सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूकी दरम्यान ध्वनी आणि अती प्रकाशामुळे प्रदुषणामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहेत. त्यामुळे मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला गालबोट लागते. गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटामुळे काही जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, केवळ आवाजामुळेच नव्हे तर लेझर लाईट्सच्या झगमगाटामुळे तब्बल सहा जणांना आपली दृष्टी गमवावी लागल्याचेही आता समोर आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे-लेझर लाईट्समुळे सहा जणांवर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे. हे सहाही तरुण नाशिकचे आहेत. हे सर्व तरुण विशी-पंचवीशीतील असल्याचेही सांगण्यात आले आहे. धुळे, मुंबई आणि ठाण्यातही असे रुग्ण आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी या तरुणांना तपासल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना अशा गंभीर इजा का झाल्या, हे डॉक्टरांनाही कळले नाही. काळा चष्मा न घालता वेल्डिंगचे काम जवळून पाहिल्यानंतर साधारण असे त्रास तरुणांना होतात. मात्र, जखमी तरुणांपैकी सर्वांनीच आपण वेल्डिंगचे काम पाहिले नसल्याचे सांगितले. नंतर या तरुणांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझर लाईट्सचा त्रास झाल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या तरुणांना आता कायमस्वरुपी आपली डोळा गमवावा लागण्याची भीती आहे. त्यामुळे रात्रीच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्सचा वापर जपून करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
नाशिकमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे लावण्यास मनाई आहे. मात्र, यंदा आठ वर्षानंतर नाशिकमध्ये डीजे लावण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे या मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटावर तरुण बेभान नाचले. या मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. हे लेझर लाईट्स थेट डोळ्यांवर गेल्याने सहा तरुणांवर आपली दृष्टी गमवावी लागल्याचे समोर आले आहे. लेझर लाइट्सच्या थेट संपर्कात आल्याने आधी या मुलांना अंधूक दिसू लागले. त्यानंतर त्यांचे डोळे चुरचुरू लागले. डोळे चोळल्यामुळे त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नेत्ररोग तज्ज्ञांनी त्यांना तपासले असता काहींच्या डोळ्यांमध्ये काळे डाग निर्माण झाल्याचे दिसले. तर, काही तरुणांच्या डोळ्यांवर भाजल्यासारख्या जखमा आढळून आल्या असून अद्याप या तरुणांची नावे समजू शकली नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा