BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये नवकन्या आणि मातृ पितृ पूजन व दसरा उत्साहात साजरा..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) :  दर वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील 'जे एम एफ' मंडपम मध्ये नव कन्या पूजन करण्यात आले. "या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेंनं संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः" पार्वती मातेची नऊ रूपे ओळखल्या जाणाऱ्या नवदुर्गा तसेच सरस्वती, लक्ष्मी, पद्मावती, या शिशु विहार मधील छोट्या बालिका नव दुर्गेच्या रूपात नटून थटून आल्या होत्या. त्याच बरोबर व्यंकटेश, भृगूऋषी, गणपती बाप्पाच्या रूपात छोटी बालके आली होती. जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये स्वर्गच अवतरला होता असे जाणवत होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शाळेच्या प्रवेश दारापासून सर्व देवी देवतांचे  पाय प्रक्षाळून व त्यांचे औक्षण करून सर्वांना सन्मानाने वाजत गाजत मंडपम मध्ये आणून त्यांच्या स्थानावर विराजमान केले. नऊ देवी देवतांची शास्त्रशुद्ध पूजा करून आरती केली व सर्व देवींची साडी खण नारळाने ओटी भरली. शिशु रूपातील नव दुर्गेच्या तेजानी जणू सारा जे एम एफ मंडपम तेजोमय  झाला होता. सर्व पालकांनी देखील कन्या पूजन केले. देवीच्या नवरात्र बरोबरच ही नवरात्र गिरी बालाजी म्हणजेच व्यंकटेशाची देखील आहे म्हणूनच शेष शय्येवर साक्षात बालाजी व त्यांच्या द्विपत्नी लक्ष्मी आणि पद्मावती देखील आपल्या रूपात विराजमान झाल्या होत्या. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी भृगूऋषी आणि लक्ष्मी रागाने का निघून गेली याची कथा सांगितली. शिशु विहारच्या उप मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांनी बालकांना उत्तम सहकार्य करून शिशु रूपातील देवतांनी नाटिका रंगवली.
     
"मातृ देवो भव, पितृ देवो भव गुरू देवो भव, आचार्य देवो भव"
ब्रह्मांडामध्ये देवांपेक्षाही सर्व श्रेष्ठ कोण असेल तर "माता पिता" म्हणूनच गणपती बाप्पाने देखील आपल्या आईवडिलांचे पूजन करून त्यांनाच तीन प्रदक्षिणा घातल्या, हेच संस्कार आपल्या पाल्यामध्ये असणे गरजेचे आहे म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांच्या भोवती परिक्रमा केली.
अनेक वेळा भगवतीने नऊ पेक्षा अधिक रूपात प्रकट होऊन वाईट शक्तींचा संहार केला आहे, आज ही निरागस दिसणारी शिशु देवींची रुपे म्हणजे आपल्या मधील षडरिपुंवर मात करून ब्रह्मचारिणी देवी  संसारात राहून सुद्धा विरक्त जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगुन नऊ रूपमधील देवींची माहिती सांगितली तसेच वैकुंठपती व्यंकटेशाला देखील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी भगवतीला पाचारण करावे लागले असेही सांगितले. त्यानंतर सर्वांना नवरात्री व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
विजयादशमी म्हणजेच दसरा, रामाने रावणाचा वध करून विजयी पताका फडकवत ठेवली म्हणून आजही आपण नऊ शक्तींची पूजा करून विजया दशमीला वाईट गोष्टी नष्ट करून एकमेकांना आपट्याची पाने 'सोने' म्हणून pदेवाणघेवाण करत आलिंगन देतो, संस्कृती आणि संस्कार हे आपल्या चांगल्या विचारांवर टिकले आहेत म्हणूनच ही संस्कृती आपल्या पुढच्या पिढीनेही टिकवून ठेवावी हीच शिकवण शाळेच्या माध्यमातून देत आहोत असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले व सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी देखील देवी झालेल्या सर्व बालिकांचे कौतुक केले, तर इतर वेळी एका ठिकाणीही शांत न बसणारे हे विद्यार्थी खरोखरच संयमाने बसले आहेत तर साक्षात देवीच स्वर्गातून खाली उतरून बसल्या आहेत असा भास होत असल्याचा त्या म्हणाल्या. शिशु विहारच्या सर्व शिक्षिकांनी, पालकांनी देखील मनापासून मुलींना वेशभूषा करून सहकार्य केले. या नंतर सर्व पालक, शिक्षकांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम करून गरबा दांडिया चा खेळ रंगला.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले शाश्वत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी : लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत केले आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरण कृती समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावाबाबत पदाधिकाऱ्यांना शाश्वत केले, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी  दिली.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. तसेच या विमानतळाला आदरणीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या भूमिपुत्रांच्या तीव्र भावनांची माहिती दिली. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात काही अडचणी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढावा. तसेच आदरणीय दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत शाश्वत करावे, अशी आग्रही मागणी कपिल पाटील यांनी केली. 
लोकसभेत २०१६ मध्ये सर्वप्रथम कपिल पाटील यांच्याकडून दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर झाला. तो नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर तो गृह मंत्रालयात मंजुरीसाठी गेला. गृह मंत्रालयाच्या मान्यतेनंतर संबंधित प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला, अशी माहिती कपिल पाटील यांनी या बैठकीत दिली. तसेच संबंधित प्रस्तावात अडचणी आहेत का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार असल्याचे शाश्वत केले.

मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर व इतर लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा समावेश होता.

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम' महाविद्यालयाचे '५८ व्या युथ फेस्टिवल मुंबई' विद्यापीठामध्ये नावलौकिक व पालकांसह कौतुक सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) : डोंबिवली स्थित 'जेएमएफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले. '५८ व्या युथ फेस्टिवल' मध्ये मुंबई विद्यापीठातील ३०० च्या वर १२ झोन मधुन २७ कॉलेजमध्ये 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माईम ऍक्ट मध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच मराठी नाटक 'माझी शाळा' यामध्ये ३५० च्या वर १२ झोन मध्ये ४७ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता आणि यात रौप्य पदक पटकविणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक व गुणगौरव सोहळा 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या मधुबन वातानुकुलीत बँक्वेट हॉलमध्ये आज दिनांक २७/०९/२०२५ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या नियोजनाखाली पार पडला. 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चीफ एडिटर 'सी न्यूज भारत' चैनल दिल्ली चे श्री. पवन शर्मा हे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा आणि सन्मान करण्याचे सांगितले. संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत किती महत्त्वाची आहे जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आमच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकतात आणि इथेच परिवाराचा एक हिस्सा म्हणून नोकरीही करतात. 
सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना आपल्या पाल्याचे कौतुक बघुन अतिशय आनंद झाला होता व डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एन.नाडार  यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. असेच यश संपादन करत रहा असेही मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीज चे डॉ . कुमार सर, उपप्राचार्य डॉ. वनिता लोखंडे, प्रमुख समन्वयक मंजूला ढवळे हेही उपस्थित होते. या कौतुक सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रति आपले मनोगत व्यक्त केले आणि आपले अनुभव सांगितले. नाटकाचे दिग्दर्शक प्रथमेश देवकोळे आणि शुभम जाधव यांच्या मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच प्राध्यापिका मृणाली जाधव यांनी मुलांच्या तयारीला मोलाचे सहकार्य केले.  कार्यक्रमाला संपूर्ण महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

माइम ऍक्ट सहभागी..
पराग सुतार, तन्वी गुरव, दिवेश मोहिते, निधी अमीन, मितेश पाटील, मंथन पाटील
साथीदार
 मयंक कोठारी, स्नेहा मिश्रा

माझी शाळा स्किट सहभागी..
दिवेश मोहिते, तन्वी गुरव, यश बडेकर, साई कुड्तुडकर, दुर्वा घाडी, सानिका तांबोळी
साथीदार
आयुष सावंत, संस्कार कदम
या कार्यक्रमाचे टिळक देऊन स्वागत सौ. खुशबू दुबे तसेच सूत्रसंचालन प्रा. एकनाथ चौधरी आणि प्रा. सुनिता पाटील यांनी केले.

