BREAKING NEWS
latest

'अल्टीमेट खो-खो' च्या सीझन दोन मध्ये 'गुजरात जायंट्स' कडून 'मुंबई खिलाडीस'चा पराभव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भुवनेश्वर, २६ डिसेंबर: 'अल्टीमेट खो-खो' चा सीझन दोन कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुर आहे. 'खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया'च्या सहकार्याने अमित बर्मन यांनी सुरु केलेली अल्टीमेट खो-खो पहिल्या सीझनमध्ये जबरदस्त हिट ठरली होती जी भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने बिगर क्रिकेट स्पर्धा म्हणून उदयास आली. अल्टीमेट खो-खो हि पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेला यूके स्थित बीएनपी ग्रुपने निधीची उपलब्धता करून दिली आहे. अल्टीमेट खो-खो चे सर्व सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून 'सोनी स्पोर्ट्स नेटवर्क' चॅनेल व 'सोनी लीव' अॅपवर थेट पहाता येतील. आजच्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीसचा ४ गुणांनी पराभव करत गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. ओडिशा जगरनॉट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात झालेला सामना बरोबरीत सुटला.
'मुंबई खिलाडी'सचा सलग दुसरा पराभव

आज झालेल्या पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीसला ३४-३० (मध्यंतर १७-९) असे ४ गुणांनी पराभूत केले. मुंबई खिलाडीसचा कर्णधार अनिकेत पोटेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. हा त्याचा निर्णय अतिशय योग्य ठरवत मुंबई खिलाडीसच्या संरक्षकांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत पहिल्या टर्नमध्ये संरक्षणात 'ड्रीम रन्स'चा १ गुण मिळवला. तर गुजरात जायंट्सने १४ गुण मिळवत खेळावर पकड मिळवली. त्यानंतर गुजराताने ड्रीम रन्सचे तीन गुण वसूल करताना मुंबई खिलाडीसला कडवी लढत दिली. मात्र या दुसऱ्या टर्नमध्ये मुंबई खिलाडीसला फक्त ८ गुणच मिळवता आले. यावेळी गुजरात कर्णधार अक्षय भांगरे १,१२ मि. संरक्षण, सुयश गरगटे १.४८ मि. संरक्षण व अभिनंदन पाटील यांनी उत्कृष्ट संरक्षण केले. दुसऱ्या डावात व तिसऱ्या टर्न मध्ये धमाकेदार खेळ करत गुजरातने मुंबईला तगडे आव्हान देत एक एक पाउल विजयाकडे टाकत होते. गुजरातने एकूण ३४ गुण वसूल केले. त्यामुळे मुंबईची वाटचाल बिकट झाली. शेवटच्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने जोरदार मुसंडी मारत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते सपशेल अपयशी ठरले.  या सामन्यात गरगटेला संरक्षक पुरस्कार देऊन गौरविले. 

ओडिशा जगरनॉट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात बरोबरी

आज झालेल्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात झालेला सामना ३४-३४ (मध्यंतर १६-१६) असा बरोबरीत सुटला. सुरवातीपासूनच अतिशय चुरशीने खेळलेल्या सहाव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिकून ओडिशा जगरनॉट्स विरुध्द संरक्षण घेतले. ओडिशा जगरनॉट्सने पहिल्या आक्रमणात १६ गुण मिळवत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. तर चेन्नई क्विक गन्सने ड्रीम रन्सचे २ गुण मिळवत कडवी लढत दिली. रामजी कश्यपने जोरदार आक्रमण करत आपल्या संघाला सामन्यात जिंकण्याची संधी मिळवून देण्यात यश मिळवले व मध्यंतर १६-१६ गुणावर थाबला.  यावेळी ओडिशाच्या गौतम एम के चे संरक्षण उत्कृष्ट झाले. मध्यंतरानंतर ओडिशा जगरनॉट्सने जोरदार आक्रमण करत रोहन शिंगाडे, अविनाश देसाई यांच्या आक्रमणाच्या जोरावर १८ गुण वसूल केले. तर चेन्नई क्विक गन्सच्या लक्ष्मण गवस व दुर्वेश साळुंके यांनी दमदार संरक्षण करत ओडिशा जगरनॉट्सच्या तोंडाला फेस आणला. ४ थ्या व शेवटच्या टर्न मध्ये जवळजवळ चेन्नई क्विक गन्सच्या आक्रमकांनी पहिल्या दीड मिनिटात ६ गुण वसूल केले. त्यानंतर दुर्वेश साळुंके व रामजी कश्यपच्या बहारदार खेळीने हा सामना बरोबरीत सोडवला मात्र चेन्नई क्विक गन्सला शेवटच्या मिनिटात गुण मिळवण्यात अपयश आल्याने विजयापासून दूर राहावे लागले. 

बुधवारी तेलुगू योद्धास व राजस्थान वॉरियर्स यांच्यात पहिला सामना तर मुंबई खिलाडीस व ओडिशा जगरनॉट्स यांच्यात दुसरा सामना रंगेल.

गुजरात जायंट्स गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर तर मुंबई खिलाडी पाचव्या स्थानावर
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत