BREAKING NEWS
latest

बारामतीत काँग्रेसची माघार मात्र पाठिंबा नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. एकूण ५३ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी तीस उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी मागे घेतले. त्यानंतर आता इथे एकूण २३ उमेदवार रिंगणात असून त्यात बहुतांश अपक्ष उमेदवार रिंगणात राहिले असून त्यामुळे महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडणुकीबाबत आज सकाळपासून राज्यात राजकीय विविध घडामोडी आणि ट्विस्ट पाहायला मिळाले. महाराष्ट्राची सभ्यता, सुसंस्कृतपणा विचारात घेऊन बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार घेतली असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बारामतीतून उमेदवारी माघारी घेतली असली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम, २०२९ ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल असे सपकाळ यावेळी म्हणाले.

बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता कामा नये ही भूमिका आहे. पण याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजस्यपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत, आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

भिवंडी येथील प.रा.हायस्कूल चे निलेश शंकर नरवडे यांना ‘शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे ज. ए. इ.चे प. रा. विद्यालय, भिवंडी येथील एनसीसी /आरएसपी अधिकारी  निलेश शंकर नरवडे यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या श्री. नरवडे यांनी शिक्षण क्षेत्रात तसेच एनसीसी आणि रस्ता सुरक्षा अभियान (आर एस पी) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत लक्ष्मी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील आहेर यांनी त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली आहे.

लक्ष्मी शैक्षणिक संस्था सन २०१७ पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करते. यावर्षी आदर्श मराठी शाळा, इंग्रजी संभाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयाजवळ, मुंबई-३२ येथे पार पडणार असून, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल प. रा. विद्यालय भिवंडीचे शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रदीप राका, मुख्याध्यापिका सौ. नंदा कोंगे, तसेच महाराष्ट्र राज्य 'मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा' ग्रुपचे प्रमुख व आर एस पी विभागीय समन्वय अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी, 'दैनिक स्वराज्य तोरण' चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, 'निर्भया फाऊंडेशन इंडिया' चे अध्यक्ष मनोज बर्डे, जिल्हा समादेशक जितेंद्र सोनवणे, कला अध्यापक आर एस पी अधिकारी शिक्षक संदिप पाटील, मंगेश भामरे, विभागीय समन्वय अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह शिक्षकवृंद व मित्रपरिवाराकडून निलेश नरवडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील १२०० शिक्षकांना अनिल बोरनारे यांच्याकडून अखेर न्याय; डीसीपीएस योजनेचे परिपत्रक जाहीर.

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण -  मुंबई महानगरपालिकेतील माध्यमिक शाळांमधील १२०० शिक्षकांना शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला असून शिक्षकांच्या डिसिपीएस योजनेचे परिपत्रक मुंबई मनपा ने निर्गमित केले आहे मुंबई मनपाच्या संपूर्ण मुंबईमध्ये २४९ माध्यमिक शाळा असून त्यापैकी ५१ शाळा या अनुदानित व २०० शाळा या विनाअनुदानित आहेत. अनुदानित शाळांसाठी शासन अनुदान देते व विनाअनुदानित शाळा या मनपा स्वखर्चाने चालवते. सदर शाळांमध्ये जवळपास १५०० शिक्षक कार्यरत असून सन २००८ पासून सदर सर्व शिक्षक आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत. गेल्या १८ वर्षांपासून आर्थिक कल्याणकारी लाभांपासून वंचित आहेत. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, मृत्यू उपदान, कुटुंब पेन्शन योजना यांसारख्या मूलभूत योजनांपासून वंचित होते.सदर शिक्षकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. 

DC-। योजना सन २००७ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे DC-1 ही पेन्शन योजना लागू आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार मधून १०% रक्कम कपात करणे व तेवढीच रक्कम सरकारकडून ऍड करून सदर रक्कम DCPS च्या खात्यांमध्ये टाकली जाते, परंतु सदर कर्मचारी सेवेत कायम होऊन १४ वर्षे झाली परंतु  मुंबई मनपा शिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांचे DCPS चे खातेच उघडले गेले नव्हते. या शिक्षकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा देखील केलेला होता पण फक्त तुमचे काम सुरू आहे एवढेच आश्वासन शिक्षकांना मिळत होते. अखेर मुंबई मनपातील शिक्षकांनी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याकडे धाव घेतली. 

बोरनारे यांनी लागलीच ९ ऑक्टोबर २०२५ रोजी याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीला अनिल बोरनारे यांच्यासमवेत मुंबई मनपा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र लिंबकर, अशोक गर्जे, रोहित कुलकर्णी, यशवंत पवार, चंद्रकांत घोडेराव, विक्रांत गायकवाड, धर्मेंद्र तिवारी, अंबादास माने तसेच शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत या प्रकरणाची फाईल प्रमुख लेखापाल वित्त यांच्याकडे मंजुरी करता सादर करण्यात आली होती. त्यानंतर अनिल बोरनारे यांनी नवनियुक्त महापौर तसेच आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक निर्गमित करून बाराशे शिक्षकांना न्याय मिळवून दिला असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

डोंबिवलीतील सारंग गाव येथे जेपीएल स्पर्धा उत्साहात संपन्न..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली - डोंबिवलीतील सारंग गाव येथे आयोजित करण्यात आलेली 'जेपीएल २०२६- जवळेथर प्रीमियर लीग' ही क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत गावातील १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या स्पर्धेत कोणताही वाद किंवा गैरप्रकार न होता सामने शांततेत पार पडले.

या स्पर्धेला माजी परिवहन सभापती व माजी नगरसेवक संजय पावशे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांनी ५००० रुपयांची देणगी तसेच खेळाडूंना १००० रुपयांचे रोख बक्षीस देत मार्गदर्शन केले. ही स्पर्धा गावातील एकी, मैत्री आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण ठरली. 'टायगर ११' च्या सर्व सदस्यांनी मैदानाची तयारी, खेळाडूंची व्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत आणि संपूर्ण नियोजन अत्यंत व्यवस्थित पार पाडले.

स्पर्धेत गांगो रवळनाथ क्रिकेट संघ (जवळेथर), टायगर ११ बॉईज, युवराज मोरे क्रीडा सामाजिक विकास फाउंडेशन, रचना फायटर, रविंद्र ११ धावडे वाडी (जवळेथर) आणि स्व. दिनेश मोरे स्मृती या संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेते संघ म्हणून गांगो रवळनाथ क्रिकेट संघ (जवळेथर) आणि युवराज मोरे क्रीडा सामाजिक विकास फाउंडेशन यांनी बाजी मारली.

स्पर्धेतील सर्व सामने 'VMD Sports Live'  या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले, त्यामुळे गावाबाहेरील क्रिकेटप्रेमींनाही स्पर्धेचा आनंद घेता आला. या उपक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, देणगीदार आणि प्रायोजक यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. त्यांच्या पाठबळामुळेच स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील सयाजी मोरे (नगरसेवक), प्रकाश भोईर (माजी नगरसेवक), संजय पावशे (माजी नगरसेवक), ज्योती पवन पाटील (नगरसेविका), सुजय विचारे (युवा मोर्चा अध्यक्ष, भाजप), योगेंद्र भोईर (शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष) आणि कुंदन रामाणे (जाणता राजा मंडळ अध्यक्ष) उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष विशाल धावडे, उपाध्यक्ष प्रतीक धावडे, सचिव महेंद्र धावडे, खजिनदार जितेंद्र धावडे आणि उपखजिनदार अक्षय धावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच रोशन मोरे, शुभम केगडे, विशाल मोरे, विराज चव्हाण, दिनेश मोरे आणि टायगर ११ च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बिल्डरच्या घशात रस्त्याची जागा घालण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी मंजूर रस्ता वळवल्यामुळे उबाठा गटाचे पालिकेविरोधात आमरण उपोषण..

विशेष प्रतिनिधी

कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पूर्व कोळसेवाडी परिसरात बिल्डरच्या फायद्यासाठी कित्येक वर्ष जुना दळण वळणाचा व मंजूर झालेला रस्ता वळवण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही वळवलेला रस्ता थांबवण्यासाठी, पालिका अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण कोळसेवाडी येथील भैरव टी- हाऊसच्या शेजारी आमरण उपोषण सुरू केले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पालिका प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, पालिका प्रशासन नेमकं कोणासाठी काम करत आहे? जनतेच्या सेवेसाठी का शासनाच्या जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
"शिवाजी कॉलनी ते भैरव टी- हाऊस ते म्हसोबा चौक" पर्यंत काँक्रीटचा रस्ता खासदार निधीतून मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी जुनी जनता सहकारी बँक ते भैरव टी-स्टॉल या सुमारे १५० ते २०० मीटर अंतराच्या मंजूर जुन्या रस्त्याचे काम करण्याऐवजी तो रस्ता बिल्डरच्या फायद्यासाठी वळवून जुनी जनता बँक ते जॉली टेलर असा रस्ता बांधण्यात आला आहे.

याचदरम्यान, वहिवाटीचा रस्ता बंद करून नव्या जागी रस्ता वळवून तो बांधण्याची प्रक्रिया महानगरपालिका अधिनियम व नगररचना कायद्याच्या तरतुदींना बगल देत केली जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे. सार्वजनिक रस्ता बंद किंवा स्थलांतरित करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी, नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया केली गेलेली नाही.

जॉली टेलर ते जनता बँक दरम्यान नव्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. या नव्या रस्त्याच्या निर्मितीनंतर विद्यमान रस्ता बंद करून त्या जागेचा समावेश शेजारील विकासकाच्या प्रकल्पात समाविष्ट करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

म्हसोबा चौक ते भैरव टी-हाऊस हा सुमारे १८ मीटर रुंदीचा मंजूर विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता असल्याची माहिती समोर येत असताना, प्रत्यक्षात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामध्ये रस्त्याची रुंदी अनेक ठिकाणी कमी झाल्याचे तसेच आवश्यक फुटपाथ व गटारांची कामे करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे मंजूर डी.पी. आराखड्याचे उल्लंघन होत असल्याची शक्यता वर्तवली जात असून आवश्यक त्या प्रकरणांमध्ये राज्य शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक असते. मात्र, या प्रकरणात अशा कोणत्याही प्रक्रियेचा पारदर्शकपणे अवलंब करण्यात आलेला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ नागरिकांच्या वापरात असलेला हा रस्ता अचानक बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याने, या मार्गावर उपजीविका करणाऱ्या अनेक लघु व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचाही भंग होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, मूळ डी.पी. रस्त्यामध्ये फेरफार करून एका विकासकाच्या फायद्यासाठी रस्ता वळवण्यात आला असून, यात काही संबंधित पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे काल उपोषण करण्याचा निर्णय प्रकाश घन‌श्याम जाधव (उपशहरप्रमुख), ऋतू कांचन रसाळ (कक्ष शहर संघटक), नितिन मोलुल, संगिता गांधी, गणपत घुगे, वैभव घाडगे, अमित हरिश्चंद्र उगले, अर्जुन कणसे, अक्षता पवार (गटप्रमुख), गितांजली परशुराम आंबे, भारती सांबुख, अनंत केशव ब्रिद, अशोक सावंत, रमेश काचाई मेहर, अरुण उगले, राम शिंदे (उपशहर प्रमुख), गांधी (विभागप्रमुख), भारती (कार्यप्रमुख) यांनी घेतला आहे.

नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा करून रस्त्याचे बांधकाम सुरू - सचिन घुटे, नगररचना विभाग

कल्याण पूर्वेकडील म्हसोबा चौक ते भैरव टी-हाऊस पर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामाबाबत विचारले असता, कल्याणचे शहर नियोजक, सचिन घुटे यांनी सांगितले की, रस्त्यासाठी मंजूर नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा करण्यात आल्या असून त्यानुसार रस्त्याचे काम सुरू आहे. त्यावेळी आमरण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या गुलवे यांनी आरोप केला की, त्या रस्त्याचे बांधकाम मंजूर आणि खुणा केलेल्या नकाशाप्रमाणे केले जात नाही असे सचिन घुटे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सांगितले की, नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा आमच्या विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पण त्या रस्त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, त्यामुळे या प्रकरणी फक्त तेच कोणतीही माहिती देऊ शकतात.

देशभरातील निवडक लोकप्रतिनिधींच्या यादीत ‘पिंपरी-चिंचवड’चा सन्मान; कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :  ‘कॉमनवेल्थ संसदीय संघटना वेस्ट झोन–७’ तर्फे गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. दिनांक ८ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या या परिषदेत देशातील निवडक आणि अभ्यासू आमदारांनाच पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आमदार अमित गोरखे यांना या परिषदेच्या ‘मुख्य पूर्ण अधिवेशनात’ आपले विचार मांडण्याची अत्यंत महत्त्वाची संधी देण्यात आली आहे, ही बाब त्यांच्या नेतृत्वगुणांची व धोरणात्मक दृष्टीकोनाची राष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे स्पष्ट करते.

राष्ट्रीय दिग्गजांची मांदियाळी या परिषदेला देशाचे सर्वोच्च संसदीय नेतृत्व उपस्थित राहणार आहे. यात प्रामुख्याने:
श्री. ओम बिर्ला – माननीय लोकसभा अध्यक्ष
डॉ. प्रमोद सावंत – माननीय मुख्यमंत्री, गोवा
डॉ. गणेश गावंकर – अध्यक्ष, गोवा विधानसभा
श्री. हरिवंश नारायण सिंह – उपसभापती, राज्यसभा
ऍड. राहुल नार्वेकर – अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
प्रा. राम शिंदे – सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद
श्री.शंकरभाई चौधरी – अध्यक्ष, गुजरात विधानसभा
श्री. पुसापती अशोक गजपती राजू – माननीय राज्यपाल, गोवा राज्य 
श्री. माविन गोडिन्हो – मंत्री, गोवा राज्य 
श्री. जोशुआ पीटर डीसूझा – उपाध्यक्ष, गोवा विधानसभा

परिषदेमधील सत्रे – धोरणात्मक दिशादर्शक चर्चा मुख्य
पूर्ण अधिवेशनाच्या पहिल्या भागात ‘विकसित भारत २०४७ साध्य करण्यात युवा विधिमंडळ सदस्यांची भूमिका’ या अत्यंत महत्त्वपूर्ण सत्रात आमदार अमित गोरखे महाराष्ट्राचा विकासदृष्टिकोन, युवा नेतृत्वाची जबाबदारी आणि धोरणात्मक दिशा प्रभावीपणे मांडणार आहेत. दुसऱ्या भागात ‘व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण आणि किनारी संपर्क या क्षेत्रांतील वेस्ट झोन–७ ची प्राधान्ये’ हा विषय आहे. तसेच परिषदे दरम्यान विविध विषयांवर चर्चासत्रे, संवाद सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आंतरराज्य समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आहे. ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीत महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडणे, तसेच युवा नेतृत्वाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी ठोस धोरणात्मक विचार मांडणे, ही माझी प्राथमिकता असेल, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

आमदार अमित गोरखे राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण पाऊल
आमदार अमित गोरखे यांची या परिषदेसाठी झालेली निवड ही त्यांच्या प्रभावी कामगिरीची, जनाधाराची आणि नेतृत्वक्षमतेची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल मानली जात आहे. अत्यंत मर्यादित आमदारांमधून निवड होणे आणि त्यातही मुख्य अधिवेशनात विचार मांडण्याची संधी मिळणे, हे महत्वाचे आहे. 

पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण
या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे होणार असून, स्थानिक प्रश्नांना व्यापक स्तरावर मांडण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जात असल्याचेही यावरून स्पष्ट होते. आमदार अमित गोरखे यांची या परिषदेसाठी झालेली निवड ही पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरत असून, राज्याचा आवाज देशाच्या धोरणात्मक चर्चांमध्ये अधिक ठामपणे पोहोचवण्यास निश्चितच हातभार लावणारी ठरणार आहे.

कल्याण व शहापूर येथील ८० व ६० वर्षीय रुग्णांवर किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथे उच्च जोखमीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, ०७ एप्रिल : 'किम्स हॉस्पिटल्स', ठाणे यांनी कल्याण व शहापूर येथील अनुक्रमे ८० व ६० वर्षीय अशा दोन रुग्णांवरील गुंतागुंतीच्या व उच्च-जोखमीच्या हृदयविकार प्रकरणांवर यशस्वी उपचार करून गंभीर आजार व अनेक सहव्याधी (co-morbidities) असलेल्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यातील आपले वैद्यकीय कौशल्य सिद्ध केले आहे.

भारतामध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असून एकूण मृत्यूंपैकी सुमारे २८% मृत्यू हृदयविकारामुळे होतात. दरवर्षी अंदाजे २ लाख बालकांमध्ये तसेच लाखो प्रौढांमध्ये गंभीर हृदयविकाराचे निदान होते. मात्र प्रगत अवस्थेतील हृदयरोग असलेल्या रुग्णांपैकी केवळ काहींनाच वेळेत शस्त्रक्रियेची संधी मिळते, ज्यामुळे उपचारांमध्ये मोठी दरी असल्याचे दिसून येते.

पहिले प्रकरण:
कल्याण येथील रहिवासी नामदेव देशमुख (वय: ८० वर्षे ) यांची सुरुवातीला दोन्ही गुडघ्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी (B/L TKR) तपासणी सुरू होती. शस्त्रक्रियेपूर्व हृदय तपासणी दरम्यान डॉक्टरांना एओर्टिक व्हॉल्वमध्ये गंभीर अरुंदता तसेच कोरोनरी धमन्यांमध्ये पाच गंभीर ब्लॉकेज आढळले, ज्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास असल्याने शस्त्रक्रियेचा धोका अधिक वाढला होता.

या गुंतागुंतीच्या परिस्थितीत किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील कार्डियाक सायन्सेस टीमने एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट सोबत पाच कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट्सची संयुक्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम राहिली. आयसीयूमध्ये स्थिर स्थिती, दुसऱ्या दिवशी हालचाल सुरू झाली आणि अवघ्या पाच दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

दुसरे प्रकरण:
शहापूर येथील वासुदेव हांबीर (वय: ६० वर्षे ) यांना १४ वर्षांपूर्वी छातीला झालेल्या दुखापतीमुळे दीर्घकालीन गुंतागुंत निर्माण झाली होती. मागील दोन वर्षांपासून त्यांना वाढता श्वास लागणे, पाय व पोट सुजणे तसेच दीर्घकाळ सूज राहिल्यामुळे जखमा (अल्सर) होण्याचा त्रास होत होता.

सविस्तर तपासणीत यकृत सिरोसिस,अ‍ॅसाइटिस, पोर्टल हायपरटेन्शन, स्प्लेनोमेगली, दोन्ही पायांतील व्हेरिकोज वेन्स तसेच अत्यंत कॅल्सिफाइड (“दगडासारखा कठीण”) पेरिकार्डियमसह कन्स्ट्रिक्टिव पेरिकार्डायटिस अशा अनेक गंभीर समस्या आढळल्या. या शस्त्रक्रियेत मृत्यूचा धोका सुमारे ५०% इतका होता.

अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असूनही किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील कार्डियाक सायन्सेस टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. रुग्णाने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला, तिसऱ्या दिवशी चालण्यास सुरुवात झाली आणि सहाव्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आले.

डॉ. बी.सी. कलमठ, संचालक व विभागप्रमुख – कार्डियाक सायन्सेस विभाग, म्हणाले, “या प्रकरणांमधून शस्त्रक्रियेपूर्व सखोल तपासणी आणि प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होते. गंभीर हृदयविकार आणि इतर आजार असलेल्या रुग्णांमध्येही योग्य कौशल्य, सुविधा आणि क्लिनिकल प्रोटोकॉलच्या मदतीने यशस्वी परिणाम साध्य होऊ शकतात.”

डॉ. सौम्य शेखर जेनासमंत, सल्लागार कार्डिओथोरॅसिक व व्हॅस्क्युलर सर्जन, म्हणाले, “ही दोन्ही प्रकरणे अत्यंत गुंतागुंतीची होती आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन, अचूकता व बहुविभागीय (multidisciplinary) दृष्टिकोन आवश्यक होता. अनेक सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ व उच्च- जोखमीच्या रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक असते, मात्र योग्य वेळी केलेला हस्तक्षेप आणि समन्वित उपचार पद्धतीमुळे सकारात्मक परिणाम साधता आले.”

सौरभ गुप्ता, प्रादेशिक संचालक, किम्स हॉस्पिटल्स, म्हणाले, “किम्स हॉस्पिटल्समध्ये आम्ही अत्यंत गंभीर रुग्णांनाही प्रगत हृदय उपचार सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. या यशस्वी उपचारांमुळे क्लिनिकल उत्कृष्टता, रुग्णकेंद्रित सेवा आणि अत्यंत अचूक व सुरक्षित पद्धतीने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याची आमची क्षमता अधोरेखित होते.”

ही प्रकरणे विशेषतः ज्येष्ठ नागरिक व अनेक आरोग्य समस्यांनी ग्रस्त रुग्णांमध्ये हृदयरोगांचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित करतात. हृदयरोगांचे वाढते प्रमाण आणि गुंतागुंत लक्षात घेता, एकात्मिक व प्रगत वैद्यकीय उपचार पद्धती जीवनमान सुधारण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यावश्यक ठरत आहेत.