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेर पर्यंत खुले होणार – मुख्यमंत्री फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : मेट्रो ४ आणि ४-अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणे आणि मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल. २०२६ च्या ऑक्टोबर पर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मेट्रो मार्ग ४ (वडाळा-कासारवडवली) व ४-अ (कासारवडवली-गायमुख) च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव-घोडबंदर रोड- कासारवडवली-विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो मार्ग ४ आणि ४-अ बद्दल माहिती देताना म्हणाले की, घाटकोपर-मुलुंड-गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून मेट्रो ४ ची ३२ कि.मी. आणि मेट्रो ४-अ ची २.८८ कि.मी आहे. मार्गिकेत एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ४, मेट्रो ४-अ, मेट्रो १० आणि मेट्रो ११ या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्याकरिता भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा असा आहे की, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ही ५८ किमी लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरु झाल्यावर यामध्ये १३ लाखापेक्षा जास्त दैनंदिन प्रवासी प्रवास करतील. या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे टप्प्याटप्प्याने सर्व टप्‍पे प्रवाशांकरिता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये..

बीईएमएल (BEML) चे ६-डब्यांचे ट्रेन-सेट्स, जे मेट्रो मार्ग २ अ व ७ वर चालत आहेत त्याच पध्दतीच्या आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली, अडथळा (Obstacle) शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली (सुमारे ३०% बचत) या सुविधा असतील.

या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व धाव चाचणी करून, एमएमआरडीए ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी मेट्रो मार्ग ४ व ४-अ कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.

समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारे हे सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच या सरकारचे धोरण आहे. कै.अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. या माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट येथे आज स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच मोठ्या संख्येने माथाडी कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम कै. आमदार अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी संघटनेसाठी एक संघटन उभे केले. आपल्या समाजातील लोकांच्या हितासाठी, माथाडी कामगारांच्या विकासासाठी एखादी व्यवस्था उभारण्यासाठी आपले घर-संसार पणाला लावणारे नेते इतिहासात कमीच आढळतात. त्यापैकी कै.आमदार अण्णासाहेब पाटील हे एक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी कै.अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली. या चळवळीला त्यांनी संघटित स्वरूप दिले. अण्णासाहेबांच्या त्यागामुळे आणि प्रयत्नांमुळे माथाडी कामगारांना आवाज मिळाला, सुरक्षा मिळाली आणि पुढील पिढ्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळाला. अण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठीचे योगदान सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेबांनी मोठा लढा दिला. मराठा समाजासाठी बलिदान दिले असेल तर ते अण्णासाहेब पाटील यांनीच दिले. त्यांच्या बलिदानातूनच मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पुराव्याअभावी आरक्षणापासून वंचित असलेला मराठा समाज आता आरक्षणासाठी पात्र ठरला आहे. या माध्यमातून अण्णासाहेबांच्या चळवळीला हातभार लावण्याचे काम या सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.

मराठा समाजाचे प्रश्न केवळ आरक्षणाने सुटणार नाहीत. त्यासाठी मराठा तरुणांसाठी शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना सुरू केली आहे. शिक्षणासाठी शहरात राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भत्ता म्हणून दरवर्षी ६० हजार रुपये देण्यात येतात. मराठा तरुण-तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळावे, त्यांना एमपीएससी, युपीएससी परीक्षा देता याव्यात यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन केली. आतापर्यंत सारथीच्या माध्यमातून ११२ तरुण आयएएस आणि आयपीएस म्हणून नियुक्त झाले आहेत. १ हजार ४८ तरुण-तरुणी महाराष्ट्र शासनात एमपीएससीद्वारे अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. आतापर्यंत सारथीच्या योजनांचा ८ लाख ३८ हजार ४७७ तरुण-तरुणींनी लाभ घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मराठा तरुणांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात आले असून, या महामंडळातून दीड लाख तरुण-तरुणी उद्योजक झाले आहेत. त्यांना कर्जाच्या स्वरूपात १३ हजार ५०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, असे महत्त्वाचे निर्णय आपल्या सरकारने मराठा समाजासाठी घेतले असून, अशाच प्रकारचे विविध निर्णय इतर समाजातील तरुणांसाठीही घेण्यात आले आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण आहे.

माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या चौकटीत राहून जे करणे आवश्यक आहे ते आम्ही निश्चित करू. नियमांनुसार माथाडी कामगारांना जे काही देता येईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “देवा भाऊ” असा उल्लेख करून मराठा समाज आणि माथाडी कामगारांसाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्यांचे आभार मानले. त्यांनी माथाडी कामगारांच्या निवासासाठी स्वस्त दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून दीड लाख उद्योजक निर्माण करता आले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात माथाडी कामगारांचे सध्याचे प्रश्न मांडले. यावेळी माथाडी भूषण मानकरी श्री. दिनकर कृष्णा काटकर, विश्वास कृष्णराव पिसाळ, जनाबाई नारायण धुमाळ, वामन सिताराम वैद्य, मधुकर साहेबराव कदम, राजेंद्र खाशाबा लंभाते, प्रदीप गजानन भगत, अनिल सुरेश खताळ, दत्तात्रय ज्ञानदेव कवर, लक्ष्मण दिलीप पाटील, दीपक नारायण आहेर, भिमराव दशरथ चव्हाण, शशिकांत विष्णू यादव, शंकर भिकाजी शिंदे, संतोष गोणबा गाढवे, सुभाष बळवंत यादव, गौतम शनिचर भारती यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोनल गुंजाळ, संभाजी शिवाजी बर्गे, सुनील धोंडे, मयूर मगर, अंकुश संकपाळ या लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.

पुन्हा एकदा 'जे एम एफ' संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाचे 'मुक अभिनय' स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ५८ व्या युवा महोत्सवामध्ये वर्चस्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  मुंबई विद्यापीठामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'एकांकिका नाटक स्पर्धा' व 'मूक अभिनय' स्पर्धेमध्ये 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे रौप्य पदक व सुवर्ण पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. दिवेश मोहिते, पराग सुतार, तन्वी गुरव, मंथन पाटील, मितेश पाटील, निधी अमीन त्याच बरोबर सहकारी सिद्धार्थ कटारे, स्नेहा मिश्रा यांनी मूक अभिनय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून प्रथम स्थान निश्चित केले व पुन्हा एकदा 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोचला. नाटकाचे दिग्दर्शन शुभम जाधव यांनी केले सांस्कृतिक समन्वयक मयांक कोठारी यांनी प्रतिनिधित्व केले. मिस मृणाली जाधव यांनी या सर्वांचे नेतृत्व केले 
      
यशाची पायरी चढताना अपयशाच्या पायऱ्यांनाही तेवढेच महत्व असते, म्हणूनच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते. नाटक आणि अभिनय स्पर्धेमध्ये अनुक्रमे रौप्य आणि सुवर्ण पदक मिळवून तुम्ही वंदे मातरम् महाविद्यालयाला सन्मानित केले आहे त्याला तोड नाही, भविष्यात देखील अशीच अनेक यशाची उत्तुंग शिखरे चढत रहा आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करा असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थांना सांगून अभिनंदन करून शुभेछा दिल्या.
      
दर सेकंदाला माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात म्हणजेच रोजच्या वास्तविक जीवनात देखील मनुष्य नकळतपणे मूक अभिनय करतच असतो, नामांकित स्पर्धेमध्ये  औपचारिक रित्या सहभागी होऊन  मूक अभिनय करून  प्रेक्षकांकडून जी तुम्ही दाद मिळवली व सुवर्ण पदक पटकावले त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन असे म्हणून  सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे देखील मुलांच्या आनंदात सहभागी झाल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर,  उप प्राचार्या सौ. वनिता लोखंडे,  मुख्य समन्वयक सौ. मंजुळा धावले तसेच सर्व 'जे एम एफ' परिवार यांनी पदक विजेते विध्यार्थ्यांचे कोटी कोटी अभिनंदन केले.

एसटी मध्ये १७४५० चालक, सहाय्यकांची पदे भरण्याची मेगा भरती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई:  एसटी मध्ये मोठी नोकरभरती जाहीर झाली आहे. आगामी नवीन बसेससाठी कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यकांची भरती करण्यात येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरतीसाठी किमान वेतन ३० हजार रुपये असणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ३ वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल.