BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील 'हभप सावळाराम म्हात्रे' क्रीडासंकुलात १३ ते २० दरम्यान रंगणार 'आगरी महोत्सव' २०२३..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 डोंबिबली: दरवर्षी प्रमाणे आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन २००४ पासून "अखिल भारतीय आगरी महोत्सव" डिसेंबरमध्ये डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलात अखिल भारतीय आगरी महोत्सव भरविण्यात येतो. संस्कृती, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि गृहपयोगी वस्तूंची मोठी बाजारपेठ असलेला हा महोत्सव यंदा १३ ते २० डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. कल्याण डोंबिवलीकरच नाही तर ठाणे, रायगड, मुंबईवासियसुद्धा आगरी महोत्सवची चातकासारखी वाट पाहत असतात. असा सर्वांना  हवाहवासा वाटणारा १९ वा अखिल भारतीय महोत्सव १३ ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत श्रीसंत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचा उद्‌द्घाटन सोहळा समाजाचे ज्येष्ठ नेते मा. श्री राम शेठ ठाकूर (मा. खासदार) मा. जगन्नाथ पाटील (मा. मंत्री), मा. श्री दशरथ दादा पाटील (ज्येष्ठ सामाजिक नेते) यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते आजी-माजी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव विधानसभा व लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात होत असल्याने महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. केंद्रीय राज्यमंत्री मा. कपिल पाटील, महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री मा.रवींद्र चव्हाण, मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मा.आमदार गणपत गायकवाड, मा. आमदार राजू पाटील, मा. आमदार विश्वनाथ भोईर, मा. आमदार किसन कथोरे व इतर आमदार हे सर्व लोकप्रतिनिधी महोत्सव कालावधीमध्ये आगरी महोत्सव ला शुभेच्छा भेट देणार आहेत.
अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे "एक आनंदाची पर्वणी", या आनंदाच्या पर्वणी मध्ये मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रचंड जनसागर उसळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महोत्सव मध्ये भेट देणाऱ्या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, खरेदीसाठी येणाऱ्यांना मनपसंत वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेता यावा, संगीत नृत्य प्रेमींना आगरी कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, दर्दी खवय्यांना स्वादिष्ट आगरी कोळी खाद्यपदार्थावर मनसोक्त ताव मारता यावा, बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पालकांनाही आकाश पाळण्यात बसून आकाशा एवढा आनंद घेता यावा त्यांच्या आनंदामध्ये बाधा येऊ नये म्हणून महोत्सव समितीने अत्यंत नियोजनबद्ध अशी कार्यक्रमांची आखणी केलेली आहे.

आनंदाची पर्वणी असलेल्या या महोत्सवाचे यंदा १९ वे वर्ष आहे. यंदा नियोजनबध्द अशी कार्यक्रमांची आखणी केली गेली आहे. महिलांच्या सन्मानार्थ महोत्सवातील एक दिवस महिलांसाठी राखून ठेवला गेला आहे. त्यादिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे. आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटविणा-या आगरी समाजातील महिलांचा 'सन्मान आगरी स्त्री शक्तीचा' या कार्यक्रमामध्ये सत्कार केला जाणार आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उद्योजिका सायली पाटील, महाराष्ट्र केसरी उपविजेती वैष्णवी पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. आगरी समाजाला संगीत भजनाची परंपरा आहे. ती जतन करण्यासाठी शास्त्रीय व संगीत गायक नंदकुमार पाटील यांनी व गायन केलेल्या 'संतवाणी' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाजातील युवा पिढीने शिक्षणाची कास धरल्याने अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे.

दि. बा. पाटील नामकरणाबाबत चर्चासत्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा राज्य सरकारने केली ओक नेते मकरणाचा चेंडू केंद्र शासनाच्या पारड्यात गेला आहे. याबाबत महोत्सवात चर्चासत्र होणार आहे, त्याला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील हे उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषा संवर्धन व जतन या विषयावर होणाऱ्या परिसंवादात साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. मिलिंद जोशी, सुरेश देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

ओबीसी आरक्षण जागर

महोत्सवात 'ओबीसी आरक्षण जागर' या विषयावर व्याखान होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे कोणते लाभ मिळतात याची माहिती या व्याख्यानातून पोहोचवली जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे
आयोजक गुलाब वझे यांनी पत्रकारांसमोर दिली.
महोत्सवासाठी जगप्रसिद्ध नेपथ्यकार सन्मा. संजय धबडे व ओम साई डेकोरेटर्स है नेपथ्याचे काम करणार आहेत. त्याचप्रमाणे "महाराष्ट्राची हास्य जत्रा" हा सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम महोत्सवच्या मंचावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये हास्य जत्रेतील सर्व प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहून आगरी महोत्सव मध्ये हास्याचे कारंजे फुलवणार आहेत. हा धमाल विनोदी कार्यक्रम आपल्यासाठी "डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन" च्यावतीने प्रायोजित करण्यात आलेला आहे. महोत्सव कालावधीमध्ये दररोज दोन महिलांना साडीच्या माध्यमातून पैठणीचा मान मिळणार आहे तसेच महोत्सव कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार यांची उपस्थिती ही आपल्याला मिळणार आहे त्याची घोषणा महोत्सव मंचावरून एक दिवस अगोदर करण्यात येईल असे आयोजक गुलाब वझे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत