BREAKING NEWS
latest

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना होणार अटक; निवासस्थानाबाहेर वाढवली सुरक्षा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 दिल्ली: अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करू शकते. खुद्द आम आदमी पक्षानेच हा दावा केला आहे. सीएम केजरीवाल यांच्या अटकेच्या भीतीने कार्यकर्ते आप कार्यालयात पोहोचू लागले आहेत. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तीन समन्स बजावले आहेत, परंतु आतापर्यंत केजरीवाल हे 'ईडी' समोर हजर झालेले नाहीत.

दरम्यान, गुरुवारी सकाळी आप नेते आतिशी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ह्या पोस्टनुसार, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी बुधवारी रात्री लिहिले की, त्यांना बातमी मिळाली की अंमलबजावणी संचालनालय (ईडी) गुरुवारी सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकणार आहे. त्यांना अटकही होऊ शकते. त्याचबरोबर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा केला आहे की 'ईडी' आज मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकू शकते. त्यानंतर त्यांना अटक होऊ शकते.

यापूर्वी काल, दिल्लीत झालेल्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या तिसऱ्या समन्सवरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आले नाहीत. सीएम केजरीवाल यांनी तपास यंत्रणेला पत्र लिहिले आहे. हजर न होण्याचे कारण त्यांनी दिले असून सध्या राज्यसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचे लिहिले आहे. तसेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार असल्याचे सांगितले. राज्यसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत व्यस्त असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. नोटीस बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाशी संबंधित प्रश्नावली पाठविल्यास उत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. केजरीवाल यांनी एजन्सीला लिहिले, “या प्रकरणात तुम्ही अवाजवी गुप्तता पाळत आहात आणि अपारदर्शक आणि मनमानी पद्धतीने वागत आहात.” समन्स त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांमध्ये दिसल्याचा आरोप त्यांनी केला. या समन्सचा उद्देश कायदेशीर चौकशी करणे आहे की माझ्या प्रतिष्ठेला कलंक लावणे हा प्रश्न निर्माण होतो.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत