BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवली पालिका उपायुक्तांनी केला डोंबिवली स्टेशन परीसराचा पाहणी दौरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाकडून सध्या जोरात कारवाई सुरू आहे. पालिकेचे डोंबिवली विभाग उपायुक्त अवधूत तावडे यांनी गुरुवारी स्टेशन परिसराची पाहणी केली. नागरिकांना चालण्यास मोकळे फुटपाथ व वाहन चालकांना मोकळे रस्ते मिळणे आवश्यक आहे. या कारवाईत सातत्य राहणार असून फेरीवला मुक्त परिसर दिसेल असे आश्वासन तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिले. तर नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी लवकरच टाऊन वेंडिंग कमिटी निर्णय घेईल असे सांगण्यात आले.

डोंबिवली पश्चिमेला अनेक वर्षापासून स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आहे. यासाठी माजी नगरसेवक शैलेश धात्रक , माजी नगरसेविका मनीषा धात्रक व पालीकेचे पथक प्रमुख विजय भोईर यांनी अथक मेहनत घेतली. मात्र डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटण्यास तयार नाहीत. ’आधी आम्हाला बसण्यास जागा द्या, मग कारवाई करा’ अशी फेरीवाल्यांची ठाम मागणी आहे. मात्र अनेक वर्षापासून नोंदणीकृत नऊ हजार फेरीवाल्यांच्या जागेचा प्रश्न सोडविण्यास पालिकेला यश आले नाही. परिणामी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांनी जागा सोडण्यास नकार देत आपले बस्तान मांडले आहे. दिवाळी सणात पालिकेची कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांनी डोंबिवली रामनगर तिकीट घरासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन देखील केले होते.

पालिका प्रशासनाच्या नियमानुसार स्टेशन बाहेरील १५० मीटर रस्ता फेरीवाला मुक्त असणे आवश्यक आहे. गुरुवारी पूर्वेकडील स्टेशन परिसराची पालिकेचे डोंबिवली विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांनी पाहणी केली. यावेळी ‘ग’ प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त सोनम देशमुख, फेरीवाला अतिक्रमण प्रमुख राजेंद्र साळुंखे, फेरीवाला पथक प्रमुख विलास साळवी आणि सुनील सुर्वे व पथकातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपायुक्तांनी कारवाई पाहून लवकरच स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त होईल असे आश्वासन दिले. मात्र कारवाई सुरू असताना फेरीवाला पथकात अपुरा कर्मचारी बळ आणि पोलीस बंदोबस्त देखील मिळत नसल्याचे साळुंखे यांनी उपायुक्त तावडे यांना सांगितले.

मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा, अशी मागणी केल्यानंतर पालिकेकडून झालेल्या कारवाईचे डोंबिवलीकरांनी भरभरून कौतुक केले होते. डोंबिवलीकरांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत '४० वर्षात पहिल्यांदाच डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवालामुक्त दिसला’ असे कमेंट्स करत मनसेचे आभार मानले होते. निर्णय लांबविणार तरी किती असा प्रश्न उपस्थित करत नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यास जागा द्या अशी मागणी फेरीवाले करत आहेत. टाऊन वेंडिंग कमिटीला निर्णय घेण्यास का वेळ लागतोय ? हरकती आल्या, प्रशासकीय राजवटही आहे मग का उशीर होतोय असा प्रश्न डोंबिवलीकरांकडूनही उपस्थित केला जात आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत