती प्रक्षेपण यानांमधील कठीण हवामानात वापरण्यास पात्र आहे. ही चिप भारतात विकसित झालेली पहिली पूर्ण स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर चीप आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले, की काही वर्षांपूर्वी आपण पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारताने सेमी कंडक्टर मिशन सुरू केले. साडेतीन वर्षांनंतर आपण भारतात तयार झालेली पहिली चिप पंतप्रधानांना सादर करत आहोत.

सध्याच्या जागतिक अनिश्चित आणि अस्थिर काळात भारत एका प्रकाश स्तंभासारखा उभा आहे. गुंतवणुकदारांनी स्थिर धोरणे असलेल्या भारतात यावे. देशात मागणी प्रचंड आहे. दर तिमाहीत सेमिकंडक्टरची मागणी वाढत आहे. हीच भारतात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे, असे आवाहनही वैष्णव यांनी गुंतवणूकदारांना केले.

सरकारच्या शिष्टाईला यश, जीआर लागू होताच जरांगेंनी सोडले उपोषण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे यांचे उपोषण आज संध्याकाळी संपुष्टात आले. राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मराठ्यांकडून विजयी जल्लोष केला जात आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटसंदर्भात जीआर काढला आहे. तर सातारा गॅझेटसंदर्भातील जीआर काढण्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर मनोज जरांगे यांच्याकडे दिला असून, जीआर आल्यावर एका तासात मुंबईतील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीने केलेल्या शिफारशींना मराठा अभ्यासकांनी आणि वकिलांनी योग्य ठरवले आहे. या शिफारशींवर झालेल्या चर्चेनंतर, आता सरकारकडून तातडीने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर काढण्यात आला. या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

सरकारने या जीआरमध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी तरतूद केली आहे. मराठा समाजाच्या व्यक्तीला आता कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन या जीआरमध्ये करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा घेऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांनी जरांगे यांना तो मसुदा दाखवला. त्यानंतर जरांगेंनी तो वाचून दाखवला. तसेच आपण विचार करून कळवतो असे सांगितले. तसेच जीआर काढल्याशिवाय आपण इथून हलणार नाही असेही स्पष्ट केले. त्यानंतर जरांगे म्हणाले, आम्ही सरकारकडे हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी केली जावी अशी मागणी केली होती. विखे पाटलांनी तुम्हाला मान्य झाले तर तातडीने जीआर काढतो असे सांगितले आहे. आपण आपल्या अभ्यासकांकडे हे योग्य आहे का हे पाहायला देणार आहोत, नाहीतर पुन्हा वाशीसारखे होणार. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता दिली आहे. यासंबंधीचा जीआर लवकरच काढला जाईल.

जरांगे म्हणाले, आम्ही सातारा गॅझेटियर पुणे व औंध यामध्ये अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. कायदेशीर बाबी तपासून त्या पद्धतीने निर्णय घेण्यात येईल असे यात म्हटले आहे. मी सरकारला कारण विचारले, त्यावर त्यांनी औंध व साताऱ्यात काही कायदेशीर त्रुटी आहेत असे सांगितले. शिवेंद्रराजे भोसले यांनी याची जबाबदारी घेतलेली आहे. ते १५ दिवस म्हणाले मी एक महिना दिला आहे. शिवेंद्रराजे बोलले म्हणजे विषय संपला.

*आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे होणार*

जरांगे पुढे म्हणाले, राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली होती. त्यात काही गुन्हे मागे घेतले आहेत. काही गुन्हे कोर्टाच्या माध्यमातून मागे घेतले जाणार आहेत. यासाठी सरकारने सप्टेंबर अखेरची मुदत मागितली आहे. सरकार हा ही जीआर काढणार आहे. राज्यपालांच्या सहीने लगेच जीआर काढणार आहेत, असे विखे पाटलांनी सांगितले आहे.

*आंदोलनात मृत पावलेल्यांना आर्थिक मदत आणि नोकरी*

आम्ही सरकारकडे मराठा आंदोलनात बलिदान गेलेल्यांना तत्काळ आर्थिक मदत आणि कुटुंबाला नोकरी देण्याची मागणी केली होती. आतापर्यंत मयतांच्या कुटुंबाला १५ कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. उर्वरित मदत लवकरच दिली जाईल. राज्य परिवाहन महामंडळात ही नोकरी दिली जाणार आहे. यात बदल करून ज्याचे चांगले शिक्षण झाले असेल त्याला ड्रायव्हर बनविण्यापेक्षा त्याला दुसरे त्याच्या सक्षमतेचे काम दिले तरी चालेल. एमआयडीसी, एमएसईबी आदी ठिकाणी नोकरी द्या, असे जरांगेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगितले.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, कुणबीच्या ५८ लाख नोंदीचे रेकॉर्ड ग्रामपंचायतीला लावावे. लोकांना मेळच लागत नाही. लोक अर्ज करतील आणि त्यांचे आरक्षण घेतील. व्हॅलिडिटी आतापर्यंत द्यावी. अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या आहेत. २५ हजार रोख दिले की लगेच दिली जाते. म्हणजे ती अनधिकृत आहे का नाही? सरकारने यासंबंधीचा आदेश काढण्याची तयारी दर्शवली आहे.

खंडणी विरोधी पथकाने ०४ अग्निशस्त्रे व ०८ काडतुसे विक्रीकरिता आलेल्या तीन इसमांना केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव तसेच अगामी ईद-ए-मिलाद इ. सण-उत्सवाच्या  कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहुन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडण्याच्या पार्श्वभुमीवर मा. पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना अवैध शरत्र खरेदी विक्री करणाऱ्या, अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या तसेच इतर अवैध धंदे करणाऱ्या जास्तीत जास्त इसमांविरुध्द सक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळवीत असताना दि. ३०/०८/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, खंडणी विरोधी पथक (गुन्हे शाखा), ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, "दि. ३०/०८/२०२५ रोजी पहाटेच्या सुमरास इसम नामे आकाश व त्याचे दोन मित्र अक्षय व बिट्टू हे कल्याण स्टेशन परिसरात अग्नीशस्त्र व काडतुसे कोणाला तरी विक्री करण्याकरिता येणार आहेत.

सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन कुंभार यांनी कल्याण रेल्वेस्टेशन परिसरात सापळा रचला असता १) अक्षय नथनी सहानी (वय: २० वर्षे), व्यवसाय: शिक्षण, राहणार, उत्तर दिल्ली, २) बिट्टू धरमविरसिंग गौर (वय: २६ वर्षे), राहणार उत्तर प्रदेश, ३) आकाश दुर्गाप्रसाद वर्मा (वय: २३ वर्षे), राहणार सेंट्रल दिल्ली, हे त्यांच्या ताब्यात २ देशी बनावटीचे पिस्टल, २ देशी कट्टे, ८ जिवंत काडतुसे असा एकूण १,८२,५००/- रू. किंमतीचा मुददेमाल अवैधरित्या विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या विनापरवाना आपल्या कब्जात बाळगुन मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हददीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असल्याबाबत काढलेल्या आदेशाचा भंग करीत असताना सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध महात्मा फुले चौक, पोलीस स्टेशन, कल्याण येथे गुन्हा रजि.नंबर I९५२/२०२५ शस्त्र अधिनीयम १९५९ चे कलम ३, २५ सह, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५, सह भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सदर गुन्ह्यात लागलीच अटक करण्यात आली आहे. सदर आरोपिंची  दि. ०४/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस रिमांड कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुभाष तावडे, खंडणी विरोधी पथक (गुन्हे शाखा) ठाणे शहर करीत आहे.

सदरची कारवाई श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त शोध -२, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील वपोनि. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, पोउनि. सचिन कुंभार, सुभाष तावडे, पोहवा. शैलेश शिंदे, आशिष ठाकुर, संजय राठोड, राजाराम पाटील, अभिजीत गायकवाड, सचिन जाधव, पोना. सुमित मधाळे, रविंद्र संभाजी हासे, चापोहवा. भगवान हिवरे, मपोहवा. शितल पावसकर, पोहवा. सतिश सपकाळे, पोशि. विनोद ढाकणे, तानाजी पाटील, संतोष वायकर, अरविंद शेजवळ यांनी केली आहे.