डोंबिवली: येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९९
वा वर्धापन दिन २६ डिसेंबर रोजी इंदिरा गांधी चौकात साजरा करण्यात आला. या निमित्ताने इंडिया आघाडीतील विविध पक्षातील डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर सडकून टिका केली.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड आत्माराम विशे यांच्या अध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन पार पडला. विशे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेपासून स्वातंत्र्य काळात पक्षाचा संघर्षमय, क्रांतिकारी व त्यागमय इतिहास मांडला आणि स्वतंत्र्यानंतर देशात लोकशाही व समाजवादी विचारानुसार कम्युनिस्ट पक्ष जनतेच्या प्रश्नांवर सतत संघर्ष करत आहे याची माहिती दिली. तसेच भाजप सरकारच्या कामगार शेतकरी व जनता विरोधी धोरणांवर सडकून टिका केली.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डीझेल, सिएनजी गँस, घरगुती गँस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईत भरमसाठ वाढ केली असून त्यामुळे जनतेचे जगणे अवघड झाले आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आरएसएस चे सरकार देव, धर्म व आरक्षणा सारखे भावनिक समस्या निर्माण करून जनतेला फसवत असल्याचे आरोप केले.
कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे प्रतिनिधी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे माजी शहर अध्यक्ष तात्या माने यांनी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येवून डोंबिवलीत मजबूत आघाडी उभी करावी असे आवाहन केले. काँग्रेसचे डोंबिवली पश्चिम ब्लॉकचे अध्यक्ष एकनाथ म्हात्रे यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या ९९ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व इंडिया आघाडी मध्ये काँग्रेस पक्ष ताकदीने भागिदारी करेल असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष नंदु मालवणकर (धुळे) यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकत्र आल्याने समाधान व्यक्त केले आणि भाजप सरकारमुळे देशाची लोकशाही व संविधानाला धोका निर्माण झाला आहे याची चिंता देखील व्यक्त केली.
रेव्हल्युशनरी मार्किस्ट पार्टी चे राज्य सचिव कॉम्रेड राजेंद्र परांजपे यांनी मोदी सरकारच्या काळात देशात भयंकर बेरोजगारी वाढल्यामुळे बेरोजगार तरुणांनी लोकसभेत घुसून निषेध नोंदवला यावर विरोधी खासदारांनी लोकसभेत आवाज उठवल्याने १४१ खासदारांना निलंबित केल्याच्या कृतीचा निषेध नोंदवला. कम्युनिस्ट चळवळीतील जेष्ठ नेते कॉम्रेड अरूण वेळासकर ऍड. रामदास वायंगडे, श्रमिक मुक्ती दलाच्या नेत्या रंजना आठवले, शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी या सर्वांनी देखील कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व इंडिया आघाडीला मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय देशमुख आणि प्रा.आविंद वाघमारे यांनी अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या या विषयावर व्याख्यान दिले व चमत्कारांवर प्रात्यक्षिक करून भोंदू बुवा बाबांचे भांडाफोड केले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कॉम्रेड शहिद भगतसिंग व सर्व क्रांतिकारकांना लाल सलाम करून, "भाजप हटाव देश बचाव, भाजप हटाव संविधान बचाव" च्या घोषणा देवून इंदिरा गांधी चौक दणाणून सोडले आणि महागाई व बेरोजगारी वाढविणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारला २०२४ मध्ये सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात एआयवायएफ चे माजी राज्य अध्यक्ष कॉम्रेड श्रीकांत कांबळे, शंबूक चौधरी, भाकपचे कल्याण तालुका सेक्रेटरी कॉम्रेड विलास शेलार, संकल्पना कऱ्हाडे, उदय चौधरी, डोंबिवली भाकपचे सेक्रेटरी कॉम्रेड विलास शेळके, जालंदर भोईर, पदमाकर पाटील, इत्यादी शेकडो कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा