BREAKING NEWS
latest

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत येणार; मंत्री सुधीर मुनगंटीवार आज लंडनला जाऊन करारावर करणार स्वाक्षरी..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया ऍन्ड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आज रविवारी १ ऑक्टोबर रोजी रात्री रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पूरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हे मंत्री मुनगंटीवार यांच्या सोबत असतील.

आज १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडन कडे रवाना होण्यापूर्वी मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. यावेळी विविध संघटना, मंडळे, संस्था यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त ऍलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया ऍन्ड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

या दौऱ्यात लंडन येथील टॅव्हिस्टॊक चौक येथे २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित रहातील. तेथील विविध भारतीय तथा महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून ते चर्चा करणार असून मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया ऍन्ड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वाक्षऱ्या होतील. यानंतर लगेच दूरदृश्यप्रणालीद्वारे पत्रकार परिषद होणार असून मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पत्रकारांशी संवाद साधतील. या दौऱ्यात मंत्री मुनगंटीवार हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानास भेट देणार असून तेथे महामानवास अभिवादन करणार आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत