BREAKING NEWS
latest

अमर हिंद मंडळ आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिरचा दुहेरी धमाका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.०४:  दादर येथील अमर हिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड येथे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मुले आणि मुलींच्या संघांनी विजेतेपद पटकावत दुहेरी धमाका केला आहे. मुलांमध्ये परळच्या सोशल सर्व्हीस लिगचा तर मुलींमध्ये सरस्वती विद्यामंदिरचा पराभव झाला. 
मुलांमध्ये सोशल सर्विस लीग, परेल तर मुलींमध्ये सरस्वती उपविजयी

या आंतरशालेय खो-खो स्पर्धेचे अंतिम सामन्यात मुलांमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिरने परेलच्या सोशल सर्व्हीस लिगचा १ डाव ११ गुणांनी (१८-७) पराभव केला. पहिल्या आक्रमणात महात्मा गांधी संघाने परेलचे १८ खेळाडू बाद करत मोठे आव्हान ठेवले होते. उत्तम झोरे ने ६ तर अजयने ४ गुण मिळवले. संरक्षणातही महात्माच्या अजय राठोड (४.३० मिं. संरक्षण), वेदांत कांबळे (२.०० मि.), कार्तिक चांदणे (२.३० मि. नाबाद) असा खेळ करत सोशल सर्व्हीस लिग संघाला मोठी आघाडी मिळवण्यास कोणतीच संधी दिली नाही. सोशल सर्व्हीस लिग तर्फे प्रतिक माने (१ मि. संरक्षण), अनोश कदम (१ मि. संरक्षण व ४ गुण) असा खेळ केला. मध्यंतराला महात्मा संघाकडे १६ गुणांची आघाडी होती. सोशल सर्व्हीस लिग संघ दुसऱ्या आक्रमणातही यशस्वी ठरला नाही. महात्माच्या आर्यन चव्हाण  (३ मि. संरक्षण), तन्मय पुजारी (२ मि. संरक्षण), अनिल राठोड (२ मि. नाबाद संरक्षण) यांनी केलेल्या चांगल्या खेळामुळे सहज विजय मिळवता आला.

मुलींच्या गटात महात्मा गांधी विद्यामंदिरने सरस्वती मंदिर माहिमचा १ डाव ३ गुणांनी (९-६) पराभव केला. मध्यंतराला महात्मा संघाकडे ५ गुणांची आघाडी होती. ती कायम राखण्यात संघ यशस्वी ठरल्यामुळे या सामन्यात सहज विजय मिळवला. महात्माकडून दिव्या चव्हाण (४.०० मि. व ४ मि. नाबाद संरक्षण आणि ३ गुण), लक्ष्मी धनगर (२ मि., २.५० मि. संरक्षण व १ गुण) असा अष्टपैलू खेळ केला. सरस्वतीच्या हर्षला सकपाळ (३.३० मि. संरक्षण व २ गुण), अवनि पाटील (२.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ करूनही संघाला विजेतेपदापर्यंत नेता आले नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत