BREAKING NEWS
latest

आगरी महोत्सव २०२३ चा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी येथील  महापालिकेच्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे सुरू झालेल्या १९ वा आगरी युथ फोरमच्या आगरी महोत्सवाचे उदघाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती अध्यक्ष दशरथ पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, विश्वनाथ रसाळ, जालिंदर पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश भंडारी, पांडुरंग म्हात्रे, गंगाराम शेलार, सुरेश पाटील, वसंत पाटील, आगरी कोळी मेडिको असोसिएशचे अध्यक्ष डॉ.दिनेश म्हात्रे, संगीता पाटील, नवनीत पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणालाही न दुखावता मराठ्यांना आरक्षण द्यावं !

सरकारने सरसकट प्रमाणपत्र दिलेलं नाही, मराठ्यांमधले म्हणतात आम्ही मराठा आहोत, आमची मराठा जात नष्ट करायला निघालात का ? म्हणून जास्त आक्रमकतेने कोणी बोलू नये, सर्वांनी एकत्र राहावं आणि भारत देश एकसंघ रहावा असं वक्तव्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी डोंबिवलीत केले. डोंबिवलीत आगरी युथ फोरम, डोंबिवली आयोजित १९ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी आरक्षणावर कोणीही गदा आणण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही अशीही ठाम भूमिका त्यांनी घेतली.
ठाकूर यांनी पुढे सांगितले की, आमच्या ओबीसी आरक्षणाला हात लागता कामा नये असं येथे उपस्थित असलेल्या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री आणि सरकार सांगत आहे कि कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ. जर या पद्धतीने मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर शंभर टक्के दिले तरी चालेल. पण ज्याच्या त्याच्या जीववार बेतणार असेल तर प्रत्येकाला हातपाय हलवावे लागणारच. पण आम्हाला असं वाटत कि कोणालाही न दुखावता मराठ्यांना आरक्षण द्यावं. तसंच गावबंदी न करता लोकशाहीत सर्वांचा आदर ठेवला पाहिजे, लढण्यासाठी कोर्ट कचेऱ्या आहे ना ? असा टोलाही त्यांनी नेत्यांवर होत असलेल्या गावबंदीबाबत हाणला. काश्मीरच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्यामध्ये ३७० कलम गेलं आणि आता सर्वांना जमीन घ्यायचा हक्क मिळाला हाच न्याय सर्व समजाकरता आहे.
यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती अध्यक्ष  दशरथ पाटील म्हणाले, आम्ही आगरी कोळी ओबीसी म्हणून आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे, मराठा समाजातही आज गरिबी आहे. मराठा आमचा दुश्मन नाही, मैत्री संवादाचे संबंध आहेत पण जर का कोणी सांगत असेल कि यांना असं करू, असं कोणी म्हणू नये, ज्याप्रमाणे आमदारांची घर जाळली, मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या जातात हे ठीक नाही. यशवंतराव चव्हाण यांचाही अशा गोष्टीला विरोध होता. त्यांनीही तेव्हा म्हटलं होतं कि असं करणाऱ्यांवर कडक करावाई करेन, मग आता तस होतंय का, आम्ही असं ठामपणे सांगू कि आमच्या ओबीसी मधून झालं तर धडक कारवाई करावी, जर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचं असेल तर सर्वांनी एकत्र आणि एकोप्यानी राहण्याची गरज आहे.
आपल्या प्रस्तावानेत गुलाब वझे यांनी १९ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सव माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांची आणि संस्थेच्या उद्देशाची माहिती सर्वांसमोर ठेवली. यामध्ये शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, महिला हरिपाठ, प्रकट मुलाखत, व्याख्यान, विनोदी कार्यक्रम, परिसंवाद, आगरी कवी संमेलन, मराठी भाषा संवर्धन व जतन तसेच कला, नृत्य, खास आगरी खाद्यपदार्थ त्याचबरोबर खरेदी हे महोत्सवाची वैशिष्ट्य आहे असे सांगितले. यावेळी आगरी महोत्सवाचे महत्व आणि  आठवणी सांगणाऱ्या 'कनसा' स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.
दरम्यान गेली २० वर्ष अमेरिकेतील प्रख्यात उद्योजक आणि मुळच्या डोंबिवलीकर डॉ. संगीता पाटील म्हणाल्या, मी २० वर्षापासून अमेरिकेत राहत असून भारत देशातील एनर्जी मला माझ्या कामात नेहमीच प्रोत्साहन देते. समाजातील तरुण पिढीने उंच भरारी घ्या, जग जिंका, पण आपल्या भूमिला विसरू नका, तरुण पिढीनी शिकत रहा असा यशस्वी होण्याचा मंत्र दिला.
यावेळी कल्याण येथे होणाऱ्या ओबीसी संमेलनाबाबत बोलताना रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, ओबीसीचे नेते बरेचसे येणार आहेत, अधिवेशन आहे, कुणाला यायला जमेल कि नाही तो ही प्रश्न आहे कोणी आला नाही म्हणजे तो यामध्ये नाही अश्यातला भाग होत नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत