BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील ४३ वर्षे जुनी तीन मजली 'धोकादायक इमारत' कोसळली; दोघांचा मृत्यू..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

 डोंबिवलीतील जुना आयरे रोड परिसरातील 'आदिनारायण कृपा' ही तीन मजली धोकादायक इमारत नुकतीच कोसळली. धोकादायक असलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तिघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य सुरू असून अजून कोणी ढिगाऱ्याखाली अडकले आहे का याचा तपास सुरू आहे.

डोंबवली पूर्वेतील जुना आयरे रोड परिसरातील ४३ वर्षे जुनी झालेली 'आदिनारायण कृपा' नावाची तीन मजली धोकादायक इमारत शुक्रवारी १५ सप्टेंबर रोज दुपारी कोसळली. 'आदिनारायण कृपा' ही लोड बेरिंग ची इमारत ४३ वर्षे जुनी झाली होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना गुरुवारी दुसरीकडे सुरक्षित स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर शुक्रवारी  दुपारच्या सुमारास इमारत कोसळल्याची घटना घडली.

'आदिनारायण कृपा' इमारतीत राहत असलेल्या ५० वर्षीय सुनील लोढाया नामक व्यक्तिला ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. मात्र, काही वेळातच इस्पितळात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुनील लोढाया यांची पत्नी अजून ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे काढण्यात आले असून अजून केवळ एक जण ढिगाऱ्याखाली अडकला असून रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य सुरू राहिले.

महापालिका प्रभाग अधिकाऱ्याने बजावलेल्या नोटीसनंतर काही कुटुंबानी सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतला होता तर काही कुटुंब अजूनही या इमारतीत वास्तव्यास होते. याशिवाय कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळीदेखील पाऊस सुरु होता. या दरम्यान ही इमारत कोसळली आहे. या घटनेत दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना ढिगाऱ्याखालून काढण्याचे काम सुरू आहे. अरविंद संभाजी भाटकर (७०) आणि गीता लोढाया (४५) असे ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची नावे आहेत.

काही कुटुंबांना सकाळपासून घराबाहेर काढण्याचे काम सुरू

 दुर्घटना ग्रस्त इमारत ही ४३ वर्षापूर्वी लोड बेअरिंग पध्दतीने बांधलेली आहे. या इमारतीमध्ये एकूण ४४ कुटुंब राहत होती. ही इमारत अतिधोकादायक असल्याने महापालिकेच्या 'ग' प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी या इमारतीमधील रहिवाशांना सदनिका खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. काही कुटुंब या इमारतीमधील घरे सोडून यापूर्वीच अन्यत्र राहण्यास गेली. काही कुटुंबांना शुक्रवारी सकाळपासून घराबाहेर काढण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.

दोघांनी घराबाहेर पडण्यास दिला नकार

 पालिकेची नोटीस मिळाल्यानंतर घरे रिकामी करण्याचे काम सुरू असतानाच शुक्रवारी संध्याकाळी या इमारतीचे वरील दोन मजले कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. आजुबाजुच्या इमारतींमधील रहिवासी घराबाहेर पडून रस्त्यावर येऊन उभे राहिले. या इमारतीमध्ये अरविंद संभाजी भाटकर हे रहिवासी राहतात. ते बिछान्याला खिळून आहेत. गीता लोढाया ही महिला मानसिकदृष्टया आजारी आहे. ती पण याच इमारतीत राहते. ते दोघेही घराबाहेर पडण्यास कर्मचाऱ्यांना नकार देत होते. याच दरम्यानच्या काळात इमारत कोसळली. हे दोघेजण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पालिका हद्दीत एकूण ६०२ धोकादायक इमारती

अग्निशमन दलाच्या जवांनांनी तातडीने महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत टीडीआरएफ चे १२ जवानांसह कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून ढिगारे बाजुला करण्याचे काम सुरू केले. कल्याण-डोंबिवलीत पावसानं उघड दिल्याने बचाव पथकाचे ढिगारा उपसण्याचे काम जोमाने सुरू आहे. एकनाथ नारायण पाटील हे या जागेचे मालक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 'ग' प्रभाग हद्दीत एकूण ४० धोकादायक इमारती आहेत. पालिका हद्दीत एकूण अश्या ६०२ धोकादायक इमारती आहेत अशी माहिती मिळत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत