BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांकडून पत्रकारांना धक्काबुक्की; शिवीगाळ करत धमक्या देणाऱ्यांवर निव्वळ अदखलपात्र गुन्हा..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली: भिवंडी कल्याण नंतर डोंबिवलीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेदरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी "एक मराठा लाख मराठा"च्या घोषणा सुरू केल्या. हे पाहून सभेचे वृत्तसंकलन करण्यास गेलेल्या पत्रकारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह पत्रकारांना शिवीगाळ करून धक्काबुक्कीही केल्याचा प्रकार घडला. प्रकार गंभीर असतानाही पोलिसांनी मात्र ४ तास बसवून ठेवल्यानंतर शिवीगाळ करत धमक्या देणाऱ्यांवर निव्वळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतल्याने समस्त पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
    भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची महाविजय - २०२४ अभियानांतर्गत रविवारी डोंबिवलीत चौक सभा झाली. या सभेत मराठा तरुणांनी "एक मराठा लाख मराठा" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मराठा बांधव शिवाजी पाटील यांनी घोषणा दिल्या. हे पाहून बावनकुळे यांनी पाटील यांना मंचावर बोलावून त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेल्या पत्रकारांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. विशेष म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या एका पोलीसाने भाजपाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून आले. या घटनेनंतर पत्रकारांनी निषेध व्यक्त करत पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी तब्बल ४ तास बसवून ठेवल्यानंतर त्यांची तक्रार नोंदविण्यात आली. एकीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ, धाक-धमक्या देत धक्काबुक्की केली, तर दुसरीकडे पोलीसांनी मात्र या घटनेची केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने समस्त पत्रकारांमध्ये पोलीसांच्या दबक्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. पत्रकारांनी निषेध व्यक्त केल्यानंतर या घटनेबद्दल भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकारांची माफी मागितली. ही चूक असल्याचेही त्यांनीही मान्य केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत