BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत सजली अयोध्या नगरी; पताका, दुदुंभी ने निनादली शरयू नदी तीरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२२: ज्या दिवसाची, ज्या क्षणाची करोडो भारतवासी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस, तो क्षण अखेरीस अयोध्येत ५५० वर्षांनी आला आणि असंख्य भारतवासियांचे डोळ्याचे पारणे फिटले. असाच सोनेरी दिवस म्हणजेच २२ जानेवारी २०२४, शुद्ध द्वादशी,मृगशिर्ष नक्षत्र ब्रह्मा योग ह्या शुभ मुहूर्तावर 'जे एम एफ' संस्थेमध्ये 'रामलल्ला' च्या बालरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच संस्थेच्या सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या कर कमलाने प्रस्थापित झाली.
न भूतो, न भविष्यती असा हा सोहळा पाहण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी व त्यांचे असंख्य पालक वर्ग, शिक्षक, आवर्जून उपस्थित राहिले होते. साक्षात अयोध्या नगरीतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची संस्थेच्या 'ब्रह्मा रंगतालय' येथे मंदिराची हुबेहूब प्रतिकृती श्री. विठ्ठल कोल्हे यांनी साकारली होती. श्री. पिसाट यांनी मंदिराच्या शेजारीच वाहती 'शरयू नदी' साकारली होती. शाळेतील छोटे विद्यार्थी, विद्यार्थीनी राम, लक्षण, सीता, हनुमान आणि सर्व रामायण मधील व्यक्तिरेखाच्या वेशभूषे मधे आले होते. 

सर्वात प्रथम शाळेच्या प्रवेशद्वारातून राम, लक्षण, सीता, हनुमान आणि सर्व रामायणातील सगळ्या व्यक्तिरेखा यांचे कोल्हे दामपत्यांनी त्यांचे पाय प्रक्षाळून व आरती ओवाळून, फुलांच्या पायघड्या घालून, ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. 'जय श्रीराम, जय श्रीराम' ह्या नाद घोषांनी शाळा दुमदुमून गेली. अंगावर शहारा आणणारे हे दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यात भावनिक आणि आनंदी अश्रूंची जणू धारा वाहू लागल्या. 'जे एम एफ' मंडपम्, मधुबन वातानुकुलीत दालन येथून मिरवणूक काढून थेट 'ब्रह्मा रंगतालय' येथे साकारण्यात आलेल्या मंदिरामध्ये राम, लक्षण सीता, हनुमान ह्यांना फुलांचा वर्षाव करत आगमन झाले. रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीला निषाद रानडे ह्या इयत्ता नववी मधील विद्यार्थ्याने वेद मंत्र तसेच श्लोक उच्चारून कोल्हे दाम्पत्य व त्यांचा कन्या जान्हवी कोल्हे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

"निरागस हे बालरूप पाहून हरपले चित्त राम नामाच्या जपामध्ये तल्लीन झाले सारे भक्त"
'जे एम एफ' संस्थेच्या संपूर्णतः आठ मजली इमारतीवरून फुलांचा वर्षाव केला जात होता. हे विलोभनिय दृश्य पाहून शरयू नदीला देखील बांध फुटला व ती ही आनंदाश्रुनी खळा खळा वाहू लागली. कुणी म्हणे माझा राम आला, कुणी म्हणे माझा कैवारी आला. सात नद्यांचे जल, हजार प्रकारच्या औषधी वनस्पती व होमहवन ने रामाभिषेक केला गेला. ते चालू असतानाच इयत्ता सातवी, आठवी च्या विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर करून प्रभू श्रीरामाला अभिवादन केले. त्यानंतर प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. सुमारे ५५० वर्षांनी हा मणी कांचन योग जुळून आला आणि सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले.अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी एकवचनी, मर्यादा पुरुषोत्तम, रामाचे चरित्र हे एका शब्दात मांडण्यासारखे नाही तर त्यासाठी असंख्य जन्म अपुरे पडतील असे सांगून प्रभू श्रीरामा सारखे निष्ठावान आणि आज्ञा धारक राहा असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीराम हा आपल्या मनामनात, कणाकणात आहे, ते कुठेच गेले नव्हते आणि नाहीये असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगून, मनाने पवित्र रहा, आणि प्रभू श्रीरामा प्रमाणेच सत्याचा मार्ग अवलंबवा असे मार्गदर्शनपर प्रोत्साहन दिले.
डॉ. कोल्हे दाम्पत्य आणि त्यांच्या कन्या खजिनदार जान्हवी कोल्हे यांच्या हस्ते तसेच सर्व पाहुणे, पालक व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी शरयू नदीची आरती केली. सर्व शाळा ही सर्व कलात्मक शिक्षिका व पालक यांनी सुबक रांगोळ्या काढून सजवली होती. "याची देही याची डोळा, प्रत्यक्ष पाहिला राम उत्सव सोहळा. रामलल्लाच्या आगमनाने पावन झाली 'जे एम एफ शाळा'."
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत