राज्य सरकार च्या वतीने कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कल्याण व डोंबिवलीत मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. डोंबिवली पश्चिमेकडील बावन चाळ रेल्वे मैदान आणि ग्रामीणसाठी पूर्वेकडील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडांगण येथे ही सोय करण्यात आली होती. यावेळी लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी बसला झेंडा दाखवून कोकणवासीयांना सुखाचा प्रवास करण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गोपाळ लांडगे, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, माजी महापौर विनिता राणे, तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, भाऊ चौधरी, संजय पावशे,
हरिश्चंद्र पाटील, संदेश पाटील, माजी नगरसेवक रणजित जोशी, जनार्दन म्हात्रे, राहुल म्हात्रे, सुजित नलावडे, स्वाती मोहिते, संतोष चव्हाण यांसह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
डोंबिवली-कल्याण येथून सुमारे ३०० एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. डोंबिवलीतून शिवसैनिक संदेश पाटील व हरिश्चंद्र पाटील यांनी त्यांच्या प्रभागातील कोकणवासी भक्तांसाठी या एसटी बसपैकी ६२ एसटी बसची सेवा पुरविण्यास सहकार्य केले होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिक संदेश पाटील यांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला..
राज्याचे माजी मुख्यमंत्री अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले होते. त्यांनी तळागाळात जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी जे काम तळागाळातील लोकांसाठी केले त्याचा आढावा घ्यावा. आमदार आदित्य ठाकरे यांनी "शिंदे सरकार काही काम करत नाही फक्त पोस्टर बाजी करतात" अशी टीका नाशिक येथे केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लागवला आहे. डोंबिवली येथे कोकण व राज्यातील इतर भागात गणपती उत्सवासाठी जाण्याकरिता डोंबिवली-कल्याण येथील नागरिकांना मोफत एसटीची सोय करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वर टिका केली.
विद्यमान सरकारच्या कामाबद्दल बोलताना खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे म्हणाले कि, मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज दिलेले असून, विशेष कॅबिनेट बैठक संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आली होती. मराठवाड्यासाठी साठ हजार कोटीचे विविध सरकारी योजना पूर्ण करण्यासाठी पॅकेज देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी खात्यात साडेबारा हजार कोटीं रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर एसटीची ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत देण्यात आली असून, खास करून महिलांना देखील ५० टक्के सवलत एसटीच्या दरात देण्यात आलेली आहे. मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूकीसाठी रस्ता तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर केंद्र आणि राज्य शासनाकडून सुरू आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. गणपतीच्या अगोदर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या पद्धतीने युद्धपातळीवर त्या महामार्गाचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गणपतीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात मोफत एसटीची सोय करण्यात आली असून गेल्या वर्षी १९० बसेस आपण सोडल्या होत्या. यावेळी ५०० बसेस आपण सोडत आहोत. कोकणवासी चाकरमानी भक्त यांचा एसटीचा संबंध हा जिव्हाळ्याचा आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये कोकणातील चाकरमानी भक्तगण जात असतात. फक्त कोकणच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागात सुद्धा यावेळी एसटीची सोय करण्यात आलेली आहे. एसटी सोबत जे खाजगी किंवा आपल्या वाहनातून जात असतात त्यांच्यासाठी 'टोल फ्री' ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर गणपती साठी विशेष रेल्वेची सोय देखील केलेली आहे. या सरकारने हिंदु सणांवरील सर्व निर्बंध मागे घेतले त्यामुळे राज्यात आता उत्साहात सगळे मराठी सण साजरे करता येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा