सध्या देशभर सर्वंत्र टोमॅटोने शंभरी पार केली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे मिळण्याची संधी निर्माण झाली होती. असे असताना कर्नाटकमध्ये एका महिला शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल अडीच लाख रुपयांच्या टोमॅटो पिकाची चोरी झाली आहे. जीवाचं रान करून पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळण्याची संधी असताना चोरांनी डाव साधल्याने महिला शेतकरी धारिणी हवालदिल झाल्या आहेत.
चोरट्यांनी मंगळवार ४ जुलै रोजी रात्री हसन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील टोमॅटोची ५० ते ६० पोते लंपास केले. याप्रकरणी महिला शेतकरी धारिणी यांच्या फिर्यादीवरून हाळेबिडू पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोमॅटोंचा भाव १२० रुपये किलोच्या वर आहे. धारिणींनी टोमॅटोंची काढणी करत ते बंगळुरूच्या बाजारात नेण्याच्या तयारीत होत्या. फिर्यादी धारिणींच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते, त्यानंतर त्यांनी टोमॅटोंसाठी कर्ज घेतले होते. योगायोगाने पीक चांगले आले, भावही चांगला होता. धारिणीं यांनी आपल्या कुटुंबासह दोन एकर जमिनीवर टोमॅटोचे पीक घेतले होते.
हळेबिडू पोलीसांनी सांगितले की सुपारी आणि इतर व्यावसायिक पिकांची चोरी झाल्याचे आम्ही ऐकले होते, पण टोमॅटो कोणी चोरल्याचे कधीच ऐकले नाही. आमच्या पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. धारिणी यांच्या मुलानेही राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची विनंती केली आहे.
मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे टोमॅटोच्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली असून बाजारभावात वाढ झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा