BREAKING NEWS
latest

राज्यपालांची उचलबांगडी अटळ ? तर उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाने संभ्रम !


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधाला पुन्हा एकदा धार आली असून, भाजपच्या खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांची उचलबांगडी करण्याचा जणू निर्धारच केला आहे. विरोधी पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली असून, पर्यायाने महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा इशारा यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिला होता. दरम्यान काल दिवसभर नाट्यमय घटनेनंतर राज्यपाल यांची उचलबांगडी अटळ असल्याचे जाणवत असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

  आपले मत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सर्वजण उदयनराजेंच्या पाठीशी आहोत. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही, ते जरी भावनेतून बोलले असतील तरी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर पुढे त्यांनी केलेल्या भाष्याने या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाल्याचे जाणवत आहे.

  पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यपाल हे संवैधानिक पद आहे, राज्यपालांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला असतात यामध्ये सरकार कुठल्याही प्रकारचे हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे उदयनराजे या सर्व बाबी समजून घेतील अशी अपेक्षा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रपती काय आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांच्या दोन वेगवेगळ्या भाष्यानंतर हे या प्रकरणावर नेमकी कुठली भूमिका केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांच्याकडून घेण्यात येते यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. विरोधक मात्र आपल्या मतावर ठाम असून राज्यपाल हटाव धोरणावर ते कायम आहे, त्यामुळे भविष्यात हे प्रकरण नेमक्या कुठल्या दिशेला वळण घेते हे लवकरच कळेल.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत