BREAKING NEWS
latest

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी डोंबिवलीमध्ये यावर्षी दहाव्या भव्य ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबवली, दि.२६ : कोकणातील निसर्ग सौदर्य, पर्यटन स्थळे, उद्योग, लोककला, संस्कृती यांचा प्रचार आणि प्रसारासाठी दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय ग्लोबल कोकण महोत्सव' आयोजित करण्यात येतो. मुंबई, पुणे, नवी मुंबई, लंडन येथे आज पर्यंत नऊ ग्लोबल कोकण महोत्सव झाले. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा भव्य प्रमाणात ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक २६ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकूल, घरडा सर्कलजवळ, डोंबिवली (पूर्व) येथे हा महोत्सव आणि भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आहे. दिनांक २७ जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदसाहेब यांच्या हस्ते भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा होणार आहे.

पर्यटन हा कोकणातील प्रमुख उद्योग बनू पाहत आहे, याबरोबरच आंबा, काजू, शेती, मत्स्यउद्योग व प्रामुख्याने कोकणातील फळ प्रक्रिया, अन्नप्रक्रिया उद्योग अशा स्वरूपाच्या उद्योगांचे प्रामुख्याने हे प्रदर्शन असेल. संपूर्ण कोकणातून जवळपास ३०० स्टॉल आणि १००० हून अधिक उद्योजक या भव्य प्रदर्शनात सहभागी होतील, हाऊसबोट, व्हाईट वॉटर राफ्टींग, निसर्ग पर्यटन, खाऱ्या व गोड्या पाण्यातील माशाची शेती, बांबू लागवड, मसाला शेती, असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कोकणातील तरुण गावागावात राबवत आहेत या उद्योगांचा प्रचार आणि प्रसिद्धी प्रामुख्याने या महोत्सवात करण्यात येईल, कोकणात ग्रामीण भागात उद्योग उभे राहावे याकरता उद्योग विभाग, मत्स्य विभाग, ग्रामविकास विभाग, पर्यटन विभाग, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि अन्य शासकीय विभागांच्या अनेक योजना कोकणात राबवण्यात येतात. या योजनेची माहिती या प्रदर्शनात मिळू शकेल, यावर्षी पेणमधील गणपती आणि बदलापूरची जांभळे यांना 'जीआय टॅग' मिळाला आहे. याचाही सहभाग या महोत्सवात राहील. सामाजिक क्षेत्रात कोकणात खूप चांगले काम अनेक सामाजिक संस्था करतात. कोकणातील प्रमुख वीस सामाजिक संस्था यावर्षी 'भारतरत्न विनोबा भावे' या दालनामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी मूर्तिकला, शिल्पकला, काष्ठ शिल्प या कोकणातील कलाकृतींसाठी भव्य कला दालन उभारण्यात येणार आहे. कोकण विकासासाठी योगदान असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात येईल.

कोकणात आधुनिक आणि शाश्वत शेती, इको टुरिझम, पर्यावरण पूरक पर्यटन, खाऱ्या पाण्यातील माशांची शेती, मसाला शेती, बांबू लागवड, जल व्यवस्थापन, ग्रामीण उद्योग निर्मिती करता सरकारी योजना अशा विविध विषयांमध्ये मार्गदर्शन परिषदा यावेळी आयोजित करण्यात आल्या आहे. यासाठी समृद्ध कोकण सप्ताह आयोजित केला आहे. मागील वर्षात झालेला कोकण विकास प्रक्रियेतील अडचणी आणि आव्हाने शासनाकडून अपेक्षा, भविष्यातील धोरणे, पुढील दहा वर्षाचा अॅक्शन प्लॅन यावर एक व्हिजन डॉक्युमेंट या परिषदेत तज्ञांच्या उपस्थितीत बनवण्यात येणार आहे. मागील दहा वर्षात कोकणात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा आणि पुढील दहा वर्षात रस्ते उद्योग बंदरे कोकणात होऊ घातलेल्या पायाभूत सुविधा आधुनिक कोकणचे निर्माण यावर एक महत्त्वपूर्ण प्रदर्शन आयोजित केले आहे. कोकण वर्षांनी कोकणातल्या जमिनी विकून आहेत त्या विकसित कराव्यात याकरता कोकण विकासाचे एक व्यापक अभियान यावेळी सुरू करण्यात येत आहे.

यावर्षी छत्रपती शिवरायांचा ३५० वा राज्याभिषेक दिन आहे आणि म्हणूनय हिंदवी स्वराज्याचे आणि साम्राज्यावे भव्य प्रदर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार आहे. या संपूर्ण महोत्सवाच्या नगरीला 'छत्रपती शिवाजी महाराज संकुल' असे नाव देण्यात येणार आहे. यावेळी कोकणातील मोठ्या उद्योजकांचे श्रीमंत बाजीराव पेशवे दालन, सागरी उद्योगांचे आणि वैभवाचे सरखेल कान्होजी आंग्रे दालन, कोकणातील पर्यटनाचे भारतरत्न भारतरत्न महर्षी कर्वे दालन, महिला बचत गटावे राणी लक्ष्मीबाई दालन, प्रक्रिया उद्योग आणि लघु उद्योगांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दालन, प्रशिक्षण परिषदा आणि परिसंवाद यासाठी लोकमान्य टिळक दालन, अशी विविध उद्योजकांची दालने उभारण्यात येणार आहेत. यावर्षी पेणमधील गणपती आणि बदलापूरची जांभळे यांना 'जीआय टॅग' मिळाला आहे. यांचाही सहभाग या महोत्सवात राहील.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे स्वराज्याचा इतिहास यावर २०० कलाकारांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित केले आहेत. सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे पाच दिवस व्याख्यान आयोजित केले आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज स्वराज्याचा आणि साम्राज्याचा संपूर्ण इतिहास यावर दररोज व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी संपूर्ण स्वराज्याच्या इतिहासावर काव्यमय आकर्षक प्रदर्शन याशिवाय शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन नाणी प्रदर्शन यावेळी आयोजित केले आहे.

कोकणातील हजारो वर्षाच्या समृद्ध लोककला आणि लोकनृत्य जगासमोर यावीत म्हणून भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कोकणातील तारपा नृत्य, आदिवासी नृत्य जाखडी, नमन, कोळी नृत्य, पालखी नृत्य, नकटा, शंकासुर यासारख्या असंख्य कार्यक्रम आणि यासाठी तीनशेहून अधिक लोककलाकार संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. राज्यातील आणि केंद्रातील अनेक मान्यवर नेते, उद्योग नाट्यकला, सिनेमा या विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर ५ दिवस चालणाऱ्या या भव्य कार्यक्रमात सहभागी होतील. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळ्यापर्यंत विशेषतः ठाणे जिल्ह्यातील लाखो कोकण प्रेमींसाठी हा भव्य महोत्सव एक पर्वणी असेल. आमदार प्रसाद लाड, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, प्रशांत काळे, संजय निकते हे या महोत्सवाचे संयोजक आहेत. ५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये तीन ते चार लाख कोकणवासीय आणि कोकण प्रेमी सहभागी होतील, असा विश्वास या महोत्सवाचे प्रमुख संयोजक संजय यादवराव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी वेबसाईट <www.globalkokan.org> वर उपलब्ध आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत